दिठी : श्वासात भरून घ्यावा, उरात जपावा असा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 09:20 AM2021-06-12T09:20:21+5:302021-06-12T09:21:26+5:30
उन्मळून टाकणारं दु:ख किंवा हरखवून टाकणारं सुख भोगणाऱ्या माणसांची पाऊस-भिजली अनोखी कहाणी
- शर्वरी कलोती-जोशी
एका खेड्यातलं रामजी लोहाराचं कुटुंब! प्रौढ रामजी, त्याचा तरणाताठा मुलगा व पोटुशी सून! बरं चाललेलं असतं त्यांचं!
काही काळासाठी सांसारिक व्यापातून अलिप्त होऊन विठोबाच्या वारीला तीसेक वर्षं नेमानं जाणारा रामजी हा तसा श्रद्धाळू इसम! जमलं तर पुण्यसंचय होईल आणि आयुष्याच्या वाटेवर पुढंमागं कधी संकंटांचा सामना करावा लागला, तर दरवर्षीच्या वाऱ्यांची पुण्याई कामात येईल असा साधा सरळ हिशेब असणारा मर्त्य माणूस!
पण हातातोंडाशी आलेला त्याचा तरुण मुलगा गावच्या ओढ्यात वाहून जातो व मृत्युमुखी पडतो. रामजीला हा पराकोटीचा दुर्दैवी आघात सहन होत नाही. त्यातच त्याची सून एका मुलीला जन्म देते. सुनंच्या पोटी मुलगाच परतून येईल, या भाबड्या आशेवर असलेला रामजी सुनेला मुलगी झाली, हे स्वीकारूच शकत नाही. तो अधिकाधिक कठोर होत जातो. स्वत:शी, सुनेशी आणि त्या नव्या कोवळ्या बाळाशीदेखील वैर धरतो. नजरेसमोर नको होते त्याला सून व ते नवजात बाळही!
विख्यात लेखक दि.बा. मोकाशी यांच्या ‘आमोद सुनांसी आले’ या कथेवर आधारित ‘दिठी’ या सिनेमात अक्षरश: प्राण ओतलाय तो सुमित्रा भावे यांनी. अविरत कोसळणारा पाऊस, दाटलेलं मळभ आणि त्याच्याशीच लगटलेला सभोवताल कॅमेऱ्यानं हुबेहूब टिपलाय. किशोर कदम, डाॅ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, उत्तरा बावकार, अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णी, अंजली पाटील यांनी या व्यक्तिरेखांना पडद्यावर बेमालूम उतरवलं आहे.
उन्मळून टाकणारं दु:ख किंवा हरखवून टाकणारं सुख… सारं काही विठ्ठलाच्या साक्षीनंच भोगायचं किंवा त्यागायचं अशा वारकरी परंपरेची जपणूक करणारी भोळीभाबडी माणसं हे रामजीचे सवंगडी! ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या दोन ग्रंथांना आपलं मार्गदर्शक मानणारे… जीवनातल्या साध्यासोप्या प्रश्नांची उत्तरंदेखील यांच्या पारायणातून शोधू पाहणारी ही माणसं! जीवन जगत राहण्यासाठीची, सुख-दु:खाला सामोरं जाण्यासाठीची प्रेरणा विठ्ठलाठायी शोधणारी आणि त्यावरच्या अपार श्रद्धेलाच आपला तारणहार मानणारी.
संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान तीस वर्षे आळंदीच्या वाऱ्या करूनही रामजीला कळत नाही, ते केवळ एका प्रसंगानं त्याला उमगतं. गावातल्या एका अडलेल्या गायीची अतिशय कठीण प्रसूती करवताना रामजीला हा साक्षत्कार होतो. मातृत्वाच्या वेणांच्या वेदना अनुभवताना जणू त्याचाही पुनर्जन्म होतो. गायीसारखीच आपली सूनही तडफडली असेल. बाळाला जन्म देताना ही जाणीव होते आणि दु:खावेगाची झड ओसरून विशुद्ध झालेल्या अंत:करणात कैवल्याचं चांदणं पसरतं. विधवा सून व नातीसाठी स्वीकाराचा भाव उरात जन्म घेतो.
सुख- दु:ख, जीवन- मृत्यू हे जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. आपल्याला हे एकदा स्वीकारता आलं की सुख- दु:ख, जन्म आणि मृत्यू हे पॅराडाॅक्स एकच होऊन जातात- जसं नृत्य आणि नर्तक, फूल आणि फुलपाखरू. स्वत:ला त्याच्या चरणी विलीन करता येणं हे जमायला हवं. रामजीला झालेला हा साक्षात्कार! सुमित्रा भावेंनी इहलोकीची यात्रा संपवण्यापूर्वी मराठी सिनेमासाठी ‘दिठी’ हा अमृतानुभव मागं ठेवून दिला आहे.