किशोरीतार्इंच्या गाण्याला दैवी स्पर्श

By admin | Published: April 5, 2017 05:20 AM2017-04-05T05:20:08+5:302017-04-05T05:20:08+5:30

किशोरीताई आमोणकर यांच एक ऋषितुल्य, तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते

The divine touch of teenage songs | किशोरीतार्इंच्या गाण्याला दैवी स्पर्श

किशोरीतार्इंच्या गाण्याला दैवी स्पर्श

Next


किशोरीताई आमोणकर यांच एक ऋषितुल्य, तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते. त्यांना गायनाचा खऱ्या अर्थाने दैवी स्पर्श लाभला होता. त्यांच्या गायनात एक वेगळाच आविष्कार होता. ज्या रसिकजनांना त्यांच्या मैफलीत समोर बसून त्यांना ऐकायला मिळाले, ते एकप्रकारे भाग्यवानच आहेत. त्यांच्या गायनात एक वेगळीच अनुभूती होती. जोड राग गायन ही त्यांची खासियत होती. अनेक रागांवर त्यांचा हातखंडा होता. राग मांडणीचा विचार पहिल्यांदा त्यांनी रुजवला. एखादा राग गाताना त्या स्वत: एक राग होऊन जायच्या. मला त्यांच्या अनेक मैफली ऐकायला मिळाल्या. भूप हा राग त्या प्रत्येक वेळी वेगळ््याप्रकारे गायच्या. त्या गायनास बसल्या की, आपल्या गायनात तल्लीन होऊन जायच्या. आपल्या सोबतच प्रेक्षकांना त्या एका वेगळ््याच दुनियेत घेऊन जात असत. गाण्यातून आनंद लोकांपर्यंत त्या पोहोचवत असत. त्या महान कलावंत होत्या. त्या आपल्यात नाहीत, हा माझ्यासाठी धक्काच होता. हा धक्का पचवायला मला वेळ लागला. पुण्यात त्या नुकत्याच गाऊन गेल्या होत्या. दिल्लीतही त्यांची मैफल रंगली होती. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्या कार्यरत होत्या. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी अविरत संगीताची सेवा केली. त्यांच्या घरी जायचे भाग्य मला लाभले. आमच्या भेटीत त्या मला म्हणाल्या, ‘तुझं गाणं एकते मी टीव्हीवर. चांगले गातेस, चांगले काम करत आहेस.’ ही माझ्यासाठी मोठी पावती होती. त्यांना श्रोत्यांचे मोठे प्रेम मिळाले. खूप कमी गायक हे बुद्धिवंत असतात. त्यापैकी त्या एक होत्या. आपल्या गाण्यातून गहन गोष्ट सोपी करून त्या रसिकांना त्या सांगत. श्रृतींच्या गायनात त्यांचा हातखंडा होता. गाणे त्या अधिक रंजक करायच्या. शास्त्रीय गायनासाठीच एक जन्म पुरेसा पडणार नाही, असे त्या म्हणत. एकाच पठडीतील गाणे त्या सातत्याने गात राहिल्या. आमच्या पिढीसाठी त्या एक आदर्श होत्या. बुद्धी आणि भाव म्हणजे किशोरीतार्इंचे गाणे होते. त्यांचे गाण्यावरील संस्कार कायम पृथ्वीतलावर राहिले. त्यांच्या सुरांची कंपने नेहमीच आपल्यात राहातील.
- सावनी शेंडे, प्रसिद्ध गायिका
त्यांचे गाणे कधीच
विसरले जाणार नाही
‘गानसरस्वती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किशोरी अमोणकर यांनी रागाची सुरेश मांडणी कशा प्रकारे करावी याचा आदर्श घालून दिला. जयपूर घराण्याचा वारसा त्यांना लाभला होता. ‘अवघाची रंग एक झाला’ या गाण्याने मराठी माणसाला वेड लावले. मराठी माणसाच्या कानातील त्यांचे गाणे कधीच विसरले जाणार नाही. गायिकीबाबत आस्था असलेल्यांच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो.
- शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री
दैवी स्वर लाभलेल्या गानतपस्विनी
भारतीय शास्त्रीय संगीत मोठ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात ज्या निवडक लोकांचे मोलाचे योगदान आहे, त्यामध्ये किशोरी आमोणकर यांचे स्थान फार वरचे आहे. आपण परिश्रमाने प्राप्त केलेले ज्ञान शिष्यवर्गाला मुक्त हस्ते दिले. त्यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राने एक लखलखता तारा गमावला आहे. त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण आदरांजली.
- सी.विद्यासागर राव, राज्यपाल
हिंदुस्थानी संगीतावर फार मोठा आघात
किशोरीताईंच्या निधनाने हिंदुस्थानी संगीतावर फार मोठा आघात झाला आहे. एक अतिशय सुरेली, रसेली, बुद्धिमान गायिका अचानक निघून गेली. जयपूर घराण्याला किशोरीतार्इंनी आपल्या गायकीने समृद्ध केले. त्या घराण्याच्या कक्षा रुंदावल्या. त्यांच्या स्वभावातल्या विरोधाभासाची झलक त्यांच्या गाण्यातही दिसून यायची, पण त्यामुळे ते गाणे अधिक सुंदर व्हायचे. त्यांच्या निधनाने भारतीय अभिजात संगीताची अपरिमित हानी झाली आहे.
- डॉ. प्रभा अत्रे, ज्येष्ठ गायिका

