हा कोडगेपणा महाराष्ट्रात रुजवू नका!

By admin | Published: June 3, 2016 02:20 AM2016-06-03T02:20:46+5:302016-06-03T02:20:46+5:30

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार स्पष्टवक्ते म्हणून प्रसिध्द आहेत. एखाद्याचे काम होणार नसेल तर त्याच्या तोंडावर तसे सांगण्यात त्यांना जराही वावगे वाटत नाही

Do not cultivate it in Maharashtra! | हा कोडगेपणा महाराष्ट्रात रुजवू नका!

हा कोडगेपणा महाराष्ट्रात रुजवू नका!

Next

अतुल कुलकर्णी (वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत)
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार स्पष्टवक्ते म्हणून प्रसिध्द आहेत. एखाद्याचे काम होणार नसेल तर त्याच्या तोंडावर तसे सांगण्यात त्यांना जराही वावगे वाटत नाही, किंवा तसे सांगताना राजकारणातल्या फायद्यातोट्याचा विचारही त्यांना शिवत नाही. कदाचित हा गुण त्यांच्याच पक्षाचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी घेतला असावा. सोपल नुकतेच एका कार्यक्रमात खूप काही स्पष्टपणे बोलले. आपण विनोदी बोलतो, त्यावर लोक हसतात, या आनंदात ते वाट्टेल ते बोलत असतात. तो त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी केलेल्या कामापेक्षा लोक त्यांच्या या अशा बोलण्याची आठवण जास्त काढतात याचेही त्यांना कौतुक वाटते! आपल्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही आपल्याशिवाय दुसरे कोणीच हसवू शकत नाही असा अहंपणाही त्यांनी जोपासल्याचे त्या दिवशी स्पष्ट झाले. जे काही सोपल बोलले, त्यातून त्यांच्या बेमुर्वतखोरपणाचे जाहीर दर्शन मात्र अवघ्या महाराष्ट्राला झाले. राष्ट्रवादी पक्ष हा पक्ष नसून निवडून येणाऱ्यांची टोळी आहे असे खाजगीत बोलणाऱ्यांचे बोलही या निमित्ताने सोपलांनी खरे ठरवले.
‘आपल्या मतदारसंघात पाण्याची पाईपलाईन आणण्याची योजना आपण मंजूर करुन घेतली, त्याचे पोस्टर्स गावभर लावले आणि त्यातच पहिली पाच वर्ष पूर्ण केली. दुसरी पाच वर्षे पाईप येणार-पाईप येणार, असे सांगून पूर्ण केली आणि तिसऱ्या पाच वर्षात पाईपलाईनला तोट्या लावून पाणी आणले. निवडून येण्यासाठी हे असे करावेच लागते’ असे जाहीरपणे सांगताना सोपल यांना मनाची आणि जनाची काहीही वाटली नाही. ‘राजकारण करायचे तर हे असे करावेच लागते असे सांगताना ज्यांना या योजनांचे श्रेय घ्यायचे होते त्यातले काही कैलासवासी झाले तर काही पैगंबरवासी झाले, आणि काही वैकुंठवासी झाले’, असे सांगण्याचा कोडगेपणाही त्यांनी दाखवून दिला. जाणता राजा म्हणून ज्यांचा उल्लेख देशभर होतो त्याच शरद पवारांनी जळत जाणाऱ्या बागांना अनुदान कसे दिले हे सांगून सोपलांनी शरद पवारांच्या कामांवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले.
महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी परंपरा आहे. आपल्या आईला पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे आहे, महिलांना विठ्ठल मंदिरात प्रवेश नाही असे प्रचंड भावनिक भाषण केशवराव धोंडगे यांनी केले होते. त्यानंतर काही महिन्यांनी मंदिर प्रवेशाचा मार्ग अंतुलेंनी मोकळा केला. तेव्हा केशवरावांनी भाषणात सरकारचे आभार मानले मात्र आज त्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी माझी माऊली जिवंत नाही असे सांगितले तेव्हा सगळ्या सभागृहाचे डोळे पाणावले होते... टोकाची संवेदनशील जपण्याची परंपरा या राज्याला आहे.
याच अंतुलेंचा आणखी एक किस्सा. तेव्हा मंत्रालय बीट कव्हर करणाऱ्या दिनकर रायकर यांना नौदलातले एक निवृत्त लेफ्टनंट भेटले. रत्नागिरीत ते एक इंग्रजी माध्यमाची शाळा चालवायचे. त्या शाळेला परवानगी मिळत नव्हती. लेफ्टनंट मंत्रालयात आले होते. सगळा प्रकार माहित झाल्यावर रायकरांनी अंतुलेंना सहाव्या मजल्यावरुन तळमजल्यावर येताना लिफ्टमधून अवघ्या काही सेकंदात हा विषय सांगितला. त्या लेफ्टनंटची चिठ्ठी दिली. त्याच रात्री साडेबारा वाजता त्या लेफ्टनंटला रत्नागिरीच्या शिक्षणाधिकाऱ्याने शोधून काढले आणि तुमच्या शाळेला परवानगी दिलीय, उद्या येऊन आदेश घेऊन जा असे सांगितले. ही जाणीव असणारे नेते या राज्यात होते.
