घटस्फोटही मर्यादित असतो..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:21 AM2018-03-10T00:21:02+5:302018-03-10T00:21:02+5:30
बायकोला नव-यापासून घटस्फोट घ्यायचा होता. मैत्रिणीने विचारले...! का गं बाई..., असं काय झालं...! बायको म्हणाली, आमचं पटत नाही. माझ्या कोणत्याच मागण्या तो मान्य करीत नाही.
बायकोला नव-यापासून घटस्फोट घ्यायचा होता. मैत्रिणीने विचारले...! का गं बाई..., असं काय झालं...! बायको म्हणाली, आमचं पटत नाही. माझ्या कोणत्याच मागण्या तो मान्य करीत नाही.
अगं वेडे, मग घटस्फोट देऊन त्याला सुखी करण्याऐवजी संसारात राहून त्याला छळत राहणं चांगलं नाही का? आता मैत्रिणीचा हा सल्ला तिला आवडला की नाही हे माहीत नाही पण आमचे आजचे रायकीय पक्ष मात्र या सल्ल्यानुसार वागत आहेत एवढं मात्र खरं.
आता हेच पाहा ना! चंद्राबाबू नायडूंनी एनडीएसोबत संसार थाटला. पण मोदीसाहेब आपल्या मागण्या मान्य करीत नाही म्हणून काडीमोड घेण्यापर्यंत पाळी आली. आपल्या दोन मंत्र्यांना त्यांनी मोदी सरकारातून बाहेरही काढले. आता ते आपल्या सर्व खासदारांसमवेत एनडीएचा पाठिंबा काढून घेतील आणि मोदींना मोठा हादरा बसेल म्हणून मोदींचे आतले आणि बाहेरचे विरोधक जाम खूश होते. पण चंद्राबाबूंनी एनडीएतून बाहेर पडणार नाही असे लगेच जाहीर करून विरोधकांच्या या भावी आनंदावर विरजण घातले. बाबूंनीही विचार केला असेल महाराष्टÑात शिवसेना घटस्फोट न घेता सरकारला रोज ठोकून काढतच आहे मग आपण का मागे राहावे.
ंआता कुणी म्हणेल, एवढाच स्वाभिमान होता तर पाठिंबा काढून पूर्णपणे काडीमोडच का घेतला नाही. पण राजेहो, घटस्फोट का असा
एका दमात मिळतो का? कोर्टातही आधी ‘चारसहा महिने नांदून पाहा, मग विचार करा’ असा सल्ला दिला जातो. हे तर राजकारण आहे. येथे मान, स्वाभिमान वगैरे चालत नाही. कोकणातला स्वाभिमान दिल्लीत गहाण ठेवावा लागतो. वाघ फक्त डरकाळीच फोडतो. सत्तेतून बाहेर पडण्याचा स्वाभिमान दाखवत नाही.
चंद्राबाबूंनी एक तरी केले. सत्तेतील आपला सहभाग काढून घेतला. सेना मात्र योग्य वेळेची वाट पाहत सोडचिठ्ठीचा कागद तेवढा घेऊन फिरत आहे.
आताच्या राजकारणात आणखी एक पैलू दिसतो. ‘ठोशास ठोसा’. चंद्राबाबूंनी केंद्रातून दोन मंत्री काढून घेतले. मोदींनी त्याला प्रत्युत्तर देत आंध्रच्या मंत्रिमंडळातून भाजपाच्या दोन मंत्र्यांना राजीनामा देण्यास लावले. झाले फिट्टमफाट. तुम्ही लेनिनचा पुतळा फोडता, आम्ही श्यामाप्रसादांच्या पुतळ्याला हात घालतो. मग बहुतांशी पक्ष, गट या विद्वेषाच्या बीभत्स राजकारणात सामील होऊन आपली मळमळ बाहेर काढतात. मग यातून महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे पुतळेही सुटत नाहीत. राजकारणात धर्म आणणारे विघ्नसंतोषीही आपल्याकडे कमी नाहीत. एका ठिकाणी हनुमानाच्या मूर्तीचीही विटंबना झाल्याची घटना घडली. हे प्रकार कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही. पण काही राजकारणी यावर आपली पोळी शेकून घेत आहेत एवढे नक्की.
परवा एका ठिकाणी काही महाभागांनी महात्मा गांधींचा चष्माच फोडला म्हणे. हे महाभाग बहुतेक गांधीभक्त असावेत. आज देशात जे वातावरण निर्माण झाले, जी फोडाफाडी चालू आहे, ती पाहून आपल्या प्रिय बापंूनी पुन्हा एकदा ‘हे राम’ म्हणू नये ही त्यांची प्रामाणिक भावना असावी. असो! या निमित्ताने का होईना, पुतळ्यांना ‘झेड’ सुरक्षा मिळत आहे हेही नसे थोडके.
- दिलीप तिखिले