शर्म नही पर जरा लिहाज तो करो!

By admin | Published: August 31, 2016 04:38 AM2016-08-31T04:38:58+5:302016-08-31T04:38:58+5:30

मुंबई पोलिसांच्या आणि खरे तर संपूर्ण देशाच्या दृष्टीने ‘वॉन्टेड’ असलेल्या दाऊद इब्राहीमचे भारताने सादर केलेले सारे पत्ते संयुक्त राष्ट्र संघटनेने मान्य

Do not be ashamed but do it a bit! | शर्म नही पर जरा लिहाज तो करो!

शर्म नही पर जरा लिहाज तो करो!

Next

मुंबई पोलिसांच्या आणि खरे तर संपूर्ण देशाच्या दृष्टीने ‘वॉन्टेड’ असलेल्या दाऊद इब्राहीमचे भारताने सादर केलेले सारे पत्ते संयुक्त राष्ट्र संघटनेने मान्य केल्यानंतरही ते वास्तव न स्वीकारण्याचा पवित्रा धारण करणारे पाकिस्तान आता पठाणकोटच्या हवाई तळावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या बाबतीत अमेरिकेने भारताच्या हाती सुपूर्द केलेले नवे पुरावे मान्य करील याची सुतराम शक्यता नाही. एकदा एखाद्या व्यक्ती व देशाने सारे काही गुंडाळून ठेवण्याचीच भूमिका घेतल्यानंतर लाज नाही तर नाही पण जरा संकोच तरी बाळगाल की नाही, असा प्रश्न उपस्थित करण्याखेरीज भारतासारखा देशदेखील दुसरे काय करु शकतो? पठाणकोटच्या हवाई तळावर जो अतिरेकी हल्ला झाला, त्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे दाखवून देणारे सर्व पुरावे भारताने सादर केले होते. त्यावर हल्ल्याचे ठिकाण पाहाण्यासाठी आणि हल्ल्याचा तपशील जाणून घेण्यासाठी पाकिस्तानी तपास यंत्रणेचे एक पथक तिथे जाऊनही आले. या पथकात आयएसआय या पाकिस्तानी उचापतखोर गुप्तहेर संघटनेचा एक माजी अधिकारी असल्यामुळे भारताच्या राजकीय वर्तुळात बरीच खळबळही माजली होती. सदरचा हल्ला जैश-ए-मुहम्मद या अतिरेकी-घातपाती संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर यानेच घडवून आणल्याचेही भारताने सप्रमाण सिद्ध करुन दिले होते, पण पाकिस्तान सरकारने ना आजवर दाऊद त्यांच्या देशात असल्याचे मान्य केले ना मसूदवर काही ठोस कारवाई केली. उलट हा मसूद रोज उठून हिंसक भाषणे करतो आहे आणि पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये घुसून तो भाग आझाद (?) करावा असे सल्ले देतो आहे. अमेरिकेने भारताला जे ताजे पुरावे सादर केले आहेत त्यांच्यावरुन पठाणकोटच्या हल्ल्याचे सारे सूत्रधार पाकिस्तानातच होते आणि तिथे बसून त्यांनी सारी सूत्रे हलविली हे सप्रमाण सिद्ध होते. या पुराव्यांमुळे भारताची राष्ट्रीय तपास यंत्रणा मसूद अझहर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा जो विचार करीत आहे त्याला बळकटीच मिळणार आहे. गेल्या जानेवारी महिन्यात घडवून आणल्या गेलेल्या पठाणकोट हल्ल्याशी संबंधित अमेरिकेने जो स्वतंत्र तपास केला त्यात असे आढळून आले की हल्ल्याशी संबंधित लोकांच्या फेसबुकवरील खात्यांची नोंद (आयपी अ‍ॅड्रेस) पाकिस्तानातच करण्यात आली होती. यात अल रहमान ट्रस्ट नावाच्या संस्थेचा समावेश असून अतिरेक्यांना