उच्छृंखल माध्यमे

By admin | Published: December 1, 2015 02:11 AM2015-12-01T02:11:05+5:302015-12-01T02:11:05+5:30

मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला जे घवघवीत यश मिळाले, त्याचे सर्वस्वी श्रेय विद्यमान पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याचकडे जात असल्याने त्यांच्या त्या यशामुळे

Disorderly media | उच्छृंखल माध्यमे

उच्छृंखल माध्यमे

Next

मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला जे घवघवीत यश मिळाले, त्याचे सर्वस्वी श्रेय विद्यमान पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याचकडे जात असल्याने त्यांच्या त्या यशामुळे आता येती अनेक वर्षे मोदीच देशाचे मुख्य कारभारी असतील आणि काँग्रेसचे नामोनिशाण पुसून गेलेले असेल अशा कल्पनेच्या भरारी मारणाऱ्या माध्यमांनी आता लगेचच लोकसभेची येती निवडणूक (२०१९) म्हणजे नरेन्द्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यातील दुरंगी सामना असेल असे भाकीत वर्तवून तशी चर्चादेखील सुरु केली आहे. याला स्वच्छ शब्दात उच्छृंखलपणा म्हणतात. १९७७ साली जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली अनेक विळ्यांची आणि भोपळ्यांची एकत्रित मोट बांधली गेली व इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा लाजीरवाणा पराभव झाला. तसाच काहीसा प्रकार गेल्या वर्षीच्या लोकसभेच्या निवडणुकीतही झाला होता. त्याच किंवा तशाच समीकरणाची पुनरावृत्ती मागील महिन्यात पार पडलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत झाली. भाजपाला शह देण्यासाठी त्या राज्यातील नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव हे परस्परांचे राजकीय विरोधक एकत्र आले, त्यांनी काँग्रेसला सोबत घेतले आणि भाजपाची अत्यंत दयनीय अवस्था करुन टाकली. या एकीकरणाशिवाय आणखीही काही घटक तिथे महत्वाचे ठरले होते. बिहार भले देशातील एक मोठे राज्य असले तरी त्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावरुन नितीशकुमार यांना देश पातळीवरील नेतृत्व बहाल करणे आणि तसे करताना पुन्हा काँग्रेसला मोडीत काढणे म्हणजे अतीच झाले. नितीशकुमार यांच्या शपथविधीसाठी देशातील बहुतेक साऱ्या विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते या एका बाबीवरुन माध्यमे असे तर्काचे इमले उभारु लागली आहेत. पण देशातील एका अन्य मोठ्या राज्याचे नेते मुलायमसिंह यादव शपथविधीला हजर नव्हते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंंद केजरीवाल यांनी नितीश मान्य पण त्यांची लालूंशी दोस्ती अमान्य असे त्यांच्या स्वभावास अनुसरुन भोंगळ विधान केले होते, हे विसरता येत नाही. नितीश, लालू, मुलायम, ममता, जयलललिता आणि तत्सम सारे नेते आणि त्यांचे पक्ष केवळ त्यांच्या राज्यांपुरते मर्यादित असल्याने त्यापैकी कोणालाच देशव्यापी ओळख नाही. ती आज आहे केवळ भाजपा आणि काँग्रेस याच पक्षांना. काँग्रेसवर जसा एका घराण्याचा पगडा आहे तसा भाजपावर संघाचा पगडा आहे. त्यामुळे २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीत संघ-भाजपाची दारोमदार मोदींवरच राहील याचा तरी भरवसा काय? पंतप्रधानपदासाठी मोदींचे नाव जाहीर होण्यापूर्वी यावेळी लालकृष्ण अडवाणीच मुख्य नेते असतील असे खुद्द भाजपाच्याच लोकाना वाटत नव्हते?

Web Title: Disorderly media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.