स्वत:ची शैली
मी लहानपणापासून त्यांचे गाणे ऐकत आलो आहे. त्यांनी स्वत:ची अशी शैली निर्माण केली. आतून प्रेरणा आल्याशिवाय अशी शैली निर्माण करता येत नाही. केवळ स्वत:पुरतीच नव्हे, तर जयपूर घराण्यात त्यांनी स्वत:ची वेगळी अशी शैली निर्माण केली. संगीतातील आध्यात्म स्थितीला त्या पोहोचल्या होत्या.
- पं. सुरेश तळवलकर,
तालयोगी तबलावादक

संगीतात विविध प्रयोग
किशोरीतार्इंनी संगीतात विविध प्रयोग केले. त्यांच्या गाण्याने डोळ्यांत अक्षरश: पाणी यायचे. त्यांच्या गाण्याने त्यांनी जगभरातल्या संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले.
- श्रीधर फडके,
ज्येष्ठ गायक, संगीतकार

माझे वैयक्तिक नुकसान
किशोरीताई आमोणकर गेल्याने, माझे वैयक्तिक नुकसान झाले. एकदा माझ्या वडिलांचा संगीताचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला किशोरीताई उपस्थित होत्या. किशोरीताई आल्याने बाबा तेव्हा घाबरले. मात्र, कार्यक्रमानंतर किशोरीतार्इंनी मला फोन करून सांगितले, ‘तुझे बाबा खूप छान गातात. बाबांना घरी घेऊन ये.’ किशोरीतार्इंनी मला दिलेली शाल आणि भेटवस्तू मी अजून जपून ठेवल्या आहेत.
-विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेते

सर्वाेच्च कलावंत
किशोरीतार्इंचे गाणे ऐकून खूप काही शिकायला मिळाले. माझ्या मनात त्यांचे आदराचे स्थान कायम राहील. शिष्यवर्गात त्यांचा एक प्रकारचा दरारा होता, पण हा दरारा प्रतिभेच्या दृष्टीने होता. मी त्यांचा शिष्य नसलो, तरी त्यांचे माझ्या गाण्याकडे कायम लक्ष होते. त्या सर्वोच्च दर्जाच्या कलावंत होत्या.
- संजीव अभ्यंकर, शास्त्रीय गायक

योगदान अमूल्य
एखाद्या मुलाला आई गेल्यावर जे दु:ख होईल, तसेच आज मला दु:ख झाले आहे. आज पोरके झाल्याची भावना मनात आहे. किशोरीताई भारतीय संगीतासाठी एक देणगी होत्या. त्यांचे संगीतसृष्टीसाठीचे योगदान अमूल्य आहे.
- शशी व्यास, संगीततज्ज्ञ

घरातीलच व्यक्ती गेली
ताई संगीतातून बोलायच्या, तेव्हा त्यांचा संवाद स्वरातून हृदयातील संवेदनेपर्यंत पोहोचायचा. यातून एक नवे नाते निर्माण व्हायचे. माझ्या घरातील एक व्यक्ती गेल्यासारखेच मला वाटते आहे. तार्इंचे गाणे नेहमीच ऐकत राहावेसे वाटायचे. अशा व्यक्ती ५०० वर्षे जगल्या, तरी कमीच पडणार. आज त्या आपल्यात नाहीत याचे दु:ख आहे.
- महेश काळे, गायक
मृत्यू हा अटळ आहे, तो कुणालाच चुकलेला नाही. मात्र, सृजनाच्या टिपेला पोहोचलेला एखादा कलावंत जेव्हा या जगातून जातो, तेव्हा त्याचा देहच काय तो संपलेला असतो. त्याची निर्मिती कधीच संपत नाही. ती अक्षय, अविनाशी असते. असे अमरत्व घेऊन जन्माला आलेल्या जगाच्या पाठीवरच्या अगदी थोडक्या कलावंतांमध्ये किशोरीताई आमोणकर यांचा समावेश होतो. किशोतार्इंनी सुरांचे विज्ञान समजून घेत, त्याच्या आध्यात्माच्या गाभाऱ्यापर्यंत मजल मारली होती. तार्इंना डॉक्टर व्हायचे होते. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्या परीक्षा देऊ शकल्या नाहीत. त्यांना डॉक्टर होता आले नाही, हे भारतीय संगीत क्षेत्रावर झालेले उपकारच आहेत. त्यांच्या जाण्याने सप्तसूर पोरके झाल्यासारखे वाटताहेत.
- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक, जहाजबांधणीमंत्री

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या निधनाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक अनवट स्वर हरपला. किशोरीतार्इंची संगीत मैफल हा श्रोत्यांसाठी जीवनानुभव असायचा. त्यांच्या जाण्याने संगीतक्षेत्रात निर्माण झालेली पोकळी श्रोत्यांना जाणवत राहील.
- राधाकृष्ण विखे पाटील,
विरोधी पक्षनेते, विधानसभा
संगीत हे ‘सत्यम शिवम सुंदरम’च्या साक्षात्काराचे व आविष्काराचे साधन मानून आध्यात्मिकतेचा उत्कट आविष्कार करणाऱ्या संतांच्या रचना त्यांनी संगीतबद्ध करून सादर केल्या. संगीताचे भारतीय आध्यात्मिक अधिष्ठान स्वत:च्या तपस्येतून अभिजात संगीताद्वारे भारतीय रसिकांच्या मनात उतरवणाऱ्या गानसरस्वतीच्या पवित्र स्मृतींना आदरांजली.
- मोहन भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या निधनाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील तपस्वी गायिका आपण गमाविली आहे. शास्त्रीय संगीताचे सूर रसिकांसमोर उलगडून दाखविण्याचे सामर्थ्य त्यांच्या गायनामध्ये होते. सच्च्या आणि निर्भेळ सुरांवरची श्रद्धा यामुळे गानसरस्वती गायकी अलौकिक बनली.
- विनोद तावडे,
सांस्कृतिक कार्यमंत्री

Web Title: The divine touch of teenage songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.