समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 07:35 AM2024-11-01T07:35:40+5:302024-11-01T07:35:57+5:30

आपण खरेतर मानसिक दारिद्र्यात जगत राहतो. दिवाळीनिमित्ताने माझ्या मानसिक दारिद्र्याचा नाश होऊ दे, अशी प्रार्थना आपण करायला हवी.

Diwali : Equilibrium 'mind' is also 'wealth'; Let's worship Him today! | समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!

समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!

- अश्विनी बर्वे
(मुक्त पत्रकार)

आपण सर्वच जण पैशाच्या मागे धावतो आहोत. जगायला पैसा लागतो हे कोणी नाकबूल करणार नाही. मात्र, कुणाकडे अधिकचा पैसा असेल तर अशा व्यक्तीकडे संशयाने पाहिले जाते, हेही खरे. त्यांनी तो पैसा प्रामाणिकपणे मिळवला नसेल, असे उगाच गृहीत धरण्याची प्रवृत्ती असतेच. दिवाळीत घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाते. त्यावेळी अनेक जण आपल्या घरातील मौल्यवान वस्तू देवासमोर ठेवून पूजा करतात. धनाची पूजा करतात आणि त्याबद्दल कृतज्ञता बाळगतात. त्याचा सन्मान करतात. मात्र, धन म्हणजे केवळ सोने-नाणे, पैसे नव्हे! आपली जमीन, गाईगुरे, आपल्या घरातील अनेक वस्तू या सगळ्याच गोष्टी ‘धन’ या शब्दात येतात.

घरातील समाधान हेसुद्धा ‘धन’ या शब्दात गृहित धरले जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेक घरांत ‘श्री सुक्त’ म्हटले जाते. त्यावरून असे लक्षात येते की, आपल्याला हवे असणारे वैभव आपण मागायचे आहे. माणसाला जीवनात सुख व समृद्धी मिळाली पाहिजे. मग तो ती कोणाकडे मागणार तर आदिमशक्तीकडे जी मातृत्वाचे रूप घेऊन येते आणि सर्वांना तृप्त करते. माणसाला लक्ष्मी कशी पाहिजे?- तर ‘अनपगामिनीम्’ म्हणजे कोणत्याही वेळी परत न जाणारी!  ती आली की, तिने परत जाऊ नये. ती पाहुणी म्हणून आलेली चालणार नाही. म्हणजे तिचा कायमचा वास माझ्या घरात असायला हवा, अशी प्रार्थना आहे. लक्ष्मी चंचल असते म्हणतात, पण खरेतर ती जिच्याकडे असते त्या व्यक्तीची वृत्ती चंचल होण्याची शक्यता अधिक! 

माणसाला सुख आणि आरोग्य हवे असते. जिच्यामुळे सुख मिळते तिलासुद्धा लक्ष्मी म्हणतात. सुख ही मनाची समृद्धी आहे. कारण सुख मनाला होते. जो माणूस मनाने दुर्बल असतो तो या जगात टिकू शकत नाही. म्हणूनच मनाच्या सबलतेला ऐश्वर्य म्हटले जाते. जे लोक मनाने समृद्ध असतात, त्यांच्याजवळ लक्ष्मी-ऐश्वर्य असते. पण मन समृद्ध होण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात. तो मनाचा एकप्रकारे व्यायाम आहे. माणूस समजून घेणे, एकमेकांमध्ये नितळ नाते निर्माण करणे, स्वीकार हे मनाचे गुण होत. आपण एकमेकांमध्ये भिंती निर्माण करतो आणि संघर्षाच्या भूमिकेत कायम राहतो. त्यामुळे तणाव वाढत राहतो. शरीर सुदृढ असेल पण मन दुबळे असले तर क्रौर्य निर्माण होते. म्हणून मन समृद्ध असले पाहिजे. याचा अर्थ, मनाची समृद्धी हीसुद्धा एक लक्ष्मी आहे आणि ती आपल्याकडे असायला हवी!

आपल्याकडे अनेक काव्यांमध्ये पृथ्वीला लक्ष्मी म्हटले आहे. ती नित्यपुष्टा आहे. एका  काव्यामध्ये पृथ्वी हसते आहे. म्हणून तिला प्रश्न विचारला की, ‘तू का हसते आहेस?’ तेव्हा ती म्हणते, ‘माणसांनी एकमेकांबरोबर आत्यंतिक मधुर संबंध निर्माण केले आहेत. त्यांच्या या एकमेकांवरच्या प्रेमामुळे माझ्यातील दाह शांत झाला आहे, म्हणून मी हसते आहे.’ म्हणजे पृथ्वी आपल्याला तनमनाने पुष्ट करत आहे,  तसेच तिने माझ्यातला भाव, बुद्धीसुद्धा पुष्ट करायला हवी. त्यासाठी आपला जीवनाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आपले कर्तृत्व कामाला लावले पाहिजे. आपण वर्तमानाची कदर करत नाही. जो वर्तमानाची कदर करतो त्याचे जीवन पुष्ट राहते. पण आपण सतत भूत आणि भविष्यात फिरत राहतो आणि त्याचा ताण आपल्या शरीरावर आणि मनावर येतो आणि त्यामुळे आपले वर्तमान बिघडत जाते. मग आपली जीवनलक्ष्मी फुलणार कशी? आपण कायम मानसिक दारिद्र्यात जगत राहतो. दिवाळीनिमित्ताने माझ्या या मानसिक दारिद्र्याचा नाश होऊ दे, अशी प्रार्थना आज आपण करायला हवी. सुदृढ मन हीसुद्धा लक्ष्मी आहे. तिचा सांभाळ आपण कसोशीने करायला हवा.
दिवाळीत धनाची आणि लक्ष्मीची पूजा करताना सर्वांसाठीच हे वैभव मागू या!

Web Title: Diwali : Equilibrium 'mind' is also 'wealth'; Let's worship Him today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.