अन्वयार्थ तंत्रज्ञानपर लेख: भीती नको! ‘एआय’ हे भारतीय तारुण्याच्या हातातले नवे शस्त्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 10:47 AM2024-08-17T10:47:32+5:302024-08-17T10:48:16+5:30
गेली काही दशके भारतीय तरुण-तरुणींनी माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. कृत्रिम बुद्धिमत्ता ही याच वाटेवरची पुढली पायरी आहे!
- डॉ. सुधाकर पाटील, कृषी हवामान तज्ज्ञ, जळगाव
अलीकडे परदेशात अनेक क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्ता या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. भारतामध्ये सुद्धा हे तंत्रज्ञान नजीकच्या भविष्यकाळात वाढत्या प्रमाणात वापरले जाणार आहे. याबाबतीत सर्वांत मोठा भ्रम असा आहे की, या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे भारतात बेरोजगारी आणखीच वाढेल. काही अंशी हे खरे जरी मानले तरी हे सुद्धा विसरून चालणार नाही की, त्यामुळे भारतातील जे अधिक बुद्धिमान (एक्स्ट्रा टॅलेंटेड) विद्यार्थी आहेत, मग ते कोणत्याही विद्याशाखेतील असोत, त्यांना या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान प्राप्त करून ते आत्मसात करण्याकरिता परदेशात शिक्षणाच्या संधीसुद्धा आहेत. आजही आयटी क्षेत्रामध्ये परदेशात नोकरी करणाऱ्या भारतीय युवक-युवतींची संख्या लक्षवेधकच आहे. गेली किमान काही दशके भारतीय युवा बुद्धिमत्तेने या क्षेत्रात जगभरात आपला दबदबा कायम राखलेला दिसतो. कृत्रिम बुद्धिमत्ता ही याच वाटेवरची पुढली पायरी आहे, हे नक्की!
कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर केवळ चर्चा न करता ही सुद्धा एक संधी आहे, असा विचार करून करिअर ॲडव्हान्समेंटसाठी प्रयत्न करावा. या नवीन क्षेत्रात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना माहिती विश्लेषण (डेटा ॲनालिसीस) आणि यासारख्या इतर बाबींचा सखोल अभ्यास करावा लागेल. केवळ इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून चालणार नाही तर परदेशात शिक्षण घेऊन तिकडेच करिअर करायचे म्हटले तर रशियन, फ्रेंच, जर्मन आणि शक्य होईल त्या अन्य सशक्त त्या परदेशी भाषासुद्धा शिकणे अनिवार्य ठरेल. एखाद्याच्या मनात नक्की काय चालले आहे, ती व्यक्ती कोणत्या क्षेत्रात करिअरचा विचार करत आहे हे जर लक्षात आले तर उत्कृष्ट करिअरची निवड करण्याकरितासुद्धा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची मदत घेता येऊ शकेल. कॉल सेंटरमध्ये देश - विदेशात करिअर करण्यासाठी अनेक हुशार विद्यार्थीसुद्धा हल्ली कला अणि वाणिज्य शााखेतील पदवीधर होणे पसंत करताना दिसतात. परंतु, आता त्यांनीसुद्धा सायन्स, इंजिनिअरिंग या विद्या शाखांमध्ये देशात किंवा विदेशात शिक्षण घेतले पाहिजे. अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती तसेच ‘शिकत असतांना कमवा’ यासारख्या अनेक संधी अलीकडे हुशार विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. पदवी अभ्यासक्रमसुद्धा परदेशात पूर्ण करणे आता सहज शक्य झाले आहे. त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांनी आता कृत्रिम बुद्धिमत्ता या नवीन क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन ठेवायला हरकत नाही.
जसे इंडस्ट्री ४.० भारतामध्ये स्थिरावले आहे तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या करिअर किंवा वाटचालीचाच भाग असणार आहे, याच दिशेने आता तरुण विद्यार्थ्यांनी या विषयाचा विचार केला पाहिजे. हे तंत्रज्ञान आज जरी परदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आणि प्रत्यक्ष वापरात असले, तरी नजीकच्या भविष्य काळात ते भारतात सुद्धा तितक्याच वेगाने वापरात आलेले असेल आणि यथावकाश स्थिरावेल सुद्धा. भविष्यात अत्याधुनिक शेतीमध्येही याचा वापर अनिवार्य ठरला तर त्यावेळी याचे आश्चर्य वाटू नये.
या सर्व बाबींचा विद्यार्थ्यांनी आपले बुद्धिकौशल्य लक्षात घेऊन अवश्य विचार करायला हवा. देशात आणि देशाबाहेरही या विषयामध्ये असलेल्या संधी अपरंपार असतील, यावर सध्या एकमत दिसते आहे. भविष्यात सर्वच पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना भारतात चांगली नोकरी मिळेलच, याची शाश्वती देता येणार नाही... ही बाबसुद्धा लक्षात ठेवून या विषयाकडे पाहणे फायदेशीर ठरेल.