आनेवाला कल न भुलाएं, आओ, फिरसे दिया जलाएं...

By विजय दर्डा | Published: November 11, 2023 08:32 AM2023-11-11T08:32:20+5:302023-11-11T08:32:59+5:30

जगातल्या कुणीही अंधाराने भरलेल्या घनदाट रात्री हुंदके देत असेल, तर या दिवाळीच्या दिवसात, त्या माणसांसाठी आपला जीव कळवळला पाहिजेच!

Diwali 2023: Don't forget the upcoming season, come, light the lamp again... | आनेवाला कल न भुलाएं, आओ, फिरसे दिया जलाएं...

आनेवाला कल न भुलाएं, आओ, फिरसे दिया जलाएं...

- डाॅ. विजय दर्डा 
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

भरी दुपहरी में अंधियारा   सूरज परछाईं से हारा 
अंतरतम का नेह निचोडें,   बुझी हुई बाती सुलगाएं 
आओ फिरसे दिया जलाए...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची ही कविता आपणही वाचली असेल किंवा कधी तरी ऐकलीही असेल.  माझे भाग्य असे, की मला खुद्द अटलजींच्या समोर बसून ती ऐकण्याची संधी मिळाली. ‘आओ फिरसे दिया जलाए...’ याचा अर्थ काय? असे मी त्यांना विचारले होते. त्यांनी त्यांच्या चिरपरिचित शैलीने मिश्किल हसत माझ्याकडे पाहिले आणि कवितेच्या पुढच्या ओळी पुन्हा एकवल्या.

हम पड़ाव को समझे मंजिल
लक्ष्य हुआ आंखो से ओझल 
वर्तमान की मोहजाल में
आनेवाला कल न भूलाएं 
आओ फिरसे दिया जलाएं..
आज अटलजी आपल्यात नाहीत. पण त्यांची ही अमर कविता आपल्यामध्ये आहे. जेंव्हा जेंव्हा आपण ती वाचतो किंवा ऐकतो तेंव्हा एक नवी ऊर्जा मिळते. एक छोटासा दिवा ज्या प्रकारे आपल्या प्रकाशाने घनदाट अंधाराशी लढण्याची हिंमत दाखवतो, तशी हिंमत ही कविता पेरत जाते, हे निश्चित!
केवळ अटलजीच नव्हे तर दिवा लावण्याविषयी हरिवंशराय बच्चन यांचीही एक रचना तितकीच आशयपूर्ण आहे. ते लिहितात..
आज फिर से तुम बुझा दीपक जलाओ 
रागिणी, तुम आज दीपक राग गाओ 
आज फिर से तुम बुझा दीपक जलाओ 
आज तुम मुझको जगाकर जगमगाओ 
आज फिर से तुम बुझा दीपक जलाओ!
तर प्रश्न असा आहे, की आपण विझलेला दिवा पुन्हा लावण्यासाठी कधी प्रयत्न करतो का?

तुम्ही म्हणाल, दिवाळीतल्या गार वाऱ्याच्या झुळकीने एखादा दिवा विझतो तेव्हा आपण तो पुन्हा लावतो; परंतु ही झाली सणासुदीची गोष्ट. वास्तव जीवनात असा दिवा लावण्याचा प्रयत्न आपण करतो का? खरेतर दिवा हे एक प्रतीक आहे. आपली आध्यात्मिक संस्कृती दिव्याला ज्ञानाचे प्रतीक मानते. दिव्याची ज्योत पवित्र मानतो आपण. 
आरतीच्या नंतर त्या ज्योतीचे तेज आपल्या ओंजळीत घेऊन ते हात डोक्यावरून फिरवतो. या नश्वर जगात ज्ञानापेक्षा मोठे असे काही नाही हा त्याचा अर्थ आहे. ज्ञानाचा प्रकाश आपण जितका आपल्या अंतरंगात भरून घ्याल, जितके आपले अंतर्मन उज्ज्वलतेने परिपूर्ण होईल. मन उज्ज्वल असेल तर निर्मळता येईल; निर्मळता आली तर जीवनातील कटुता संपून जाईल. 
भगवान महावीर, बुद्धांपासून आपले सर्व ऋषीमुनी आणि धर्मोपदेशक यांनी आपल्याला हाच संदेश दिला आहे; परंतु विद्यमान काळाचे दुर्भाग्य असे की आपण मनाची उज्वलता आणि निर्मलता हरवून बसलो आहोत. आपल्या आतला अंधार आपल्या संपूर्ण परिसराला काळवंडून टाकतो. द्वेषाचे वादळ खूपच वेगाने घोंगावते आहे. केवळ आपल्याकडे नाही तर संपूर्ण जगात हेच 
घडत आहे. माणुसकीला तळापासून उखडून फेकण्यासाठी ते उद्युक्त आहे. सद्यस्थितीत हा घनघोर चिंतेचा विषय झाला पाहिजे. पण, खरोखर किती लोकांना याची चिंता वाटते?

