वन्यप्राण्यांबद्दल असहिष्णुता बाळगू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:22 AM2017-10-02T01:22:47+5:302017-10-02T01:22:52+5:30
वाघासह सर्व वन्यप्राणी, पक्षी हे अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक आहेत. माणसाचे जीवन हे त्यांच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. वन्यप्राण्यांबद्दल जनमानसात प्रेम आणि जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने १ ते ७ आॅक्टोबर हा वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत असतो
वाघासह सर्व वन्यप्राणी, पक्षी हे अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक आहेत. माणसाचे जीवन हे त्यांच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. वन्यप्राण्यांबद्दल जनमानसात प्रेम आणि जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने १ ते ७ आॅक्टोबर हा वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत असतो. यानिमित्त राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए.के. मिश्रा यांच्याशी सविता देव हरकरे यांनी केलेली बातचीत.
वन्यजीव सप्ताह हा केवळ उत्सव न राहता वन्यजीव संवर्धनात जास्तीतजास्त लोकांचा सहभाग वाढणे आवश्यक नाही का?
वन्यजीव संवर्धनात लोकांचे योगदान महत्त्वाचे आहे. वन्यप्राणी म्हटले की केवळ वनविभागाची जबाबदारी असा बहुदा समज करून घेतला जातो. तो चुकीचा आहे. वन्यप्राणी ही फक्त वनविभागाची नाही तर देशाची संपत्ती आहे. परंतु अलीकडे वन्यप्राण्यांप्रती लोकांची असहिष्णुता वाढत चालली आहे. हे योग्य नाही. त्यांना धोका मानू नये. आपली संस्कृती मिळूनमिसळून प्रेमाने राहण्याची आहे. याचे भान सर्वांनीच ठेवले पाहिजे. प्राण्यांना सांभाळणारा देश म्हणून आपली ख्याती आहे.
वाढता मानव-वन्यजीव संघर्ष कसा कमी करणार? नरभक्षक वाघांच्या बंदोबस्ताचे काय?
हा संघर्ष वर्षोनुवर्षे चालत आला आहे. त्यावर नियंत्रणासाठी वन्यजीव विभागाकडून अल्पमुदतीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचे परिणामही समोर आले आहेत. काही वर्षांपूर्वी मानव-वन्यजीव संघर्षात वर्षाला ५० लोक मृत्युमुखी पडत असत आता हा आकडा २५-३० वर आला आहे. महाराष्टÑात आणि प्रामुख्याने विदर्भात जंगल आणि शेती एकत्रित असल्याने खरी अडचण येते. वाघ गुराढोरांच्या आकर्षणाने शेतात येतात. कारण हरणं आणि सांबरांपेक्षा त्यांची शिकार सोपी असते. मात्र माणसाला मारण्याचा त्यांचा उद्देश नसतो. अलीकडच्या काळात हल्ल्याच्या ज्या घटना घडल्या त्यातील वाघही नरभक्षक नाहीत. अशाप्रसंगी संयमाची गरज असते. तेव्हा टोकाची भूमिका कुणी घेऊ नये.
जंगल कमी आणि वाघ वाढल्याने त्यांचे स्थलांतरण करणार हे खरे आहे काय?
वन्यजीव व्यवस्थापनातील यशामुळे आपल्या येथे मागील चार वर्षात वाघांची संख्या दुप्पट म्हणजे १०४ वरून २१० झाली आहे. त्यांच्या अधिवासासाठी जंगले कमी पडतात. त्यामुळे व्याघ्र व्यवस्थापनांतर्गत त्यांच्या स्थलांतरणाचा (ट्रान्सलोकेशन) विचार सुरू आहे. परंतु ही एक शास्रोक्त आणि प्रदीर्घ प्रक्रिया आहे. कुठल्याही वाघाला कुठेही सोडता येत नाही. संपूर्ण अध्ययनाअंतीच त्याबाबत निर्णय घेतला जाईल.
विकास प्रकल्पांमुळे जंगलांचा ºहास होत आहे. मग वाघांचे अधिवास कसे सुरक्षित राहणार?
मानवी विकासाच्या दृष्टीने आवश्यक प्रकल्पांमध्ये थोडाबहुत समझोता करावा लागत असला तरी जंगल व त्याच्या बाहेरचे क्षेत्र तसेच कॉरिडोर व्यवस्थापन आदींच्या माध्यमाने वन्यप्राण्यांच्या हालचाली थांबू नयेत याची पूर्ण काळजी घेतली जाते.
वन्यजीव संवर्धनापेक्षा पर्यटनालाच अधिक महत्त्व दिल्या जात आहे काय?
वन पर्यटन हे वन्यजीव व्यवस्थापनाचे अस्त्र आहे. लोकांना जंगलात फिरता आले प्राण्यांचा सहवास लाभला की त्यांच्याबद्दल प्रेम आणि जागरूकता निर्माण होईल आणि प्राण्यांच्या शिकारी कमी होतील. शिवाय पर्यटनात योग्य संतुलन राखण्यात आले आहे.