आजार साखरेचा वाढला, पण गोडवा का घटला?

By किरण अग्रवाल | Published: November 16, 2017 08:30 AM2017-11-16T08:30:42+5:302017-11-16T08:31:18+5:30

साखरेचे खाणार त्याला देव देणार असे आजवर आपण म्हणत आलो असलो तरी आता तसे म्हणणे धोक्याचे ठरले आहे कारण साखरेच्या आजाराने देशात ब-यापैकी हातपाय पसरले असून, त्यामुळे आरोग्याची चिंता करण्याची वेळ आली आहे.

Disease increased, but the sweetness decreased? | आजार साखरेचा वाढला, पण गोडवा का घटला?

आजार साखरेचा वाढला, पण गोडवा का घटला?

Next

साखरेचे खाणार त्याला देव देणार असे आजवर आपण म्हणत आलो असलो तरी आता तसे म्हणणे धोक्याचे ठरले आहे कारण साखरेच्या आजाराने देशात ब-यापैकी हातपाय पसरले असून, त्यामुळे आरोग्याची चिंता करण्याची वेळ आली आहे. अर्थात, एकीकडे साखरेचा म्हणजे मधुमेहाचा आजार व रुग्ण बळावत असताना समाजाच्या मौखिक व्यवहारातील वा वर्तनातील गोडवा मात्र कमालीचा घसरत चालल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वैद्यक व समाजशास्त्रींकडून या दोन्ही पातळीवर चिंतन केले जाणे गरजेचे ठरले आहे.

भारतात साखरेच्या आजाराने उच्छाद मांडल्याचे चित्र असून, सन २०२५ पर्यंत आपला देश मधुमेहाच्या राजधानीचे स्थान प्राप्त करेल, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविला आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी १४ नोव्हेंबर रोजी मधुमेह दिन पाळला गेला. त्यानिमित्त उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, जगात सुमारे ४२ कोटी मधुमेहाचे रुग्ण असून, त्यापैकी एकट्या भारतात सर्वाधिक साडेसहा कोटींपेक्षा अधिक रुग्ण आहेत. म्हणजे आजच आपला देश यात अव्वल आहे. डॉक्टरांकडे प्रकृतीची तक्रार घेऊन जाणा-यांपैकी चौथा रुग्ण हा मधुमेहाचा असतो, अशीही एक आकडेवारी समोर आली आहे. ‘असोचेम’ या प्रथितयश संस्थेने मागे केलेल्या एका सर्वेक्षणातही याबाबतची चिंतादायक स्थिती आढळून आली होती. २०३५ पर्यंत मधुमेहींची संख्या आजच्यापेक्षा दुप्पट म्हणजे अंदाजे साडेबारा कोटींपर्यंत पोहोचण्याचा धोका या सर्वेक्षणाअंती निदर्शनास आणून देण्यात आला होता. ही सारी आकडेवारी ‘साखरे’च्या आजाराशी संबंधित असून, वैद्यकशास्त्रानुसार शरीरातील साखर कमी वा जास्त होणे या दोन्ही प्रकाराने आरोग्यास धोका उत्पन्न होणारा आहे. त्यामुळेच साखरेचा आजार वाढत असला तरी बोलण्यातला गोडवा का कमी होत चालला आहे, असा भाबडा प्रश्न उपस्थित व्हावा.

तसे पाहता गोडाने गोड व कडू खाल्ल्याने कडवटपणाचा प्रत्यय येत असल्याचे आपले आहार वा स्वभावशास्त्र सांगते. मधुर, आम्ल व लवण हे सत्त्वगुणात, तर कडू, तुरट, तिखट हे तामसी-तमोगुणात मोडणारे रसप्रकार आहेत. आहारातील शाकाहार व मांसाहारावरून स्वभावगुणांची अगर वर्तनाची चिकित्सा केली जाते ती त्यातूनच. परंतु आहारातील साखर कमी किंवा जास्त झाली तरी आरोग्याला जशी बाधा होते, तसा स्वभावावर का परिणाम होऊ नये; हा यातील मूळ प्रश्न आहे. याबाबत नाशकातील प्रख्यात आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य विक्रांत जाधव यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी साखर ही मधुर रसाची शरीरपोषक सत्त्वगुणातील बाब असली तरी तिचे अतिरेकी सेवन आरोग्यास घातक असल्याचेच सांगितले. हल्ली नैसर्गिक गोडापेक्षा रस्त्यावरील मिठाई किंवा आइस्क्रीमसारख्या पदार्थातील अनैसर्गिक साखरेचे सेवन अधिक होऊ लागल्यामुळेही मधुमेह विकाराला निमंत्रण मिळू लागल्याकडे वैद्य जाधव यांनी लक्ष वेधले. मधुमेहविकारतज्ज्ञ डॉ. समीर पेखळे यांनी भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पौष्टिकतेपासून दूर होत पाश्चात्त्य खाद्यपदार्थांकडे वाढलेला कल व व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहींची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविले. ज्येष्ठ व्यक्तींखेरीज तरुण पिढीही या विकाराला बळी पडत असल्याबद्दलची चिंता डॉ. पेखळे यांनी व्यक्त केली आणि यापासून दूर राहण्यासाठी तणावमुक्त दिनचर्या व व्यायामाची निकड प्रतिपादिली. मात्र आरोग्यावर परिणाम करणारी साखर स्वभावावर का परिणाम करीत नाही, यावर दोघा तज्ज्ञांचे ‘स्वभावाला औषध नाही’ हेच एकमत दिसून आले.

समाजव्यवस्थेच्या अंगाने या विषयाकडे पाहता, परिवारातली विभक्तता आज वाढलेली दिसून येते. नोकरी वा व्यापारानिमित्त तरुण पिढी गावातून शहराकडे धावते आहे. ज्येष्ठांचे त्यांना ओझे वाटू लागल्याने त्यातून विभक्तता ओढवते आहे. त्यामुळे संयुक्त कुटुंब पद्धतीत निचरा होणा-या कसल्याही ताण-तणावाची पिढीजात व्यवस्थाच कोलमडून पडली आहे. शिवाय, प्रत्येकजण आज धावतो आहे. या धावण्यातून वेळेची कमतरता उद्भवत असून, त्यात नोकरी करणा-या गृहस्वामीनींची भर पडल्याने घरी स्वयंपाक करण्याऐवजी पिझ्झा-बर्गरवर निभावण्याची सवय अनेकांना जडतांना दिसत आहे. विभक्ततेमुळे ओढवलेली संवादहीनता, एकटेपणामुळे येणारे ताण-तणाव, खाण्यातील जंकफूडचे वाढते प्रमाण व अशात व्यायामाचा अभाव; याच्या एकत्रित परिणामातून साखर आपला ‘गुण’ दाखवत असल्याचा निष्कर्ष काढता येणारा आहे. आजारात वाढलेली साखर स्वभावात का वाढत नाही, त्याला अशी अनेकविध कारणे देता यावीत. त्यामुळे समाजस्वास्थ्य कसे सुधारता येईल यादृष्टीनेही प्रयत्न केला गेल्यास शरीरातील व आहारातील साखर तर नियंत्रणात राहीलच, शिवाय व्यवहार व विहारातही त्या साखरेचा गोडवा दिसून येऊ शकेल.

Web Title: Disease increased, but the sweetness decreased?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य