नुसतेच ‘मराठी मराठी’ करणाऱ्या कलावंतांमध्ये चूक ते चूक सांगण्याची हिंमत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 10:47 AM2023-01-06T10:47:55+5:302023-01-06T11:02:54+5:30
नोव्हेंबरच्या मध्यात पार पडलेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या चंद्रपूर केंद्राचा निकाल अजून जाहीर का झाला नाही, याची कारणे शोधताना ही अजब व संतापजनक कारणे समोर आली आहेत.
दंगलीत सापडलेल्या मुलीला एका मुस्लीम ड्रायव्हरने मदत केली, दंगेखोरांच्या तावडीतून सोडविले, या काल्पनिक लिखाणातून एका धर्माची बदनामी होते की, मानवतेचा धर्म वृद्धिंगत होतो? धर्माच्या, जातीच्या किंवा आणखी कसल्या कसल्या भिंती ओलांडून त्यापलीकडच्या मानवतेचा पुरस्कार करण्याची शिकवण आपलेच धर्ममार्तंड करतात ना? किंवा आश्रमातील विधवांच्या शोषणावर भाष्य केले तर जाब शोषण करणाऱ्यांना विचारायचा असतो, की शोषितांची वेदना मांडणारे दोषी ठरतात? वरवर हे प्रश्न अतार्किक, अनाकलनीय व झालेच तर विचित्र वाटत असले तरी असल्याच कुठल्या तरी तक्रारींच्या आधारे थेट राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर करायला उशीर होतो, हा नवा महाराष्ट्र आहे.
नव्या भारताचेही हेच वास्तव आहे. नोव्हेंबरच्या मध्यात पार पडलेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या चंद्रपूर केंद्राचा निकाल अजून जाहीर का झाला नाही, याची कारणे शोधताना ही अजब व संतापजनक कारणे समोर आली आहेत. राज्य नाट्य स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकांच्या संहिता आधी सादर केलेल्या असतात. महाराष्ट्र राज्य रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ अशा नावाचे नाटकांचे सेन्सॉर बोर्ड केवळ स्पर्धेतल्याच नव्हे तर सगळ्याच नाटकांच्या संहिता तपासून, प्रसंगी प्रयोग पाहून त्यांना प्रमाणपत्र देतात. ‘वृंदावन’ व ‘तेरे मेरे सपने’ नावाची इरफान मुजावर यांनी लिहिलेली दोन नाटके चंद्रपूर केंद्रावर सादर झाली. त्यापैकी ‘तेरे मेरे सपने’ हे नाटक सोलापूर केंद्रावर दुसरे आले आहे आणि ते आता राज्य स्पर्धेत सादर होणार आहे. ‘वृंदावन’ नाटकाला तर २०१६ साली राज्य स्पर्धेत उत्कृष्ट लेखनाचा पुरस्कारही मिळाला आहे. मग आताच त्यावर वाद उभा करण्याचे आणि सांस्कृतिक मंत्रालयाने तक्रारीच्या दबावासमोर झुकण्याचे कारण काय? तर सांस्कृतिक दंडेली करणाऱ्यांची हिंमत वाढली आहे.
हे धाडस कायद्याच्या चौकटीत स्थापन झालेल्या व्यवस्थेवर कुरघोडी करण्याचे, प्रसंगी कायदा हातात घेण्याचे आहे. मुळात नानाविध प्रकारच्या सृजनावर, नवनिर्मितीवर दात खाणारी ही मंडळी नेहमी असेच बारीक लक्ष ठेवतात. आतापर्यंत संबंधित लेखक, कवी किंवा कलावंताची भेट झाली तर आजकाल काय नवे, अशी अनौपचारिक विचारणा करतानाच खोटी आपुलकी दाखवत जरा सांभाळून राहा, आमच्या लोकांचे तुम्ही काय करताय, काय लिहिताय यावर लक्ष असते, असे सांगून आडपडद्याने इशारा द्यायची. त्या इशाऱ्याचा काही परिणाम झाला नाही तर छळ सुरू व्हायचा. चित्रपटांमधील कलावंत या मंडळींचे मुख्य लक्ष्य आहे. विशिष्ट कलाकारांवर चौफेर टीका व बहिष्काराच्या मोहिमेसाठी पडद्यावरचा साधा रंगही त्यांना पुरेसा ठरतो. सध्याही शाहरूख खानचा ‘पठाण’ चित्रपट व त्यातील ‘बेशरम रंग’ हे गाणे या मंडळींच्या निशाण्यावर आहे.
या सांस्कृतिक दंडेलीविरोधात काही कलावंत खंबीरपणे उभे राहतात. त्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची ते तयारी ठेवतात. पेरूमल मुरुगन यासारखा दाक्षिणात्य लेखक मात्र उद्विग्न होऊन लिहिणे सोडल्याची घोषणा करतो. हे काहीही असले तरी चंद्रपूरसारख्या सर्वसमावेशक संस्कृतीच्या शहरात असे घडणे रुचणारे, पचणारे नाही. राजे बीरशाह आत्राम या आदिवासी राजांनी पायाभरणी केलेल्या या संस्कृतीने कधीच अतिरेकी विचारांचे समर्थन केलेले नाही. आणीबाणीच्या काळात व नंतरही मूलभूत हक्कांसाठी तुरुंगवास भाेगणाऱ्यांची संख्या चंद्रपुरात मोठी आहे. आता तर चंद्रपूर हे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे गाव आहे. त्यांचे स्वत:चे किंवा चंद्रपूरचे राजकारण अजिबात संकुचित नाही. कालपरवाच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी सभा आटोपल्यानंतर जवळच्याच बाबातुल्ला शाह दर्ग्याला भेट दिली, मजारीवर चादर चढवून नतमस्तक झाले.
सोशल मीडियावर काहींनी त्यावर टीकाटिप्पणी केली असली तरी चंद्रपूरच्या सामान्य जनतेला मात्र हा सर्वधर्मसमभाव आवडला. अशा चंद्रपुरात राज्य नाट्य स्पर्धेत घुसलेली घटनाबाह्य सेन्सॉरशिप अजिबात शोभेशी नाही. कुणीतरी उठायचे, तक्रार करायची, सरकारी अधिकाऱ्यांनी अशा तक्रारींना केराची टोपली दाखविण्याऐवजी निर्णय बदलायचे किंवा लांबवायचे, हे धोकादायक आहे. त्याविरुद्ध आवाज उठवला गेलाच पाहिजे. अन्यथा, काळ आणखी सोकावेल. प्रश्न इतकाच आहे की, नुसतेच ‘मराठी मराठी’ करणाऱ्या कलावंतांमध्ये किंवा त्यांच्या समूहामध्ये चूक ते चूक सांगण्याची हिंमत आहे का? त्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे का?