दिशादर्शकच हेलकावत आहेत

By admin | Published: March 31, 2016 03:33 AM2016-03-31T03:33:38+5:302016-03-31T03:33:38+5:30

शिक्षण असो की साहित्य यासारख्या संस्था म्हणजे समाजासाठी दीपस्तंभ. विचारांचे अधिष्ठान देऊन समाजाला वाट दाखविण्याचे काम करावे. मात्र, हे दीपस्तंभच अंधार पसरवू लागले

Directions are flowing | दिशादर्शकच हेलकावत आहेत

दिशादर्शकच हेलकावत आहेत

Next

- विजय बाविस्कर

शिक्षण असो की साहित्य यासारख्या संस्था म्हणजे समाजासाठी दीपस्तंभ. विचारांचे अधिष्ठान देऊन समाजाला वाट दाखविण्याचे काम करावे. मात्र, हे दीपस्तंभच अंधार पसरवू लागले, तर...

समाजाच्या उन्नयनाची जबाबदारी असणारे शिक्षण-साहित्यासारखे क्षेत्र म्हणजे एक प्रकारचे दिशादर्शकच. समाजाला मार्ग दाखविण्याचे काम या क्षेत्रातून होते. मात्र, या संस्थांचीच दिशा हेलकवायला लागली की एकंदर लोकशाहीचा पायाच थरथरायला लागलाय का, अशी भीती वाटल्याशिवाय राहात नाही.
पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून शिक्षण व साहित्यासारखी क्षेत्रे वेगळ्या कारणांनी गाजत आहेत. निवडणुकीच्या पारदर्शक इतिहासावर गटबाजी, वैयक्तिक हेवे-दावे आणि गैरप्रकारांच्या आरोपांनी डाग पडत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक नुकतीच झाली. तत्कालीन कारभारी असणारेच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. मतभेद हे लोकशाहीचे व्यवच्छेदक लक्षण. त्यामुळे त्यातही गैर नाही. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने उठलेला धुरळा पाहिल्यावर साहित्य क्षेत्रातील राजकारणावर गांभीर्याने विचार करण्याची गरज प्रतीत होते. राज्यातील साहित्यविषयक कार्य करण्यासाठी निर्माण झालेल्या या संस्थेमध्ये साहित्यिक किती हा मुद्दाच अलाहिदा. एखादा किराणा दुकानदारही रसिक वाचक असू शकतो, हे मान्य करूनही एकंदर मतदारयादी साहित्यरसिकांचे सर्वसमावेशक प्रतिनिधित्व करते, हे कोणाला पटणे अवघडच जाते. मसापच्या या निवडणुकीमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली. जणू काही बिहारमधील एखादी निवडणूक लढवली जात आहे, अशा पध्दतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कडक शिस्त लावावी लागली. अगदी मतपत्रिकेसोबत ओळखपत्रे जोडण्याची सक्ती करावी लागली. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पुण्यात घडलेला हा एक पराक्रमच म्हणायला हवा. एवढी शिस्त लावूनही अनेक आरोप झाले. पुण्याच्या साहित्यिक ओळखीपेक्षा अशी ओळख होणे, भूषणावह नाही.
मसापच्या निवडणुकीतील चर्चेची धूळ खाली बसत नाही तोवर शिक्षण प्रसारक मंडळीचा प्रकार पुढे आला आहे. स.प. महाविद्यालयापासून अनेक प्रथितयश शिक्षण संस्था चालविणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळींच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी माजी अध्यक्षांना अटक होते. बोगस मतपत्रिका त्यांच्या कार्यालयात सापडतात, हा प्रकार धक्कादायक आणि क्लेशकारक आहे. अध्यक्षांना अटक करून अनेकांवर गुन्हे दाखल करून पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यातून सत्य काय ते उघडकीस येईल. मतदानाची प्रक्रियाही हा लेख सुरू असताना सुरू आहे. मतदार आपापल्या सद्सद्विवेकबुध्दीला स्मरून मतदानही करतील. जय-पराजयही त्याप्रमाणे निश्चित होतील. पण म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो, हेच याबाबत म्हणावे लागेल. त्यापेक्षाही लाखो विद्यार्थी ज्या संस्थेतून घडले आणि घडत आहेत. अभिमानाने आपल्या महाविद्यालयाचे नाव सांगतात. त्याच संस्थेची अशा प्रकारची बदनामी त्यांच्यासाठी किती वेदनादायक असेल?
मुळात या निमित्ताने सामान्य माणसाला प्रश्न पडतो की या संस्थांमध्ये असे काय आहे की एनकेन प्रकारेण निवडणुका जिंकायच्याच. यासाठी कोणतेही गैरप्रकार करण्यास ही माणसं धजावतात. शिक्षण असो की साहित्य यासारख्या संस्था म्हणजे समाजासाठी दीपस्तंभ. सामाजिक, राजकीय गदारोळात विचारांचे, विवेकाचे अधिष्ठान देऊन समाजाला परिवर्तनाची वाट दाखविण्याचे काम त्यांनी करावे, ही रास्त अपेक्षा. मात्र, हे दीपस्तंभच अंधार पसरवू लागले, तर करायचे काय? प्रकाशासाठी कोणाकडे पाहायचे. एका संस्थेपुरते, एका निवडणुकीपुरते हे प्रकार मर्यादित राहात नाहीत. स्वच्छ, पारदर्शक आणि काटेकोर निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीची पहिली अट असते. सामाजिक क्षेत्रात काम करणारे जबाबदार विचार करणारे आणि संयत असावे लागात. ते घडले नाही तर मूल्यांचाच ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही. खरी भीती तीच आहे...

Web Title: Directions are flowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.