असा साथी पुन्हा मिळणे नाही!

By admin | Published: January 20, 2016 02:52 AM2016-01-20T02:52:13+5:302016-01-20T09:04:50+5:30

अरूण टिकेकरांसारखा साथी मला पत्रकारितेत पुन्हा मिळणे नाही... लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर यांनी वाहिली श्रद्धाजंली.

Do not get such a partner again! | असा साथी पुन्हा मिळणे नाही!

असा साथी पुन्हा मिळणे नाही!

Next

- दिनकर रायकर

जवळपास ३ दशकं मी इंग्रजी पत्रकारितेत होतो. त्या वेळी इंडियन एक्स्प्रेसमध्ये एक ज्येष्ठ संपादकीय सहकारी आणि माझ्यात मतभेद झाले. दोघांमध्ये कोणाच्या बाजूने उभे राहायचे असा पेच विवेक गोयंका यांच्यापुढे निर्माण झाला होता. त्यांना आम्ही दोघेही हवे होतो; पण तणाव निर्माण झाला होता हे खरे. या वादावर पडदा पाडण्याची महत्त्वाची जबाबदारी डॉ. अरुण टिकेकर यांनी त्या वेळी पार पाडली. वादामुळे मी इंडियन एक्स्प्रेसचा राजीनामा देत रजेवर निघून गेलो होतो. ही माहिती गोयंकांना मिळताच त्यांनी मला शोधण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी मोबाइल नव्हते. माझ्या घरी त्यांनी तीन-चारवेळा फोनही केले. मी एमआयजी क्लबमध्ये होतो. मी राजीनामा दिल्याचे माझ्या पत्नीला माहिती असल्याने तिने गोयंकांचा फोन आल्याचे मला कळवले नव्हते. पण सतत फोन येतोय हे पाहून तिने मला क्लबमध्ये फोन करून ही माहिती दिली व तातडीने गोयंकांशी बोलण्याचा निरोप असल्याचे सांगितले. मी घरी पोहोचलो त्याच दरम्यान टिकेकरांचाही घरी फोन आला. मी उद्या सकाळी तुम्हाला न्यायला येत आहे, असे त्यांनी सांगितले. मी म्हणालो, उद्या मी कुटुंबासह गोव्याला जातोय. माझी तिकिटेही काढून झालेली आहेत. त्यामुळे मला आॅफिसला येणे शक्य होणार नाही. थोड्याच वेळात गोयंकांचा पुन्हा फोन आला. बहुधा त्यांचे आणि टिकेकरांचे बोलणे झाले असावे. ते म्हणाले, टिकेकरांसोबत तुम्ही सकाळी ९ वाजता या, मी तुमची फक्त १० मिनिटे घेतो. माझी गाडी तुम्हाला एअरपोर्टला सोडून येईल.
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी टिकेकर मला न्यायला घरी आले. गाडीत जाताना आमचे बोलणे झाले. ते म्हणाले, तुम्हाला लोकसत्तेमध्ये डेप्युटी एडिटर म्हणून घेतो असे मी गोयंकांना सांगितलेले आहे. असे झाले तर मला खूप आनंद होईल आणि त्यांच्यावरचा मोठा ताण कमी होईल असे गोयंकांचेही म्हणणे असल्याचे टिकेकर मला रस्त्यात सांगत होते... आॅफिसात पोहोचलो. गोयंकांनी लगेच आत बोलावले व टिकेकरांची आॅफर मी स्वीकारावी असा आग्रहही धरला. मी थोडा वेळ मागून घेतला. मला घरच्या लोकांशी बोलावे लागेल असे म्हणालो. जरूर बोला, पण ही आॅफर तुम्ही स्वीकारली आहे असे मी गृहीत धरतो... त्यावर मी फार काही बोललो नाही; पण तेथून त्यांच्याच गाडीने मी एअरपोर्टला गेलो. गोव्याची ट्रीप करून परत आलो आणि लोकसत्तेत जॉईन झालो. टिकेकरांमुळे मी मराठी वृत्तपत्रसृष्टीत आलो व आजपर्यंत येथेच रमलो.
टिकेकरांचे वेगवेगळे पैलू, विद्वत्ता त्यांचे मराठी व इंग्रजीवरील प्रभुत्व, विविध विषयांचा व्यासंग प्रचंड होता. रोजच्या संपादकीय बैठकीत होणारी चर्चा मला रोज नवीन काही शिकवून जात असे. त्यांनी केलेल्या स्वच्छ हस्ताक्षरातील लेखनाचा पहिला वाचक होण्याचा मान अनेकवेळा मला मिळाला. त्यांनी केलेले लिखाण कंपोजला जाण्याआधी माझ्याकडे यायचे. त्यांची स्वत:ची अशी वेगळी शिस्त होती. अग्रलेख लिहून झाला की ते आॅफिसमध्येच जेवण करायचे. अग्रलेख कंपोज होऊन येईपर्यंत मला घेऊन एक राऊंड मारत. रस्त्यावरचे चणे, फुटाणे विकत घेऊन खात खात फेरी मारणे, वाटेत चहाची तल्लफ भागवणे हे त्यांचे आवडीचे छंद होते. त्या वेळी ते वेगवेगळे किस्से, नवीन काही वाचले असेल तर त्याविषयीची माहिती सांगायचे. स्वत: क्रिकेटीयर असल्याने या खेळाची त्यांना प्रचंड आवड. कोणता क्रिकेटर काय बोलला इथपासूनची माहिती ते सांगत असत. त्यांच्या बैठकीत सतत वेगळे व नवे काहीतरी ऐकायला मिळत असे. मुंबई - पुणे असा त्यांचा सतत प्रवास चालू असायचा. पुण्याविषयीच्या गोष्टी, किस्से रंगवून सांगणारे टिकेकर कधीकधी अस्सल कथाकारच वाटायचे. त्यांचे बोलणे संदर्भांनी भरलेले असायचे. हातात सिगारेट घेऊन, धुराचे वलय सोडत किस्से सांगणारे टिकेकर ऐकणे आनंदाचा विषय असायचा. निवृत्तीनंतर मी औरंगाबाद लोकमतचा संपादक झालो आणि कालांतराने टिकेकरही सल्लागार संपादक म्हणून तेथे आले. पुन्हा आमची बातम्या, अग्रलेख यावर चर्चा सुरू झाली. त्यांच्या जाण्याचे वृत्त आले आणि अनेक आठवणी ताज्या झाल्या. आज ते आपल्यात नाहीत. मात्र असा साथी मला पत्रकारितेत पुन्हा मिळणे नाही. माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
(लेखक लोकमत वृत्तपत्राचे समूह संपादक आहेत.)

Web Title: Do not get such a partner again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.