दिवाळी अंक : वैचारिक आनंदसोहळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:11 AM2017-10-19T00:11:44+5:302017-10-19T00:12:14+5:30
दिवाळी अंक हा आनंदसोहळा आहे. त्यात अनेक स्थित्यंतरे झाली तरी त्याचे महत्त्व कायम आहे. दिवाळी अंक ही अभिमानानं मिरवावी अशी मराठी परंपरा. मराठी भाषेतील सांस्कृतिक सोहळाच. मराठी भाषेने साहित्याच्या प्रांतात ही परंपरा थोडीथोडकी नव्हे गेली १०८ वर्षे निष्ठेने जतन करून ठेवली आहे.
दिवाळी अंक ही अभिमानानं मिरवावी अशी मराठी परंपरा. मराठी भाषेतील सांस्कृतिक सोहळाच. मराठी भाषेने साहित्याच्या प्रांतात ही परंपरा थोडीथोडकी नव्हे गेली १०८ वर्षे निष्ठेने जतन करून ठेवली आहे.
का.र. मित्र यांनी त्यांच्या ‘मासिक मनोरंजन’चा एक विशेषांक १९०९च्या दिवाळीत प्रसिद्ध केला होता. बंगालच्या ‘बोईमेला’ या दुर्गापूजेच्या निमित्ताने प्रसिद्ध केलेला एक बंगाली भाषेतील पूजा विशेषांक मित्र यांच्या बघण्यात आला. तो बघून महाराष्ट्रातील मोठा सण दिवाळी, तेव्हा दिवाळीच्या निमित्ताने आपणही विशेषांक तयार करावा, अशी प्रेरणा घेऊन त्यांनी एक अंक प्रसिद्ध केला व त्याचे नामकरण ‘दिवाळी अंक’ असे केले. हाच मराठीतील पहिला दिवाळी अंक मानला जातो. आज या परंपरेला गौरवशाली असे रूप प्राप्त झाले आहे.
भाषाव्यवहार जेवढा समृद्ध, तेवढी संस्कृती समृद्ध. दिवाळी अंकांच्या निमित्ताने हे साहित्यिक, सांस्कृतिक रूप समोर येतं. दिवाळी अंक हे वर्षभरातल्या उत्तम साहित्याचं शिखर मानलं जातं. प्रारंभीच्या काळात दिवाळी अंक वाङ्मयीन स्वरूपाचे होते. साहित्यप्रेमींचे सात्त्विक मनोरंजन करणे ही त्याची भूमिका होती.
कालांतराने सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आरोग्य, धार्मिक, पाककला, सौंदर्य, क्रीडा, चित्रपट, विनोद, साहस, बालसाहित्य इत्यादी अनेक विषय दिवाळी अंकांच्या कक्षेत येत गेले. वाचकांनी या बदलांचे मन:पूर्वक स्वागत केले.
वाचकांच्या भरघोस प्रतिसादामुळे दिवाळी अंकांच्या वाटचालीला व्यावसायिक स्थैर्यही मिळाले. दरवर्षी सुमारे ५०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. दिवाळी अंकातील साहित्य पूर्वीपेक्षा अधिक समकालीन होऊ लागलं आहे. पूर्वीचे पूर्णत: वाङ्मयीन स्वरूप आता राहिलेले नाही. आता वाचकांना रस आहे तो अस्सल जीवनानुभवाचा.
जातीय सलोखा, सामाजिक चळवळीतील अनुभव, साहसी उपक्र्रम, अडचणीतून मार्ग काढीत यशस्वी झालेल्या व्यक्तिमत्त्वांची ओळख, अशा साहित्याला दिवाळी अंकांमध्ये आवर्जून स्थान दिलं जातंय. दिवाळी अंकांचे स्वरूप पूर्वीपेक्षा अधिक व्यापक झाले आहे. बहुआयामी झालेले आहे.
वाचकवर्गाच्या आवडीनिवडीत बदल झाला असला तरी चित्र निराशाजनक मुळीच नाही. जीवन अधिक अर्थपूर्ण रीतीनं जगायला मदत करेल, असं साहित्य देण्याचा अनेक दिवाळी अंक आवर्जून प्रयत्न करीत असतात.
‘लोकमत’च्या ‘दीपोत्सव’ने तर सातत्याने दर्जेदार, अनोखा मजकूर देताना दोन लाखांहून अधिक वाचक मिळवत विक्रम प्रस्थापित केला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाने दिवाळी अंकांच्या निर्मितीत सुलभीकरण आले. त्यामुळे दर्जेदार व संग्राह्य अशा दिवाळी अंकांना वेगळीच उंची प्राप्त झालेली दिसते.
गेल्या १०८ वर्षांत दिवाळी अंकांचा लेटरप्रेस ते ई-दिवाळी हा प्रवास स्तिमित करणारा आहे. दिवाळी अंक हा आनंदसोहळा आहे. एक उत्सव आहे. त्यात अनेक स्थित्यंतरे झाली तरी त्याचे महत्त्व कायम राहणार आहे. दिवाळी अंकांनी मराठी साहित्याला खूप काही दिले, असा इतिहास आहे, वर्तमान आहे आणि भविष्यही तेच असणार आहे.
- विजय बाविस्कर