प्रवचने फार झाली
By admin | Published: November 20, 2014 12:18 AM2014-11-20T00:18:28+5:302014-11-20T00:18:28+5:30
गेले वर्षभर देशाला ऐकविलेली तीच ती देशभक्तीपर प्रवचने लोकांना पांचट वाटू लागली असल्याने नरेंद्र मोदी आता जगातली व्यासपीठे शोधू लागले आहेत.
गेले वर्षभर देशाला ऐकविलेली तीच ती देशभक्तीपर प्रवचने लोकांना पांचट वाटू लागली असल्याने नरेंद्र मोदी आता जगातली व्यासपीठे शोधू लागले आहेत. न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअरवरील भाषणानंतर तोच विषय त्यांनी आता सिडनी येथे जमलेल्या भारतीयांच्या जमावासमोर त्याच आवेशात उगाळला. देशभक्तीपर भाषणे सुभाषितांनी भरलेली, उपदेशांनी सजलेली आणि भविष्याविषयीच्या स्वप्नांनी रंगलेली असतात. त्यातून प्रवचनकार चांगला वक्तृत्वबाज असेल तर ती ऐकायलाही बरी वाटतात. मात्र, त्यात तोच तोपणा येऊ लागला आणि हे केवळ शब्दांचे बुडबुडे असल्याची आणि त्यातून काहीएक वास्तव निष्पन्न होत नसल्याची जाणीव होऊ लागली की, संघातल्या बौद्धिकांना स्वयंसेवकांनी कंटाळावे, तसा या प्रवचनकाराचा श्रोतुवर्गही कंटाळू लागतो. दूरचित्रवाणीवर ऐकू येणारा तोच तो आवाजही मग लोकांना जाचक वाटू लागतो. नरेंद्र मोदींच्या प्रवचनवजा भाषणांचे आता नेमके असे होऊ लागले आहे. विदेशी बँकांमध्ये स्वदेशी लोकांनी दडवून ठेवलेला काळा पैसा सत्तेवर आल्यानंतर एक महिन्याच्या आत देशात परत आणू आणि तो प्रत्येक नागरिकाला दरडोई तीन लाख रुपये या हिशेबाने वाटून देऊ, हे त्यांचे सुभाषित लोकसभेच्या निवडणूक प्रचारात त्यांनी प्रथम उच्चारले. तेव्हापासून परवा आॅस्ट्रेलियात भरलेल्या जी २० राष्ट्रांच्या परिषदेतील व्यासपीठापर्यंत त्यांनी ते सतत जागत व गर्जत ठेवले. प्रत्यक्षात या पैशाचा शोध अजून भारताच्या न्यायालयात व अर्थ विभागाच्या चौकशी यंत्रणांत अडकला आहे. मोदी केवळ आर्थिक क्षेत्रातील उन्नतीचाच उच्चार करीत नाहीत; लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक श्रेष्ठत्व, जगाचे गुरुत्व, राष्ट्रीय एकात्मता, धार्मिक सलोखा, गरिबीचे उच्चाटन आणि सामाजिक समता इ. सारख्या प्रत्येकच विषयावर ते कमालीच्या उंचीची स्वप्ने आपल्या भाषणातून लोकांना ऐकवत असतात. यापैकी प्रत्यक्षात त्यांना काय साकारता आले याचे उत्तर ते स्वत: किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारीही देऊ शकणार नाहीत. काँग्रेस पक्षाने पाऊणशे वर्षांत जे केले नाही ते आम्ही पाऊणशे दिवसात केले, असे मोदींकडून व त्यांच्या पक्षाकडून केवळ सांगितले जाते; दाखविले मात्र जात नाही. त्यांच्या सुदैवाने देशातली बहुसंख्य माध्यमे व स्वत:ला स्वतंत्र म्हणविणारे पत्रकार त्यांच्या व त्यांच्या पक्षाच्या दावणीला आता बांधले आहेत. त्यामुळे मोदी देत असलेल्या अभिवचनांपैकी प्रत्यक्षात उतरलेली किती, न उतरलेली किती आणि अजिबात उतरू न शकणारी किती याचा हिशेब तीही समाजासमोर मांडत नाहीत. परिणामी दरवेळी एक नवी घोषणा विक्रीला काढणे आणि आपल्या चाहत्यांच्या व भगतांच्या टाळ्या मिळविणे एवढाच एक शब्दकल्लोळ पंतप्रधानांनी मांडला आहे. आपल्या बोलण्याचा आणि प्रत्यक्षातल्या घटनांचा संबंध तपासून पाहावा असे त्यांना व त्यांच्या चाहत्यांनाही वाटत नाही. भारत आणि चीन हे दोन देश आमच्या राजवटीत एकमेकांच्या अतिशय जवळ आले आहेत, हे मोदींनी अहमदाबादेत सांगितले, तेव्हा चीनचे लष्कर भारताच्या सीमेत घुसले होते आणि भारताच्या भूमीवर आपले लष्करी रस्ते तयार करीत होते. आम्ही पाकिस्तानला समजेल असा धडा शिकविला आहे, असे ते सांगत असताना पाकिस्तानचे लष्कर जम्मू आणि काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर सातत्याने गोळीबार करत होते आणि काश्मीरच्या प्रदेशात आपले टोळीवाले घुसविण्यात यशस्वी होत होते. भारताचे श्रीलंकेशी संबंध अतिशय दृढ व ऐतिहासिक आहेत असे ते म्हणाले, तेव्हाच नेमका श्रीलंकेच्या न्यायालयाने पाच भारतीय मच्छीमारांना मृत्युदंड दिल्याचे जाहीर झाले. अर्थव्यवस्था मजबूत होत आहे, सेन्सेक्सचा आकडा दरदिवशी उंचावत आहे, निफ्टीही मागे नाही हे आपण सारे वृत्तपत्रांत वाचतो. मात्र, त्याच वेळी चलनवाढ कमी होताना दिसत नाही आणि बाजारभाव पडतानाही दिसत नाहीत. खाद्यपदार्थ, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तू दिवसेंदिवस महाग होताना व सामान्य माणसापासून दूर जाताना पाहाव्या लागत असताना सरकार मात्र औद्योगिक कर्जांचे व्याज कमी करण्याची भाषा बोलताना दिसते. पंतप्रधान देशात कमी व विदेशात अधिक काळ असतात. त्याचमुळे लालुप्रसादांनी त्यांना एनआरआय पंतप्रधान असे म्हटले आहे. समाजाला या विसंगतीशी फारसे देणेघेणे नाही. मात्र, तुमची भाषा नेत्याची असावी, ती प्रवचनकाराची रंजक उक्ती होऊ नये, याची काळजी तुम्हीच घेतली पाहिजे, तेच तुमच्या हिताचे आहे.