दिवाळी गोड झाली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 11:05 PM2020-11-17T23:05:20+5:302020-11-17T23:06:02+5:30
एडिटर्स व्ह्यू
मिलिंद कुलकर्णी
कोरोना महासाथीच्या भयाखाली गेली सात महिने जीवन कंठणाऱ्या नागरिकांना दिवाळीने दिलासा मिळाला. भय कमी झाले आणि चैतन्याचा स्पर्श झाला. शेवट गोड तर सगळे गोड असे म्हणण्याची प्रथा आहे, पण कोरोनाविषयी तसे म्हणता येणार नाही. युरोप आणि दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली असून रुग्णसंख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचे सावट अद्याप कायम असले तरी दिवाळीचे चार दिवस आनंदात गेले, हे समाधान आहे.
माणूस हा आशेवर जगतो. महाभारताचे युध्द १८ दिवसात संपले, कोरोनाचे युध्द आपण २१ दिवसात संपवू, असे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी मार्चच्या शेवटच्या आठवडयात भारतीय जनतेला सांगितले. नागरिकांनी विश्वास ठेवला. २१ दिवसांचा लॉकडाऊन काटेकोरपणे पाळला. थाळी वाजविली, दिवे ओवाळले, शंखनाद केला. कोरोना कमी झाला नाही, तरी तक्रार केली नाही. शारीरिक, मानसिक त्रास सहन करीत कामगार, कष्टकरी पायी, सायकल, रिक्षा अशा मिळेल त्या मार्गाने मूळगावी परतले. त्यांचा आक्रोश राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचला नाही. लॉकडाऊनचे टप्पे वाढत गेले. रुग्ण संख्या वाढली, मृत्यूमुखींचे आकडे मोजले जाऊ लागले. औषधींचा काळाबाजार, खाजगी रुग्णालयांचा असहकार व नंतर अडवणूक, शासकीय रुग्णालयांवर पडलेला ताण हे सगळे मुकाटपणे नागरिकांनी सोसले. घरात कोरोना रुग्ण असल्याचे कळताच संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार घालणारी गल्ली, वाळीत टाकल्यासारखी वागणूक, रुग्णाला किंवा मृत्यू पावलेल्या नातेवाईकाला स्पर्श करायलाही न धजावणारी रुग्णालय आणि वैकुंठधामातील कर्मचारी हे अनुभव माणुसकीवरील विश्वास उध्वस्त करणारे होते. पण जशी समुद्राची लाट ओसरत जाताना किनाºयावरील वाळूवर गिरवलेली अक्षरे पुसली जातात, तसेच कोरोनाची लाट ओसरल्यावर लोक हे कटू अनुभव विसरुन जात आहेत. प्रकाशमय दिवाळीचे धूमधडाक्यात केलेले स्वागत म्हणूनच औचित्यपूर्ण आहे.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभिवचन राज्य शासनाने महाराष्टÑातील नागरिकांकडून घेतले. स्वत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे निवासस्थानी क्वारंटाईन होत जनतेला ‘घरात रहा, सुरक्षित रहा’ असा उपदेश देत होते. आणि जनता त्याचे पालन करीत होती. पुढे जाऊन अनलॉकचे टप्पे सुरु झाले. एस.टी. पूर्ण क्षमतेने धावू लागली. हॉटेल, चित्रपटगृह पथ्य पाळून सुरु झाली. पाडव्याला मंदिरे उघडली. पुढच्या सोमवारी ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा उघडतील. जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर ही त्रीसूत्री पाळत लोक घराबाहेर पडले आहेत.
दिवाळीच्या निमित्ताने कुटुंबे एकत्र आली. आठ महिन्यांनंतर घरे भरली. चेहºयावरील भयाचे सावट जाऊन हास्यलकेर उमटली. अंगणात आकाशकंदील लागला. दिव्यांच्या माळा आणि पणत्यांनी कोरोनामुळे घरादारात निर्माण झालेला अंधकार दूर केला. फटाक्यांचा आवाज कमी असला तरी आठ महिन्यांपासून मनात दाटलेला आवेग फटाक्यांच्या रुपाने बाहेर आला. क्वारंटाईन झालेले आबालवृध्द अंगणात मोकळेपणाने वावरले. घरात आलेल्या प्रत्येक वस्तूकडे संशयाने पाहण्याची सवय झालेल्या आम्हाला भेटवस्तू, मिठाईचे बॉक्स आनंद देऊन गेले. फराळाच्या ताटांची शेजारपाजारी अदलाबदल झाली. कोरोनाचे मळभ हळूहळू कमी होत चालल्याचा हा सुखद अनुभव होता.
दिवाळीने बाजारपेठेतदेखील चैतन्य आणले. वर्षातून एकदा येणारा मोठा सण असल्याने प्रत्येक नागरिकाने ऐपतीप्रमाणे खरेदी केली. श्रीमंतांनी चारचाकी घेतली, मध्यमवर्गीयांनी मोटारसायकली, नोकरदारांनी टी व्ही, फ्रीजसारख्या वस्तू घेतल्या. सहा महिन्यांपासून ठप्प झालेली बाजारपेठ गजबजली. या बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या उद्योजकांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांना ही दिवाळीची उलाढाल उत्साहित करुन गेली. २०२० ची सुरुवात कठीण झाली असली तरी शेवट चांगला होईल, हा आशावाद दिवाळीने दिला. ही उभारी खूप महत्त्वाची आहे.
युरोप असो की, दिल्ली...कोरोनाच्या दुसºया लाटेने हाहाकार माजविला आहे. कोरोना संपलेला नाही. प्रतिबंधक लस अद्याप आलेली नाही. ही लस आली तरी ती कोरोनाचा पूर्ण नायनाट करेल, असे सांगता येणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यायला हवी. एका दुस्वप्नातून बाहेर पडत असताना पुरेशी खबरदारी घेतली नाही, तर पुन्हा त्या खाईत आपण लोटले जाऊ, हे लक्षात घ्यायला हवे.