डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 08:10 AM2024-10-31T08:10:36+5:302024-10-31T08:11:03+5:30

हे तंत्र तुमचे संभाषण ‘ऐकते’ आणि कालांतराने तुमचे व्यक्तिमत्त्व, तुमची प्राधान्ये, तुमचे संवाद जाणून घेत-घेत काही वर्षांत तुमचे ‘डिजिटल जुळे’ तयार करते!

Digital Twin - Your Thoughts, Your Voice, Ditto You! | डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!

डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!

- डॉ. दीपक शिकारपूर
(माहिती तंत्रज्ञान, अभ्यासक)

सयामी जुळे वा जुळी भावंडे याबद्दल आपण जाणतो. साधारण एकमेकांसारखेच दिसणारे व काही वेळा एकसारखाच विचार करणारे ते एक व्यक्तिमत्त्व असते. अनेकवेळा जुळी भावंडे इतकी सारखी दिसतात की, कोण कुठला हेही ठरवणे अवघड जाते. हे झाले सजीव माणसांबद्दल...  आता घटकाभर कल्पना करा, आपली एक प्रतिकृती डिजिटली तयार झाली तर? - या प्रतिकृतीला डिजिटल ट्विन (जुळे) असे म्हटले जाते. एखाद्या वस्तूचा डिजिटल ट्विन म्हणजे तिची आभासी प्रतिकृती. ही प्रतिकृती मूळ वस्तू/ व्यक्तीची इत्थंभूत माहिती मिळवून पूर्ण जीवनचक्राचे सदृशीकरण (सिम्युलेशन) करते. डिजिटल ट्विन म्हणजे एखाद्या वास्तविक वस्तूचे, प्रणालीचे किंवा प्रक्रियेचे एक अत्यंत तपशीलवार आभासी प्रतिबिंब असते. हे प्रतिबिंब सॉफ्टवेअरच्या साहाय्याने तयार केले जाते आणि ते वास्तविक वस्तूच्या सर्व वैशिष्ट्यांचे अनुकरण करते. डिजिटल जुळे डेटा स्त्रोतांशी जोडलेले असतात.

एका छोट्या परिधान केलेल्या उपकरणाद्वारे आपले डिजिटल विश्व साठवले जाते,  भेटलेल्या व्यक्ती, त्यांचे सोशल प्रोफाइल्स, झालेले संभाषण, व्यवहार या सर्व बाबींचा त्यात अंतर्भाव असतो. अनेक वर्षांच्या साठवणुकीनंतर या माहितीचे ‘एआय’ तंत्राद्वारे पृथक्करण करून काही विशिष्ट साचे, वर्तणुकीचे प्रकार तयार केले जातात. या संकल्पनेचा उपयोग आपल्या स्मरणातल्या गोष्टी साठवण्यासाठी करता येऊ शकतो. स्मरण... मानवी मेंदूमध्ये ही अफाट क्षमता आहे; पण कालानुरूप, माणसाच्या वाढत्या वयानुरूप त्यात त्रुटी निर्माण होतात. अनेकांना विस्मरणाचा त्रास सुरू होतो. एखादी व्यक्ती समोर येते; पण नेहमीच्या ओळखीतल्या त्या व्यक्तीचे नाव काहीकेल्या आठवत नाही. कधीकधी नाव आठवते; पण त्या व्यक्तीचा चेहरा नजरेसमोर येत नाही. इथे आपला ‘डिजिटल जुळा’ आपल्याला मदत करू शकतो.

‘एआय’मधील प्रेडिक्टिव्ह अनॅलिटिक्स तंत्रामुळे आपण एखादी व्यक्ती भेटण्याच्या आधी, वा एखाद्या ठिकाणी जायच्या आधीच त्यासंबंधीच्या माहितीची खातरजमा, उजळणी  करू शकतो. काही टूल्स तुम्हाला रिअल टाइम  मदत करू शकतात. आपला घसा बसला असेल तर, आपल्या वतीने आपला हा ‘डिजिटल ट्विन’ संभाषणही करू शकतो. यात आपल्या आवाजाचे, लकबींचे पृथक्करण केले असते. फक्त यासाठी आपले संभाषण (अनेक वर्षांचे) रेकॉर्ड केले जाते. यासाठी वेअरेबल (परिधान केलेले संगणकीय उपकरण) वापरले जाते. प्लॉड  या ‘एआय’ उद्योगाने नोट नावाचे  एक  सक्षम ऑडिओ रेकॉर्डर विकसित केला आहे. (जो तुमच्या फोनच्या मागील बाजूस अडकवला जाऊ शकतो किंवा तुमचे संभाषण रेकॉर्ड करण्यासाठी, हावभाव रेकॉर्ड   करण्यासाठी शर्टच्या खिशात ठेवता येऊ शकतो). 

हे तंत्र  नेहमी तुमचे संभाषण ऐकते आणि कालांतराने तुमचे व्यक्तिमत्त्व, तुमची प्राधान्ये, तुमचे संवाद जाणून घेत-घेत काही वर्षांत तुमचे ‘डिजिटल जुळे’ तयार करते. या तंत्रात आणि ‘चॅटजीपीटी’सारख्या जनरेटिव्ह ‘एआय टूल्स’मध्ये बराच फरक आहे. चॅटजीपीटी सार्वत्रिक डिजिटल माहिती संग्रहाचे पृथक्करण करते व माहिती निर्माण करते. इथे तसे नाही. या तंत्रात फक्त आपल्याशी संबंधित माहितीचे पृथक्करण आपला डिजिटल ट्विन करतो व गरज पडल्यास आपली जागा देखील घेतो. अर्थात या तंत्रामुळे  आपल्या मानवी मेंदूच्या क्षमता कमी होतील अशा हरकती घेतल्या जात आहेत.

एक साधे उदाहरण घ्या. हल्ली आपण गुगल मॅप वापरून पत्ते शोधतो आणि कुणा जिवंत व्यक्तीला काही न विचारता, रस्ता लक्षात ठेवण्याचे कष्ट न घेताही इच्छित स्थळी सुखरूप पोहोचतो. पूर्वी आपण स्मरणशक्तीला ताण देऊन विचारत-विचारत  पत्ता शोधत असू. एकदा कष्टाने पत्ता शोधला की, तिथवर पोहोचण्याचा रस्ता लक्षात राहत असे. आता हे सारे जणू इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. डिजिटल ट्विन नावाचे तंत्र सर्वत्र हातपाय पसरू लागले आहे. भविष्यात माणसाचे आयुष्य सुसह्य झाले, तरी सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यांनी जगभरात माजवलेला हैदोस पाहता यासारख्या नवनवीन तंत्रांमुळे व्यक्तिगत सुरक्षेचा प्रश्न  अधिकच गंभीर होत जाणार, हे मात्र खरे!

Web Title: Digital Twin - Your Thoughts, Your Voice, Ditto You!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.