बिघडलेले आरोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 06:04 PM2018-03-27T18:04:49+5:302018-03-27T18:04:49+5:30
सामान्य माणसाला आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून आरोग्य सेवेचे जाळे, पुरेसा औषधीसाठा, योजनांची यंत्रणा राबविण्यात येत असली तरी सार्वजनिक आरोग्य सेवेच्या ‘आरोग्यात’ सुधारणा होण्याचे नाव नाही. दिवसेंदिवस प्रकृती बिघडत चालली आहे. परंतु अचूक निदान व योग्य उपचार करण्याऐवजी तात्पुरत्या मलमपट्टीवर भर दिला जात आहे.
सामान्य माणसाला आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून आरोग्य सेवेचे जाळे, पुरेसा औषधीसाठा, योजनांची यंत्रणा राबविण्यात येत असली तरी सार्वजनिक आरोग्य सेवेच्या ‘आरोग्यात’ सुधारणा होण्याचे नाव नाही. दिवसेंदिवस प्रकृती बिघडत चालली आहे. परंतु अचूक निदान व योग्य उपचार करण्याऐवजी तात्पुरत्या मलमपट्टीवर भर दिला जात आहे. भाजपाचे असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत आरोग्य यंत्रणेचे वाभाडे काढले हे बरे झाले. किमान सामान्य माणसाची व्यथा आणि वेदना खडसे यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ही यंत्रणा हलेल ही अपेक्षा नव्हतीच. कारण झोपलेल्याला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे जागे करणार? आता हेच पहा ना! राज्याचे कार्यक्षम आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत हे गेल्या महिन्यात एकदाचे नंदुरबार दौऱ्यावर आले. यापूर्वी दोनदा त्यांचा दौरा रद्द झाला होता. त्यामुळे या दौ-याचे कौतुक होते. नंदुरबारला त्यांनी आढावा बैठक घेतली आणि अक्कलकुव्यात पाहणी केली. अनेक आश्वासने दिली. पण मंत्र्यांची आश्वासनेच ती, अंमलात येतील तेव्हाच खरे मानायचे. मंत्र्यांची पाठ फिरताच सजग आणि सतर्क झालेली आरोग्य यंत्रणा पुन्हा सुस्तावली. काही जागरुक, कर्तव्यतत्पर अधिका-यांनी नर्मदा काठच्या आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या असता काही केंद्रांना नेहमीप्रमाणे कुलूप आढळले. जी केंद्रे चक्क उघडी होती, तिथे अधिकारी वा कर्मचारी नव्हते. जिथे हजर होते, तेथील औषधी मुदतबाह्य होती. अशी यंत्रणा ‘सक्षम’ असेल तर आदिवासी बांधवांचे आरोग्य आणि त्यांच्या मुलांमधील कुपोषणाची समस्या सुटलीच म्हणून समजा. धुळ्यात वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीनंतर जिल्हा रुग्णालयाच्या जागेत होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात नवीन पदे भरली गेली नाही, होती ती पदे वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वर्ग झाली. आता महाविद्यालय गावाबाहेर गेले आणि जिल्हा रुग्णालय मोजके वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी आणि अपु-या औषधी साठ्यासह नागरिकांच्या असंतोषाला सामोरे जात आहे. हीच परिस्थिती पुढे जाऊन जळगावात निर्माण होणार आहे हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही. वैद्यकीय महाविद्यालय चिंचोलीला गेल्यावर गावातील सामान्य रुग्णालय रुग्णांना सोयीचे ठरणार आहे. पण तेथेही धुळ्यासारखीच स्थिती होईल. आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग या दोन खात्यांमध्ये सामान्य माणसाचे आरोग्य विभागले गेल्याचे चित्र आहे. आरोग्य शिबिरे आणि आरोग्यदूतांची संख्या वाढत असताना रुग्णालये सक्षम कशी होतीत, हे बघायला कुणाला वेळ नाही. निवडणुकीच्या राजकारणात आणि सवंग लोकप्रियतेच्या काळात आरोग्य शिबिरे भरविणे, रुग्णवाहिकेद्वारे मुंबईला नेणे सोयीचे ठरते. पण योग्य उपचार, औषधी मिळतील, याची शाश्वती कोण देणार? हा प्रश्न आहेच.