रेल्वे प्रवासाचा बेभरवसा वाढत चाललाय!
By किरण अग्रवाल | Published: November 13, 2022 11:17 AM2022-11-13T11:17:30+5:302022-11-13T11:18:25+5:30
Indian Railway : आरक्षण करून झालेल्या गाड्या ऐनवेळी रद्द होण्याचे प्रमाण वाढल्याने तर हा मनस्ताप होतोच, शिवाय सोयीसुविधांच्या अभावातूनही त्यात भरच पडते.
- किरण अग्रवाल
रेल्वे रद्द होण्याचे किंवा तिचे मार्ग बदलण्याचे प्रकार अलीकडे वाढले असून, त्यामुळे अनेकांची मोठी गैरसोय होते, याचबरोबर रेल्वेस्थानकांवरील सुविधांकडेही दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी पुन्हा ‘बहुजन हिताय’चे ब्रीद जोपासणाऱ्या आपल्या एसटीकडेच वळले तर आश्चर्य वाटू नये.
सुरक्षित व आरामदायी प्रवास म्हणून रेल्वेकडे प्रवाशांचा ओढा अधिक असला तरी हल्ली रेल्वेचा प्रवास मनस्तापदायी ठरू लागला आहे. प्रवाशांनी आरक्षण करून झालेल्या गाड्या ऐनवेळी रद्द होण्याचे प्रमाण वाढल्याने तर हा मनस्ताप होतोच, शिवाय सोयीसुविधांच्या अभावातूनही त्यात भरच पडते. त्यामुळे शक्य ती कामे तातडीने मार्गी लावणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
दळणवळणाच्या सुविधेत रेल्वेसेवा अत्यंत महत्त्वाची मानली जाते; परंतु केंद्राच्या अखत्यारित ही सेवा असल्याने स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष प्रवाशांच्या मुळावर उठत असल्याचे चित्र आहे. अकोल्याचेच उदाहरण घ्या, रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजनमध्ये प्रवासी तिकीट विक्रीबाबत अकोला हे दुसऱ्या क्रमांकाचे महसूल देणारे रेल्वेस्थानक आहे; परंतु येथील सोयीसुविधांबाबत वारंवार तक्रारी व पाठपुरावा करूनही त्या मार्गी लागत नसल्याचे दिसून येते. रेल्वेचे विभागीय प्रबंधक (डीआरएम) अकोल्यात पाहणीसाठी येतात, परंतु स्थानिक रेल्वे मंडळावरील सदस्यांना निमंत्रित करून त्यांच्याकडून समस्या जाणून घेण्याचेदेखील भान राखले जात नाही. यावरून रेल्वे अधिकाऱ्यांची बेफिकिरी व उद्दामपणा स्पष्ट व्हावा.
अकोला रेल्वेस्थानकावरून सकाळी ५ ते ८ व सायंकाळी ६.३० ते ९ या वेळेतच सर्वाधिक गाड्यांचे आवागमन होत असते. यावेळात स्थानकाबाहेर पार्किंगची मोठी समस्या भेडसावते, मात्र ‘ड्रॉप अँड गो’च्या सुविधेव्यतिरिक्त फारसे प्रयत्न केले जाताना दिसत नाहीत. वारंवारच्या पाठपुराव्यानंतर प्लॅटफॉर्मवरील निवारा शेड्स वाढविण्यात आले आहेत व लिफ्टही सुरू करण्यात आली आहे; परंतु सरकत्या जिन्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून जे रखडले आहे ते पूर्ण होऊ शकलेले नाही. स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांना आपले कर्तव्य बजावण्यापलीकडे या शहरातून जा- ये करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधांबाबत स्वारस्य का नसावे, हा यातील महत्त्वाचा प्रश्न आहेच; पण त्यांच्या दुर्लक्षाकडे वरिष्ठ स्तरावरूनही लक्ष पुरविले जात असल्याने संबंधितांच्या बेफिकिरीत भर पडत आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
अकोला ते खंडवा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पापैकी अकोला ते अकोट या ४४ किमी लांबीच्या पट्ट्याचे गेज परिवर्तन होऊन व या मार्गावर ताशी ११० प्रतितास वेगाने रेल्वे गाडी चालवून यशस्वी चाचणी घेतल्याच्या दोन वर्षांनंतरही या मार्गावर रेल्वे गाडी सुरू करण्यात आलेली नाही. अलीकडेच या मार्गावरील पूर्णा नदीवरील पुलास तडा गेल्याने रस्ता वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अकोल्याहून अकोटला जाण्यासाठी किंवा अकोटहून अकोला येण्यासाठी लांबच्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. अशात अकोला ते अकोट रेल्वे सुरू असती तर नागरिकांची सोय झाली असती.
अकोला ते अकोट शटल सेवा सुरू करण्याची मागणीही लोकप्रतिनिधींनी फार पूर्वीपासून चालविली आहे. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चाही केली. त्यांनी अकोला ते अकोट शटल सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत; पण त्याबाबतही पाठपुरावा होताना दिसत नाही. परभणी-पूर्णा-हिंगोली-वाशिम-अकोला मार्गे प्रस्तावित असलेली जालना-छपरा ही साप्ताहिक विशेष गाडी अखेर जालना-औरंगाबाद-मनमाडमार्गे छपराकडे वळविण्यात आली. यामुळे ब्रॉडगेज होऊन अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही मोजक्याच गाड्या सुरू असलेल्या पूर्णा-अकोला मार्गाच्या पदरी पुन्हा एकदा उपेक्षाच आली आहे. दुसरीकडे उत्तर भारतात जाण्यासाठी थेट रेल्वेची मागणी करणाऱ्या अकोला, वाशिम व हिंगोली जिल्ह्यातील प्रवासी संघटनांमधून नाराजीचा सूर कायम आहे.
महत्त्वाचे म्हणजे, मध्य रेल्वेद्वारे सध्या तिसरी व चौथी रेल्वेलाइन टाकण्यासाठी ठिकठिकाणी मेगाब्लाॅक घेण्यात येत आहे. पुढील आठवड्यात मुंबईजवळ एका पुलाचे पाडकाम होणार असल्याने अनेक गाड्या दोन-तीन दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. गत दोन महिन्यांपासून गाड्या रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये महाराष्ट्र एक्स्प्रेस सर्वाधिक वेळा रद्द केली गेली. विदर्भातील जनतेला मुंबईला घेऊन जाणारी विदर्भ एक्स्प्रेस व अमरावती-मुंबई एक्स्प्रेसही अनेकवेळा रद्द करण्यात आली. यामुळे तिकीट खिडकीवरून आरक्षण केलेल्या प्रवाशांना पूर्वसूचना न मिळता ऐनवेळी मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकांना वेळेत न पोहोचल्याने नुकसानीलाही सामोरे जावे लागते.
सारांशात, रेल्वेच्या अखंडित व सेवांच्या नियमितकरणाकडे लक्ष देतानाच स्थानिक स्थानकावरील सोयीसुविधांच्या पूर्ततांबाबत काळजी घेतली जाणे गरजेचे आहे.