शत्रूच्या मनसुब्यांना खतपाणी घालू नका!
By विजय दर्डा | Published: February 25, 2019 05:56 AM2019-02-25T05:56:01+5:302019-02-25T05:56:28+5:30
पुलवामा हल्ल्यानंतर जम्मूमध्ये संतप्त जमावाने अनेक वाहने जाळली व काश्मीर खोऱ्यातील लोकांवर हल्ले सुरू केले. त्यामुळे जम्मूमध्ये अनेक दिवस संचारबंदी पुकारावी लागली.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर ज्याच्या मनात संताप नाही, ज्याचे रक्त खवळलेले नाही, ज्याला दु:ख झाले नाही असा एकही भारतीय नाही. प्रत्येकाचे रक्त उसळलेले आहे व प्रत्येक जण दु:खी आहे. ज्याने या हल्ल्याचे भयंकर कारस्थान रचले त्याला धडा शिकवला जावा, अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. हा संताप वाजवी आहे. पण या हल्ल्यानंतर काही लोकांनी काश्मिरी नागरिकांवर राग काढायला सुरुवात केली, ते सर्वस्वी चुकीचे आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर जम्मूमध्ये संतप्त जमावाने अनेक वाहने जाळली व काश्मीर खोऱ्यातील लोकांवर हल्ले सुरू केले. त्यामुळे जम्मूमध्ये अनेक दिवस संचारबंदी पुकारावी लागली. डेहराडून आणि प. बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत देशात अनेक ठिकाणी निर्दोष काश्मिरींना मारहाणीच्या घटना घडल्या. काही विद्यापीठांनी व शैक्षणिक संस्थांनी तेथे शिकणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांना काढून टाकण्याच्या किंवा यापुढे काश्मिरी विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचे ठरविल्याच्याही बातम्या आल्या. अखेर केंद्र सरकारला सर्व राज्य सरकारांना अशा घटना घडता कामा नये, असे बजावावे लागले. सर्वोच्च न्यायालयानेही याची गंभीर दखल घेत सर्व राज्यांना या प्रकारांना पायबंद घालण्याचे आदेश दिले. सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर, हरियाणा, मेघालय, प. बंगाल, छत्तीसगड आणि उत्तराखंड या राज्यांच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शनिवारी राजस्थानमधील सभेत ‘आपली लढाई दहशतवादाविरुद्ध आहे, काश्मिरी नागरिकांविरुद्ध नाही’, असे जाहीर करत प्रत्येक काश्मिरी नागरिकाचे संरक्षण व्हायला हवे, असे ठामपणे सांगितले.
काश्मिरींवर हल्ले करणाऱ्यांची विचारसरणी तरी काय, असा प्रश्न पडतो. काश्मीरमध्ये होणाºया दहशतवादी हल्ल्यांशी तेथील सामान्य नागरिकांचा काही संबंध नाही, एवढेही त्यांना कळत नाही? पाकिस्तानच्या अपप्रचाराने भरकटलेले व दुष्टचक्रात अडकलेले काहीे काश्मिरी युवक सुरक्षा दलांवर दगडफेक करत असतील. पण सामान्य नागरिकांना शांतता हवी आहे. डोकी भडकवलेले काही तरुण दहशतवादाच्या मार्गाला गेले असले तरी त्यांच्याहून जास्त संख्येने तरुण काश्मीरच्या पोलीस दलात, निमलष्करी दलांत व लष्करात भरती होऊन देशासाठी लढत आहेत. त्यापैकी कित्येकांनी हौतात्म्य पत्करले आहे. गेल्या वर्षी संजवान लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यावेळी शहीद झालेल्या सात जवानांपैकी पाच काश्मिरी मुसलमान होते. त्यामुळे सरसकट सर्वच काश्मिरींकडे संशयाने पाहू नका, असे मला आग्रहपूर्वक सांगायचे आहे. तेही तुमच्या-माझ्याइतकेच देशभक्त आहेत. काही माथेफिरूंचे पाप संपूर्ण राज्याच्या माथी मारू नका. अलीकडेच प्रादेशिक सेनेसाठी भरती झाली तेव्हा काश्मिरात तीन हजार तरुणांची गर्दी उसळली. वैष्णोदेवीला गेलात तर तेथेही घोडे आणि तट्टूवाले सर्व काश्मिरी मुसलमानच दिसतील.
एकेकाळी काश्मीर सूफी संस्कृतीसाठी जगात ओळखले जाई. तेथील समाजजीवनात कट्टरतेला जराही थारा नव्हता. संपूर्ण देशात प्रतिक्रिया उमटावी व भारताच्या सामाजिक समरसतेमध्ये धार्मिकतेच्या मिठाचा खडा टाकून ती नासवता यावी यासाठी पाकिस्तानने सर्वप्रथम काश्मिरी हिंदू पंडितांना तेथून हाकलून लावले. हजारो काश्मिरी पंडित देशोधडीला लागले व आपल्याच देशात इतरत्र निर्वासितांसारखे राहू लागले. पाकचा हा कुटिल डाव देशाने ओळखला व आपल्या एकजुटीत त्याने फूट पडू दिली नाही. भारतातील अनेक शहरांनी परागंदा काश्मिरी पंडितांच्या कुटुंबांना आश्रय दिला. पण सुदैवाने त्या वेळी काश्मिरी मुसलमानांविषयी सुडाची भावना कुठेही निर्माण झाली नाही. दहशतवाद्यांचा तो नक्कीच एक मोठा पराभव होता. तोच दृढनिश्चय आताही दाखवावा लागेल. भारताची सामाजिक समरसता व संघराज्य व्यवस्था खिळखिळी व्हावी, हेच आपल्या शत्रूला हवे आहे. त्यांचे हे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत, याची मला पक्की खात्री आहे. मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांच्यासारख्यांनी काश्मिरी, त्यांच्या मालावर बहिष्काराची भाषा केल्यावर संपूर्ण भारत त्यांच्याविरुद्ध उभा राहिला, या कुरापतखोरांना सारवासारव करावी लागावी, यातच आपली ताकद आहे. देशात गेल्या काही वर्षांत कट्टरपंथी शक्तींना बळकटी मिळाली, हे खरे असले तरी सामान्य भारतीयाचा आजही सामाजिक व सांप्रदायिक सौहार्दतेवर दृढ विश्वास आहे. म्हणूनच शत्रूंची चाल कधीच यशस्वी होणार नाही, हे नक्की.
आपण समाजात वैमनस्य पसरू दिले नाही तरच सीमेवर लढणाऱ्या सैन्यास अधिक बळ मिळेल. आपली सैन्यदले एकेका दहशतवाद्याला शोधून काढून त्याचा खात्मा करतील व काश्मीर पुन्हा शांततेचे नंदनवन होईल, याची देशाच्या प्रत्येक नागरिकास पूर्ण खात्री आहे. देशवासीयांना पक्का विश्वास आहे की, दल सरोवरातील हाउसबोटी पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजून जातील, लोक शिकाऱ्यांमधून फेरफटका मारू लागतील. ट्युलिपची शेते बहरली की ते सौंदर्य पाहायला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक तेथे जातील. काश्मीरच्या केशराचा मोहक सुगंध पुन्हा एकदा देशभरात दरवळेल. या केशरी सुगंधात बंदुका आणि बॉम्बच्या दारूचा जळका वास दूर पळून जाईल.
- विजय दर्डा
चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड,
लोकमत समूह