ख्रिस्ती नागरिकांना असुरक्षित वाटते का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 05:49 PM2019-01-26T17:49:35+5:302019-01-26T17:49:47+5:30
गोव्यात ‘जनमत कौला’संदर्भात चालू असलेल्या वादामुळे एक नवीनच प्रश्न उपस्थित झाला आहे, तो आहे गोव्यातील ख्रिस्ती लोकसंख्येला या भूमीत असुरक्षित वाटते का?
- राजू नायक
गेल्या १० वर्षात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतेय ती म्हणजे, गोवा सोडून ख्रिस्ती लोकांचे पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारणे. अधिक प्रगतीशील जीवनपद्धतीसाठी लोक मोठ्या संख्येने पोर्तुगाल, ब्रिटन व कॅनडात स्थायिक होऊ लागले असून त्यांना पोर्तुगाल संबंधांचा त्यासाठी फायदा मिळतो. ख्रिस्ती वाचकप्रियता असलेल्या त्यांच्या वृत्तपत्रांमध्ये गोवा ‘स्वतंत्र’ झालाच नाही, तो भारताने सैन्य पाठवून काबीज केला, असा उल्लेख वारंवार केला जातो.
‘वावराडय़ांचो इश्ट’ या रोमन कोकणी वृत्तपत्रात व दुस-या एका इंग्रजी वृत्तपत्रात तसे लेख छापून आलेले आहेत. तसे करताना हे लेखक एका सर्वोच्च न्यायालयाच्या १९६० दशकात दिलेल्या निकालाचा हवाला संदर्भ सोडून देतात. नागरिकत्वाच्या प्रश्नावर एका गोवेकर ख्रिस्ती पाद्रीने गुदरलेल्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की गोव्याचे भारताने ‘सामिलीकरण’ करून घेतले. ‘त्यामुळे लोकपाठिंब्याने मिळविलेली ही गोवा मुक्ती नसून सैन्य पाठवून भारताने हा प्रांत काबीज केला,’ असा दावा काही ख्रिस्ती विचारवंत करतात. तसे करून पोर्तुगालशी असलेल्या आपल्या सांस्कृतिक वारशाला ते अभिमानाने मिरवत असतात.
‘जनमत कौला’च्या वादात हा प्रश्न नव्याने उद्भवण्याचे कारण म्हणजे गोवा मुक्ती श्रेष्ठ की जनमत कौलाचा विजय श्रेष्ठ याविषयावरचे विचारमंथन. गोवा फॉरवर्ड या प्रादेशिक पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाईंनी हल्लीच जनमत कौल श्रेष्ठ अशी भूमिका घेतल्याने त्यावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. रा. स्व. संघाचे बंडखोर व नव्याने स्थापन केलेल्या पक्षाचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी त्यांचा निषेध करून निवडणुकीत सरदेसाईंना धडा शिकविण्याचे आव्हान दिले आहे. सरदेसाईंनीही ते आव्हान स्वीकारून वेलिंगकर हे राष्ट्रवादाच्या आडून ‘महाराष्ट्रवाद’ चालवत असल्याचा आरोप केला. लेखक उदय भेंब्रे यांनी सरदेसाई यांच्यावर दांभिकपणाचा आरोप करून ते स्वातंत्र्यलढा व स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करीत असल्याचे मत मांडले.
गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रवक्ते प्रशांत नाईक यांनी जनमत कौलाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी मुद्दामच हा वाद उकरून काढला गेला व गोवेकर असल्याचा अभिमान तरुणांमध्ये जागृत करणे हा त्यामागचा उद्देश असल्याचे मत मांडले आहे.
एक गोष्ट खरी आहे की गोव्यात ख्रिस्ती अल्पसंख्य होत असल्यामुळे असुरक्षितपणाची भावना ख्रिस्ती समाजामध्ये आहे. गोव्याची लोकसंख्या गेल्या ५० वर्षात दुप्पट वाढली. त्यात अन्य भाषिक लोकांचा भरणा अधिक आहे. त्यामुळे ख्रिस्ती लोकसंख्या आज केवळ २१ टक्के बनली आहे. हिंदुत्ववादाच्या देशातील वाढत्या प्रभावामुळेही व अन्न तसेच पेहरावातील फरकामुळेही त्यांना लक्ष्य बनविले जात असल्याने अल्पसंख्य हवालदील बनल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील ख्रिस्ती नागरिकांची अस्वस्थता त्यांना बचावात्मक भूमिका घेण्यास भाग पाडू लागल्याचे निरीक्षकांचे मत आहे. जनमत कौलातील नेते ज्ॉक सिकैरा यांचा पुतळा विधानसभा संकुलात उभारावा व जनमत कौलाचा धडा पाठय़पुस्तकात समाविष्ट करावा अशाही मागण्या गोवा फॉरवर्डने आपल्या भूमिकेच्या पुष्टय़र्थ पुढे केल्या आहेत.
(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)