आजचा अग्रलेख: ही चिखलफेक आता पुरे!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 10:58 AM2022-03-01T10:58:14+5:302022-03-01T10:59:09+5:30

दिशाची आई वासंती सालियन यांनी राणे पिता-पुत्रांविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात मुलीची बदनामी केल्याबद्दल तक्रार दाखल करण्याचे धैर्य दाखवले.

disha salian issue politics and this mudslinging is enough now | आजचा अग्रलेख: ही चिखलफेक आता पुरे!

आजचा अग्रलेख: ही चिखलफेक आता पुरे!

Next

दिशा सालियन ही समजा एखाद्या बड्या राजकीय नेत्याची किंवा प्रख्यात उद्योगपतीची मुलगी अथवा सून असती तर तिच्या आत्महत्येनंतर तिच्या मृत्यूबाबत वावड्या उठवण्याची वावदुकी करायला कुणी धजावले नसते. दिशा ही एका मध्यमवर्गीय घरातील मुलगी असल्याने तिच्यावर बलात्कार केला गेला व त्यामुळे तिने जीव दिला, अशी बेताल बडबड करण्यास केंद्रीय मंत्री नारायण राणे धजावले. त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी वडिलांच्या वक्तव्याची री ओढणारे ट्विट केले. 

दिशाची आई वासंती सालियन यांनी राणे पिता-पुत्रांविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात मुलीची बदनामी केल्याबद्दल तक्रार दाखल करण्याचे धैर्य दाखवले. राणे यांच्या दहशतीचा पूर्वेतिहास पाहता तक्रार दाखल करणाऱ्या सालियन यांना आता त्रास दिलाच जाणार नाही, असे म्हणता येणार नाही. मुळात हे सर्व प्रकरण सुशांतसिंग राजपूत या अभिनेत्याच्या मृत्यूनंतर सुरू झाले. सुशांतसिंगने आत्महत्या केल्यावर या संपूर्ण घटनेचे कनेक्शन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी जोडण्याचा जीवतोड प्रयत्न भाजपच्या नेत्यांनी केला. बिहार निवडणुकीच्या तोंडावर तिकडेही या प्रकरणाला हवा देण्याची धडपड केली. राजकारण प्रवेशाची तहान लागलेल्या गुप्तेश्वर पांड्ये नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने तक्रार दाखल करून चौकशी सुरू केली होती. सीबीआयने हे प्रकरण हाती घेतले व तपास केल्यानंतर आजतागायत ते दिशा सालियन हिची हत्या झाली, हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला, दिशा व सुशांतसिंग यांच्या मृत्यूमागे परस्पर संबंध असून हे दोन्ही खून पचवण्याचा प्रयत्न केला गेला वगैरे राजकीय नेत्यांनी व्यक्त केलेली गृहीतके कायद्याच्या कसोटीवर सिद्ध करू शकले नाहीत. 

समजा या प्रकरणात ठाकरे कुटुंबातील सदस्याला गोवणे शक्य असते तर ती संधी भाजपने अजिबात सोडली नसती. दिशाच कशाला, आरुषी तलवार या अल्पवयीन मुलीच्या हत्येबाबतचे सत्य शोधण्यातही सीबीआय सपशेल अपयशी ठरली होती. अगोदर आरुषीला नोकराने बलात्कार करून ठार केले या दिशेने तपास केला गेला. त्यानंतर आरुषीला तिच्या आई-वडिलांनीच मारले या दिशेने तपास करूनही ते कायद्याच्या कसोटीवर सिद्ध करण्यात सीबीआय अपयशी ठरले. राज्यात भाजपला सत्ता स्थापन करू न देता तीन पक्षांची महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून आरोपांची राळ उडवून द्यायची व वेगवेगळ्या व्यक्तींविरुद्ध नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा खेळ सुरू झाला आहे. सुशांतसिंग प्रकरणात दिशाचा वापर त्याच हेतूने केला गेला. ठाकरे कुटुंब व बॉलिवूड यांचा दीर्घकाळापासून घनिष्ठ संबंध आहे. 

आदित्य यांचेही अनेक बॉलिवूड कलाकार मित्र आहेत. ते पार्ट्यांना हजेरी लावत असतात.  त्यांच्या याच सवयीमुळे त्यांची ‘नाईटलाइफमध्ये रममाण नेता’, अशी प्रतिमा निर्माण करण्याकरिता दिशावरील बलात्काराची कहाणी रचली गेली. प्रत्यक्षात आर्थिक व्यवहारांमध्ये अपयश आल्याने नैराश्यातून दिशाने आत्महत्या केली, असे तिच्या आईचे म्हणणे आहे. एखाद्या अजाण मुलीसोबत गैरवर्तन झाल्यावरही अनेक माता पोलिसात तक्रार दाखल करतात व आरोपींना गजाआड घालतात. दिशा ही तर वयात आलेली मुलगी होती. त्यामुळे तिच्यासोबत कुणी गैरवर्तन केले असते तर तिने व तिच्या आईने ते कशाला सहन केले असते? केंद्रात भरभक्कम सत्ता असलेल्या भाजपची मदत घेऊन या माय-लेक राज्यातील सरकारविरुद्ध उभ्या राहिल्या असत्या. 

आर्यन खान प्रकरणातही हेच घडले. राज्यातील सरकारला व शाहरूख खानला अडचणीत आणण्याकरिता अमली पदार्थांचा कसा राजरोस व्यवहार सुरू आहे हे भासवण्याकरिता एनसीबीने कारवाई केली. नवाब मलिक यांनी बारकाईने पुरावे गोळा करून एनसीबीच्या कारवाईचा पोकळपणा उघड केला. येथेही प्रतिमाभंजन हाच हेतू होता. भाजपने २०१४ पूर्वीपासून देशात सुरू केलेल्या प्रतिमा भंजनाच्या खेळाला आता विरोधी पक्ष चोख उत्तर देऊ लागले आहेत. किरीट व नील सोमय्या यांचे जमिनींच्या खरेदीतील व्यवहार किंवा राज्यातील भाजप सरकारमधील आयटी विभागातील घोटाळा हे खा. संजय राऊत यांनी केलेले आरोप भाजपने सुरू केलेल्या खेळाला उत्तर आहे. चिखलफेकीचा हा खेळ विरोधकांना लोकांच्या नजरेतून उतरवण्याकरिता असतो. सोमय्या-राऊत यांनी तो अवश्य खेळावा. मात्र दिशाच्या आई-वडिलांसारख्या सर्वसामान्य माणसांना त्यामध्ये ओढू नये. शेणात लोळूनही वास समोरच्या व्यक्तीच्या अंगाला येतो हे सांगण्याचा निर्लज्जपणा सामान्यांच्या अंगी अजून आलेला नाही.
 

Web Title: disha salian issue politics and this mudslinging is enough now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.