ना आघाडी, ना युती

By admin | Published: January 25, 2017 01:04 AM2017-01-25T01:04:42+5:302017-01-25T01:04:42+5:30

नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपा-सेनेने राज्यात लक्षणीय यश मिळविले असले तरी मराठवाड्यात काँग्रेस, राष्ट्रवादीने बहुतांश ठिकाणी

Do not lead, neither coalition | ना आघाडी, ना युती

ना आघाडी, ना युती

Next

नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपा-सेनेने राज्यात लक्षणीय यश मिळविले असले तरी मराठवाड्यात काँग्रेस, राष्ट्रवादीने बहुतांश ठिकाणी आपले वर्चस्व कायम ठेवले. नांदेडसारख्या ठिकाणी आजघडीस १६ पैकी ११ नगराध्यक्ष काँग्रेसचे आहेत. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, भाजपा-सेना युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ जिल्हानिहाय सुरू आहे़ निर्णयाची जबाबदारी स्थानिक पातळीवर सोपवून नेत्यांनी जिथे गरज, तिथे आघाडी, युती असा सूर लावला आहे़ परंतु जागावाटपाचा तिढा शेवटच्या क्षणापर्यंत सुटणार नाही़ जिथे काँग्रेसचे प्राबल्य आहे, तिथे स्थानिकांना राष्ट्रवादीसोबत आघाडी नको आहे़ जिथे राष्ट्रवादीचे प्राबल्य, तिथे त्यांना जागा-वाटपातलाही अधिकचा हिस्सा काँग्रेसला द्यायचा नाही़ परिणामी नांदेड, परभणीमध्ये आघाडी होण्याची सूतराम शक्यता नाही़ हिंगोलीमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे़ जे काँग्रेस व राष्ट्रवादीचे सुरू आहे, त्याच्याही पुढे काकणभर भाजपा-सेनेचे सुरू आहे़
मराठवाड्यात भाजपाच्या तुलनेने शिवसेना अनेक ठिकाणी प्रबळ दावेदार आहे़ त्यामुळेच भाजपाची लढाई काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आधी शिवसेनेसोबत आहे़ शिवसेनेलाही आपल्या जागा कायम राखण्यासाठी भाजपासोबतच संघर्ष करावा लागणार आहे़ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तुलनेने भाजपा-सेनेची आपसातील स्पर्धा अधिक तीव्र दिसून येत आहे़ त्यामुळेच नांदेडमध्ये युती होणार म्हणत असतानाच बोलणी फिस्कटली़ हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे स्पष्ट बहुमत आहे़ नांदेड, परभणी जिल्ह्यांमध्येही शिवसेनेचे जि.प़ सदस्य अधिक संख्येने निवडून आले आहेत़ तरीही भाजपाला जागावाटपातील हिस्सेदारी बरोबरीची हवी आहे़ उदाहरणादाखल नांदेड दक्षिण मतदार-संघाचे आमदार शिवसेनेचे, मात्र भाजपाला तिथे तीन जागा हव्या आहेत़ शिवसेनेने एक जागा देण्याला अनुकूलता दर्शविली़ पालिका निवडणुकीत कुंडलवाडी वगळता जिल्ह्यात यश मिळालेले नसतानाही भाजपाकडून कुरघोडी होत असल्याची भावना शिवसेनेची आहे़ दुसरीकडे भाजपालाही केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या बळावर स्वतंत्र निवडणूक लढवायची आहे़ त्यामुळे सर्वात आधी भाजपाने शिवसेनेसोबत युती होणार नाही असे पत्रच नांदेडमध्ये दिले़ परभणी, हिंगोलीतही भाजपा-सेना एकत्र येताना दिसत नाहीत. त्याचवेळी लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, नगरपालिका या सर्वच निवडणुकांमध्ये काँगे्रसचे प्राबल्य असलेल्या नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादीची आघाडीसाठी दोन पावले मागे येण्याची तयारी आहे़ दरम्यान, शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारसभेत माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीही ही आघाडीची सुरुवात असल्याचे म्हटले तरी जिल्हा परिषदेत आघाडीची शक्यता नाही़ मात्र राष्ट्रवादीच्या काही जागांना काँग्रेसची मदत होईल अन् निवडणुकीनंतरच आघाडीची घडी सुरू होईल़, असे दिसते़
परभणीतही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची राजकीय स्पर्धा लक्षात घेता तिथेही आघाडी होणार नाही़ हिंगोलीत विरोधी बाकावर असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा मार्ग अजूनही खुला ठेवला आहे़ एकंदर आघाडी, युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत सुरू राहील, शेवटी अपवादवगळता सर्वत्र स्वतंत्र लढाई होईल़
पालिकेच्या निकालानंतर मराठवाड्यात काँग्रेसचा उत्साह अधिक वाढला आहे़ राष्ट्रवादीही आपल्या जागा कायम ठेवण्याच्या तयारीत आहे़ भाजपा-शिवसेनेला स्वत:ची स्वतंत्रपणे ताकद दाखवून द्यायची आहे, परंतु मराठवाड्यात भाजपाच्या तुलनेत शिवसेनेचे प्राबल्य लक्षात न घेता भाजपाने व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरेल की अतिआत्मविश्वास ठरेल हे निकालानंतर कळणारच आहे.
- धर्मराज हल्लाळे

Web Title: Do not lead, neither coalition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.