दिवाळीनिमित्त घरोघरी स्वच्छतेच्या कामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:05 AM2018-10-31T00:05:09+5:302018-10-31T00:05:39+5:30
दिवाळीनिमित्त गृहिणी वर्गाकडून घरोघरी साफसफाई व स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आल्याने घंटागाडीच्या केरकचरा संकलनात दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे घंटागाडी वरील कामगारांवर कामाचा चांगलाच ताण वाढला आहे.
नाशिकरोड : दिवाळीनिमित्त गृहिणी वर्गाकडून घरोघरी साफसफाई व स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आल्याने घंटागाडीच्या केरकचरा संकलनात दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे घंटागाडी वरील कामगारांवर कामाचा चांगलाच ताण वाढला आहे. लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज अशा दिवाळीच्या मोठ्या सणामुळे श्रीमंताच्या बंगल्यापासून ते गरीबाच्या झोपडीमध्ये साफसफाई, स्वच्छतेची कामे गृहिणी वर्गाकडून केली जातात. घरात झाडझूड करून धुवून संसार उपयोगी वस्तूंना ऊन देऊन सध्या घरोघरी साफसफाईची कामे युद्ध- पातळीवर केली जात आहे. अवघ्या आठवडाभरावर दीपावली येऊन ठेपल्याने घरातील स्वच्छतेची कामे उरकून गृहिणींना फराळदेखील करावयाचा आहे. घरोघरी साफसफाईची कामे केली जात असल्याने फार मोठ्या प्रमाणात केरकचरा, खराब व तुटक्या, फुटलेल्या वस्तू घंटागाडीत जमा केल्या जात आहेत. एका प्रभागात विभागवार चार घंटागाड्या असून, त्यांना ठरवून दिलेल्या विभागानुसार निम्म्या परिसरात घंटागाडी केरकचऱ्याने गच्च भरून जात आहे. नेहमी ओला कचरा जास्त तर सुका कचरा कमी प्रमाणात असतो; मात्र दिवाळीतील साफसफाईच्या कामांमुळे सुका कचरादेखील वाढला आहे. यामुळे घंटागाड्यांना त्यांना ठरवून दिलेल्या एरियात दोन फेºया मारून घराघरांचा केरकचरा संकलित करावा लागत आहे. यामुळे घंटागाडी कामगारांवर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण वाढला आहे. दुप्पट प्रमाणात केरकचरा वाढल्याने ते संकलित करताना विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे काही सार्वजनिक जागेवर पडणारा केरकचरा, घाण संकलन करणे अवघड होऊन बसले आहे.
रंगरंगोटीची कामेही वेगात
दिवाळी सणासाठीची लगबग दिवसेंदिवस वाढतच असून, आता घरगुती कामांना वेग आला आहे. घराची साफसफाई करण्याबरोबरच घराला रंग देण्याची कामेही सुरू झाली आहेत. यंदा रंगांच्या किमतींमध्ये काही प्रमाणात वाढ झाली असली तरी भारतीय कंपन्यांनी तयार केलेल्या रंगांची मागणी कायम आहे.