मोरारजी देसाई मुख्यमंत्री असतानाच्या काळातला एक पट्टेवाला वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना निवृत्त झाला. त्याने मोरारजी देसार्इंना मराठीत एक पत्र पाठवून आपण गावी जात आहोत असे कळवले. मोरारजींनी वसंतराव नाईकांना फोन केला आणि माझ्या काळात जो पट्टेवाला होता तो आता निवृत्त झालाय, त्याचे पुढचे आयुष्य सुखात कसे जाईल हे पाहा अशी विनंती केली. त्या एका फोनवर नाईकांनी त्या पट्टेवाल्याचा शोध घेतला. जो ज्या जिल्ह्यात होता त्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्यांनी त्या पट्टेवाल्याला केवळ जागाच नाही तर त्या जागेवर घरही बांधून दिले! असे नेते याच महाराष्ट्रात होते.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्ते श्रीनिवास खळे यांचा सत्कार लोकमतने आयोजित केला होता. खळेकाकांना १,११,१११ रुपयांचा धनादेश त्यावेळी दिला होता. सायंकाळी कार्यक्रम होता. दुपारी तीनच्या सुमारास विलासरावांनी कार्यक्रमाचे स्वरुप माहित करुन घेतले, आणि सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाला येताना २लाख५१ हजारांचा धनादेश घेऊन ते कार्यक्रमाला पोहोचले. शिवाय त्यांनी खळेकाकांना मुख्यमंत्री कोट्यातून घरही देऊ केले.
या अशा संवेदना जपणाऱ्या परंपरा ज्या महाराष्ट्रात आहेत त्याच राज्यात सोपलांसारखे नेते तहानलेल्या शेतकऱ्यांना, मतदारांना एक पाण्याची योजना आणण्यासाठी सलग पंधरा वर्षे रडवतात, त्या योजनेचे भांडवल करुन स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेतात, आणि हे सगळे राजरोसपणे जाहीर सभेत स्वत:च्या तोंडून सांगतात देखील! ही केवळ फसवणूक नाही तर ज्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला होता त्यांच्याशी केलेली बदमाशी आहे. राष्ट्रवादीच्या काळात सिंचनाच्या योजना कशा रखडल्या, आणि सिंचनावर ७० हजार कोटी कसे आणि कुठे खर्च झाले, कोणाचे सिंचन झाले, कोणाच्या हाती आत्महत्त्येनंतरचे चेक पडले याचे झगझगीत वास्तव सोपलांनी सांगून टाकले आहे.
याच सभेत सोपलांनी आपल्या मतदार संघात गारपिट झालेली नसताना पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी नसताना आपण पालकमंत्री होतो म्हणून कसे अनुदान लाटले याची जी कबुली दिली, ती फौजदारी गुन्ह्यात मोडणारी आहे. सरकारी योजनांचा गैरवापर करणे, खोटी माहिती देणे, अधिकाऱ्यांशी संगनमत करुन फायदे लाटणे असे अनेक गुन्हे सोपलांनी जाहीरपणे सभेत कबूल केले आहेत. याची गंभीर चौकशी करण्याची तयारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवायला हवी.
सिध्दिविनायक आणि महालक्ष्मीच्या मंदिरापेक्षा जास्त गर्दी मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात असते. सरकारी हॉस्पिटलांपेक्षा दुप्पट वेगाने मंत्र्यांची ‘ओपीडी’ चालते. अवघ्या काही सेकंदात लोकांचे अर्ज ठेवून घेतले जातात आणि त्यांना केबिनबाहेर काढले जाते. त्या अर्जांचे पुढे काय होते, किती जणांना न्याय मिळतो, याचा कधीही कोणी विचार करत नाही आणि चेहरे नसलेल्या अशांचे प्रश्न सोडवण्याच्या आणाभाका घेऊन जे निवडून येतात ते निर्ढावलेल्या मनाने, कोडगेपणा दाखवत लोकाना कसे घुमवावे लागते याची जाहीर कबुली देतात. पुरोगामी महाराष्ट्र हाच आहे का, असा प्रश्न पडावा असे हे विदारक चित्र आहे. शरद पवार यांनीच यावर आता भूमिका स्पष्ट करायला हवी...

Web Title: Do not cultivate it in Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.