दिवाळीच्या या आनंदमयी वातावरणात मी हे काय आणि का लिहितो आहे? - पण खरेतर हे लिहिण्यासाठी इतकी योग्य वेळ दुसरी नसेलच!  जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात समाजाचा एक गट अंधाराने भरलेल्या घनदाट रात्री हुंदके देत असेल, तर त्या माणसांसाठी आपला जीव कळवळला पाहिजेच! आपल्या जीवनात तर आपण दिवा लावलाच पाहिजे; परंतु दुसऱ्यासाठी आपल्याला दिवा व्हावे लागेल. हेच आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे! आपल्यासारख्या श्रेष्ठ संस्कृतीचे लोक जर काही करणार नसतील तर कोण करील? आपल्याकडे तानसेन यांच्यासारखे महागायक होऊन गेले; ते राग मेघमल्हार गायचे तेव्हा पाऊस यायचा आणि त्यांनी राग दीपक आळवायला घेतला, की दिवे लागायचे. 
असे म्हणतात, बादशाह अकबर त्यांना आपल्या दरबारात घेऊन गेले. तानसेन यांच्या मुखातून राग दीपक ऐकायचाच हे त्यांनी मनाशी ठरवले होते. राजहट्टाच्या पुढे तानसेन यांना झुकावे लागले. त्यांनी राग दीपक गायला. दिवे तर लागले, पण इतकी उष्णता निर्माण झाली की तिथे उपस्थित लोकांची पळापळ झाली. त्या उष्णतेनेच नंतर तानसेन यांचा बळी घेतला. यात किती खरे, किती खोटे हे मला माहित नाही परंतु एक नक्की, प्रकाश पसरवायचा असेल तर दिवा लावावा लागेल आणि गरज पडली तर स्वतःची आहुतीही द्यावी लागेल; म्हणून अटलजी म्हणतात;
आहुती बाकी यज्ञ अधुरा  अपनों के विघ्नों ने घेरा
अंतिम जय का वज्र बनाने  नाव दधीचि हड्डियां गलाएं 
आओ फिर से दिया जलाएं !
तर या दिवाळीत फक्त इतकेच मागणे आहे की 
आपण सर्व मिळून जाती, पंथ आणि धर्माच्या भेदाभेदाने पसरलेली काजळी माणुसकीचा दिवा लावून पुसून टाकू. 
आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
विशेषत: अन्नदाते शेतकरी, कामगार बांधव आणि घरापासून खूप दूर, सीमेवर असलेले सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या विशेष शुभेच्छा ! 
माझे मन आज म्हणते आहे..
हम दीप से दीप जलाएं  प्यार के गीत गाएं,
जिसे जो मिल गया  या जिसे जो न मिला ।
उनके घर भी दीप जलाएं..  हम दीप से दीप जलाएं..


(दर सोमवारी प्रकाशित होणारा हा स्तंभ दिवाळीनिमित्त यावेळी आज शनिवारी प्रकाशित करण्यात येत आहे.)

Web Title: Diwali 2023: Don't forget the upcoming season, come, light the lamp again...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.