आमचं माहेर तोडू नका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 02:50 AM2018-01-10T02:50:32+5:302018-01-10T02:51:03+5:30

Do not break our mother ... | आमचं माहेर तोडू नका...

आमचं माहेर तोडू नका...

googlenewsNext

- बाळासाहेब बोचरे

अकलूजची लावणी स्पर्धा आता बंद होणार, या जाणिवेने कलावंत मंडळींच्या मनात कालवाकालव सुरू असून ज्या स्पर्धेमुळे आपण घडलो आणि मानसन्मान मिळाला ती स्पर्धा बंद होऊ नये, असेच अनेक कलाकारांना वाटते.

अकलूजची लावणी स्पर्धा ही जगभर गाजली असून तिला जगभर पोहोचविण्यात अकलूजकरांचे परिश्रम तेवढेच मोलाचे आहेत. गेल्या २५ वर्षांत या लावणी स्पर्धेने अनेक कलावंत घडवले असून या कलेलाही मोठ्या उंचीवर पोहोचवले आहे. या कलेला सन्मान मिळवून दिला आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची जन्मशताब्दी साजरी होत असताना या स्पर्धेने रौप्यमहोत्सव पूर्ण केला. राज्यभरातून लावणी कलावंतांना बोलावणे, त्यांच्यातील कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांचा सन्मान करणे हे काम २५ वर्षे अव्याहतपणे करणे सोपे नाही. वर्षातून एकदा भरणाºया या स्पर्धेत आपली हजेरी लावावी, असे कित्येक कलावंतांना वाटल्याशिवाय राहत नाही. कलावंत मंडळींना मिळणारा मानसन्मान पाहता त्यांना अकलूज म्हणजे लावणीची पंढरी अन् आपले माहेर वाटू लागले. २५ वर्षे स्पर्धा चालवल्यानंतर आता ही स्पर्धा बंद करण्याचा मानस संयोजक जयसिंह मोहिते-पाटील ऊर्फ बाळदादा यांनी बोलून दाखवला. त्यामुळे अनेक कलावंत मंडळींच्या मनाची घालमेल सुरू झाली. ही स्पर्धा बंद होऊ नये, झाली तर आमचे माहेरच तुटेल अशी भावना कलावंतांनी व्यक्त केली. वास्तविक अकलूजची लावणी स्पर्धा ही केवळ कलेसाठीच नावाजली नाही तर त्यातला शिस्तबद्धपणा आणि कलाकारांना मिळणारी दाद ही खास बाब आहे. त्यातून कलेचा आविष्कार तर पाहायला मिळतोच पण लोकप्रबोधनही केले जाते. काश्मीरचा प्रश्न असो वा कोपर्डीची घटना असो. त्यांना लावणीमध्ये मोठ्या खुबीने बसवून कलाकारांनी प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला. अनेकवेळा डोळ्यात पाणी आणले. ही स्पर्धा म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटचा एक उत्तम नमुना असून कलाकारांना घरच्यासारखी वागणूक देणारा भावनिक धागा घट्ट बांधला आहे. इथं धांगडधिंग्याला कधीच थारा मिळाला नाही. अगदी महिलाही लावणीतील शृंगार अन् आर्जव मनापासून पाहतात. बाळदादांच्या शिस्तीमुळे प्रेक्षकांमधून अश्लील शेरेबाजी अथवा कलेचा अवमान करणारी कसलीच घटना घडली नाही. त्यामुळेच कलाकाराला मनमुराद दाद देण्याचीच परंपरा सुरू झाली होती. इथं आमदार, खासदार अथवा मंत्री हे व्हीआयपी नसून केवळ कलाकारांना व्हीआयपी मानले जाते. तिकिटासाठी राज्यभर प्रत्येक जिल्ह्याला कोटा वाटून देण्याचा बाळदादांचा पारदर्शीपणा कौतुकास्पद आहे. ज्यावेळी आयटम साँगच्या मागे दुनिया पळू लागली तेव्हा अकलूजच्या लावणीने प्रेक्षकांना लावणीसोबत खिळवून ठेवण्यात यश मिळवले आहे. नुकत्याच झालेल्या स्पर्धेला शेवटची स्पर्धा समजून नवे-जुने कलाकार आवर्जून आले होते. वास्तविक एखादी स्पर्धा अथवा पुरस्कार सलग २५ वर्षे चालवल्यानंतर ती बंद करणे स्वाभाविकच आहे. पण अकलूजची लावणी स्पर्धा बंद होऊ नये, असेच कलाकारांना वाटते. ही स्पर्धा बंद झाली तर आमचे माहेर तुटल्यासारखे होईल, अशीच त्यांची भावना आहे. सोलापूरचा दमाणी पुरस्कार २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बंद करण्यात आला. पण तो पुरस्कार आता लोकमंगलच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे तसेच बळ बाळदादांनाही मिळणे गरजेचे आहे. कलाकार, गायक, लेखक, वादक आणि नृत्यांगना या सर्व कलाकारांबरोबरच थिएटर मालक आणि प्रेक्षक यांनीही ही कला जपण्यासाठी पुढे आले पाहिजे. शासनाचीही तितकीच जबाबदारी आहे. त्या कलेला वाचवणे आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे; अन्यथा भविष्यात पुन्हा धांगडधिंगाच पाहायला मिळेल.

 

Web Title: Do not break our mother ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.