पैसा पुरविण्याचे काम ही संस्था करीत होती. कासीफ जान नावाचा अतिरेकी पाकिस्तानात बसून हल्ल्याची सूत्रे हलवीत होता आणि त्याच्या स्वत:च्या फेसबुक खात्यावर जे विभिन्न फोटो आहेत त्यात पठाणकोट हल्ल्यात ठार मारल्या गेलेल्या चार अतिरक्यांचेदेखील फोटो आहेत. या कासीफ जानचा जो मोबाईल नंबर आहे त्यावरुनच अतिरेक्यांशी संपर्क साधला जात होता आणि पंजाब पोलीसचे अधीक्षक सलविंदरसिंग यांचे अपहरण केले गेले तेव्हांही याच नंबरवरुन भारतात संपर्क साधला गेला होता. खुद्द अमेरिकेनेच इतके सारे शोधून काढल्यानंतर तिने तरी पाकिस्तानला सरळ करण्याची भूमिका स्वीकारावी अशी अनेक भारतीयांची अपेक्षा आहे पण तसे होणार नाही हेही उघड आहे. मात्र रोजच पाकिस्तानच्या अशा उचापती सुरु असून आता त्यात आणखी दोन बाबींची भर पडली आहे. पाकिस्तानचे भारतातील राजदूत अब्दुल बासीत यांनी भारताशी चर्चा करण्यास आपले सरकार तयार असल्याचे सांगायला सुरुवात केली आहे. चर्चेला आम्ही तयारच असतो पण भारत प्रतिसाद देत नाही असे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडणे यापलीकडे त्याला काही महत्व नाही. पण त्याच्याही पुढचा पाकिस्तानचा आणखी एक उद्योग म्हणजे आपल्या बावीस खासदारांना विशेष मोहिमेवर देशोदेशी रवाना करणे. पाकी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी ज्या बावीस जणांना आपला दूत बनविले आहे त्यांनी देशोदेशी जाऊन जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती अवगत करुन देणे आणि नक्राश्रू ढाळून येणे हाच आहे. मुळात जम्मू-काश्मीरचा आणि पाकिस्तानचा काहीही संबंध नाही. तो तसा नसूनही एकही पाकी नेता काश्मीरशिवाय अन्य कोणत्याही मुद्यावर बोलायला तयार होत नाही. गेल्या जवळजवळ दोन महिन्यांपासून त्या राज्यात जी वणवा पेटल्यागत स्थिती निर्माण झाली आहे तिच्यामागे पाकिस्तानचा मोठा हात आहे. पण एकीकडे ते मान्य करायचे नाही आणि खुद्द स्वत:च्या देशातील बलुचिस्तानात दमनशक्तीचे प्रयोग करायचे आणि बळकावून बसलेल्या पाकव्याप्त काश्मीरातील अशांतता दाबून टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि ते सारे उघड होऊ नये म्हणून जम्मू-काश्मीरचा प्रश्न पुन:पुन्हा उपस्थित करायचा हीच पाकिस्तानची रणनीती आहे. बावीस दूतांवर सोपविलेली जबाबदारी हीच आहे. परंतु आज एकट्या चीनचा अपवाद वगळला तर एकही देश पाकिस्तानविषयी प्रेम बाळगणारा नाही आणि त्या देशाच्या भूलथापांना बळी पडणाराही नाही. चीनलाही पाकविषयी जे ममत्व वाटते त्याचीही कारणे पुन्हा वेगळी आणि राजकीय व आंतरराष्ट्रीय समतोलाचा स्वार्थी विचार करणारी आहेत. अमेरिकेने पठाणकोट हल्ल्यासंबंधी जे ताजे पुरावे भारताच्या हवाली केले आहेत ते पाहिल्यानंतर आता भारताने शरीफ यांना इतकेच सांगावे की, शर्म नही सही पर जरा लिहाज तो करो!

Web Title: Do not be ashamed but do it a bit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.