गुन्हेगार मुलांचे समर्थन का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 02:05 AM2018-04-30T02:05:23+5:302018-04-30T02:05:23+5:30
विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच नागपूरला आलेले विष्णू कोकजे यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचारांवर वक्तव्य केले.
विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच नागपूरला आलेले विष्णू कोकजे यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचारांवर वक्तव्य केले. महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारी मुलांना घराबाहेर न काढता त्याला वाचविण्यासाठी कुटुंबीय धावपळ करतात. अशा मुलांचे समर्थनच का हवे, असा जळजळीत प्रश्न कोकजे यांनी उपस्थित केला. वर्तमान सामाजिक स्थिती लक्षात घेता, कोकजे यांचा हा मुद्दा विचारमंथन करायला भाग पाडणारा आहे. महिला अत्याचाराच्या घटना झाल्या की महिलांचे स्वातंत्र्य, पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण, कपडे घालण्याच्या पद्धती यासारख्या गोष्टींवर सर्वच विषयांचे अभ्यासक बनलेले ‘विशिष्ट’ तत्त्वचिंतक वृत्तवाहिन्यांवर बोंबलीच्या देठापासून आवाज काढत चर्चा करताना दिसतात. आजच्या युगातदेखील महिलांनी काय घालावे, काय घालू नये, याबाबत मतप्रदर्शन करण्यात अनेकांची आघाडी असते. मात्र या सामाजिक समस्येच्या मुळाशी जाण्याचा फारसा प्रयत्न होताना दिसत नाही. सामाजिक मर्यादा आणि कौटुंबिक संस्कार यांच्या सूत्राने मनुष्य बांधला गेला असतो व त्याचे पालन करणे ही जबाबदारी आहे, हेच लहानपणापासून मनावर बिंबविले जाते. एरवी समाजात मान वर करून चालणारे व महिला सक्षमीकरणावर मोठमोठी व्याख्यान देणाºया मंडळींच्या मुलांनीदेखील महिलांकडे वाकडी नजर ठेवल्याची उदाहरणे आहेत. अत्याचाºयाच्या बातम्या वाचून सामान्य घरांमध्येदेखील संताप व्यक्त करण्यात येतो. परंतु ‘आपल्या तो बाब्या, दुसºयाचे ते कार्ट’, अशी मानसकिता असलेले लोक स्वत:चा मुलगा महिलेला सन्मान देत नसेल तर त्याचे कान ओढायला पुढाकार घेत नाहीत. एखाद्या प्रकरणात मुलगा अडकला तर त्याला वाचविण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करतात. अशा एखाद्या मुलाला घरच्यांनीच बाहेरचा रस्ता दाखविल्याची उदाहरणे अपवादानेच दिसून येतात. मुलींच्या राहणीमानावर टीकाटिप्पणी करणारी मंडळी महिलांवर अत्याचार झाल्यानंतर मुलांचे संस्कार, त्यांचे नैतिक कर्तव्य, त्यांचे राहणीमान याबाबत फारशी चर्चा करताना दिसत नाही. आधुनिक समाजात महिलांना बरोबरीचा दर्जा व सन्मान मिळालाच पाहिजे. कायदे असले तरी जोपर्यंत कुटुंबातून योग्य संस्कार मिळत नाहीत, तोपर्यंत परस्त्री ही माता-भगिनी असते, ही भावनाच रुजू शकत नाही. समाजाने मुलांनादेखील प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे. वेळप्रसंगी ममत्व बाजूला सारून कठोर भूमिकादेखील घेतली पाहिजे. असे झाले तरच देशातील महिलांचे भविष्य सुरक्षित राहील व कोवळ्या कळ्या कुस्करल्या जाणार नाहीत, हे निश्चित.