विवाहसंस्थेतील पुरुषी दादागिरी ते समानतेची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 06:36 AM2019-01-14T06:36:03+5:302019-01-14T06:36:14+5:30
लैंगिकतेशी जोडलेले मानसशास्त्र हा त्यांच्या लेखनाचा मुख्य विषय असूनही त्यांनी त्या काळात समलिंगी संबंध, तृतीयपंथीयांचे प्रश्न यासारखे अनेक विषय हाताळले.
- डॉ. अनघा शैलेश राणे । इतिहासाच्या अभ्यासक
विवाहसंस्थेतील व्यक्तीसह समाजाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची चिकित्सा करणाऱ्या रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या आजच्या जयंतीनिमित्त पुन्हा चर्चेत येतोय तो विवाहसंस्थेचा, त्यातील स्त्रीच्या स्वातंत्र्याचा मुद्दा. सध्या समाजात मोकळेपणा असला, तरी स्त्री-पुरुष संबंधांवर खुलेपणाने चर्चा होत नाही, पण त्या काळी सनातन्यांचा विरोध पत्करून ‘समाजस्वास्थ्य’सारखे नियतकालिक चालवण्याचे धाडस त्यांनी २६ वर्षांहून अधिक काळ केले. कर्वे केवळ स्त्री स्वातंत्र्यवादी नव्हते, तर व्यक्तिस्वातंत्र्यवादी होते. कुटुंबव्यवस्थेतील विवाहित स्त्रीची घुसमट त्यांना मान्य नव्हती.
ते लिहितात, ‘स्त्री-पुरुष संबंध हा दोन माणसांचा खासगी व्यवहार आहे आणि तो चव्हाट्यावर आणण्याचे काहीच कारण नाही. पण विवाहसंस्थेमुळे तो चव्हाट्यावर येतो.’ मनाविरुद्ध, विषम विवाहात त्या काळी स्त्रियांचा होणारा कोंडमारा समाजस्वास्थ्यामधील खासगी पत्रव्यवहारातून, शारदेच्या पत्रातून त्यांना जाणवे. म्हणूनच त्यांनी ‘आजची विवाहसंस्था म्हणजे उंदरांचा सापळा आहे, त्यात शिरणे सोपे पण बाहेर पडणे अवघड आहे,’ असे परखड भाष्य केले होते. विवाहसंस्था नाकारण्याऐवजी त्यातील दोष, पुरुषांची दादागिरी दूर करून समानतेच्या नात्यावर त्याचा स्वीकार व्हावा, हा आग्रह त्यांनी धरला.
कर्वे विवाहसंस्थेवर हल्ला करीत असले तरीही मुलांच्या पालनपोषणासाठी कुटुंबाची गरज त्यांनी मान्य केली होती. आदर्श विवाह पद्धतीत कर्वेना व्यक्तिस्वातंत्र्य अपेक्षित होते. त्यांच्या मते कोणत्याही दोन व्यक्तीस एकत्र बांधून ठेवण्याचा समाजाला हक्क नाही. कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध एखाद्या मनुष्याशी मग तो तिचा नवरा का असेना शरीरसंबंध ठेवायला लावणे म्हणजे तिला शरीरविक्रय करणाºया महिलेपेक्षाही कमी लेखणे. कारण शरीरविक्रय करणाºया महिलेला त्याबाबत स्वातंत्र्य असते. परंतु विवाहाने परस्परांवर किंवा निदान परस्परांच्या शरीराच्या काही भागांवर मालकी हक्क उत्पन्न होतो, हेही त्यांनी अमान्य केले.
अतिरिक्त संततीमुळे कुटुंबाचे, राष्ट्राचे नुकसान होतेच, शिवाय स्त्रीच्या शरीराची न भरून येणारी हानी होते, यावर ते परखड भूमिका घेत. ज्या काळी मुले ही परमेश्वराची देणगी समजली जाई, त्या काळी सनातन्याचा प्रखर विरोध सहन करत अनेक आर्थिक आणि सामाजिक समस्यांना तोंड देत कर्वे यांनी संततिनियमनाचे कार्य केले. पत्नी मालतीबार्इंसमवेत त्यांनी राइट एजन्सीच्या माध्यमातून संततिनियमनाची साधने अल्पदरात विकली. त्यांचा वापर शिकवला. संततीबाबत कोणत्याही धर्माचा पगडा त्यांना मान्य नव्हता. त्या काळातील कुटुंबातील भांडणाच्या कारणांचा वेध घेताना त्यांनी गरिबी व मुलांचा मारा, हे कलहाचे कारण असल्यावर बोट ठेवले. यासाठी त्यांनी अनेक परदेशी साहित्यही अनुवादित करून प्रसिद्ध केले. त्यासाठी साधी-सोपी भाषा वापरली. अनेक नव्या शब्दांची रचना केली. त्यामुळेच त्यांचे लेखन कधी नीरस, कंटाळवाणे झाले नाही. एखादे नियतकालिक प्रसिद्ध केल्यावर त्याच्या वर्गणीचा हिशेब देण्याची शिस्त त्यांनी पाळली. तत्कालीन अनेक सामाजिक प्रश्नांचा ऊहापोह त्यांनी केला.
लैंगिकतेशी जोडलेले मानसशास्त्र हा त्यांच्या लेखनाचा मुख्य विषय असूनही त्यांनी त्या काळात समलिंगी संबंध, तृतीयपंथीयांचे प्रश्न यासारखे अनेक विषय हाताळले. सुशिक्षित स्त्री जेव्हा आर्थिक आत्मनिर्भर बनेल, तेव्हाच लैंगिक व्यवहार बदलतील, ही त्यांची भूमिका आताच्या काळात अनेकांना पटते, यातच त्यांच्या विचारांचे द्रष्टेपण सामावलेले आहे.