‘तुझं माझं जमेना, तुझ्याशिवाय करमेना’
By admin | Published: September 12, 2014 09:00 AM2014-09-12T09:00:05+5:302014-09-12T09:10:52+5:30
लोकसभेतील हवा आज नाही, ही गोष्ट युतीवालेही कबूल करतात. पण म्हणून दोन्ही काँग्रेसमध्ये सारे आलबेल आहे, अशातला भाग नाही.
मोरेश्वर बडगे, राजकीय विश्लेषक
आघाडी आणि महायुतीतील शह-काटशहाचे राजकारण संपता संपायला तयार नाही. विधानसभा निवडणुका दारात आल्या असतानाही ना आघाडीचा पत्ता आहे ना महायुतीचा. जागावाटपही नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी गेली १५ वर्षे सरकारमध्ये एकत्र आहेत. भाजपा आणि शिवसेनाही गेली २५ वर्षे युती करून एकत्र लढत आहेत. जागावाटपावरून यांच्यात थोडीफार धुसफूस चालायची. जागावाटपाचे गुऱ्हाळ अखेरपर्यंत चालायचे. पण आजच्याएवढे कुणी ताणून धरले नव्हते. या खेपेला प्रत्येकालाच स्वबळाचा जरा अधिकच साक्षात्कार झालेला दिसतो. लोकसभा निवडणुकीत अवघ्या चार जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीने हत्तीचे बळ आल्याच्या जोशात निम्म्या जागांवर दावा ठोकला. काँग्रेसही खाली उतरायला तयार नाही. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयामुळे भाजपाचाही आत्मविश्वास दुणावला. आतापर्यंत महाराष्ट्रात ‘लहान भावा’ची भूमिका वठवणारा भाजपा निम्म्या जागा मागतो आहे. महायुतीत नव्याने आलेल्या चार घटक पक्षांचा दावा मानला तर आणखी एक विधानसभा निर्माण करावी लागेल, अशी परिस्थिती आहे. काँग्रेस आघाडीतील राजकारण कुरघोडीचे आहे. पण युतीतील शर्यत मुख्यमंत्रिपदासाठी आहे. मुख्यमंत्रिपद पाहिजे तर जास्त जागा लढवायला मिळायला हव्यात. आतापर्यंत शिवसेना जास्त जागा लढवत आली. यंदा प्रथमच भाजपाने मोठा हिस्सा मागताच शिवसेनेने बोलणीच थांबवली. चार दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत ‘मातोश्री’वर येऊन गेले; पण अजून फॉर्म्युला बाहेर आलेला नाही. कार्यकर्तेच नव्हे तर नेतेही गोंधळले आहेत. मैत्रीत कुठलीही जागा मित्रपक्षाला सुटू शकत असल्याने साऱ्यांचाच जीव टांगणीवर आहे. मध्यंतरी तर युती तुटतेय की काय, अशी हवा पसरली होती; पण तसे काहीही होणार नाही. बार्गेनिंग पॉवर वाढवण्याच्या राजकारणातील या क्लृप्त्या आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच हे नखरे गुंडाळून तडजोडी केल्या जातील. शिवसेना आतापर्यंत दादागिरी करीत आली. पण या वेळी अमित शहांनी तिला खिंडीत गाठले आहे. शिवसेनेला थोडे नमते घ्यावे लागेल. आघाडीतही कुरघोडीचे दिवस आता गेले. दोन्ही काँग्रेस एकमेकाच्या विरोधात उभ्या राहिल्या तर काय होईल, हे कुणी सांगायला हवं? खरंच भाजपा स्वबळावर लढली तर काय होईल? हे अमित शहांना कळत नसणार, असं आपण कसं म्हणणार? तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २७.५७ टक्के मते मिळाली होती, तर शिवसेनेने २०.८२ टक्के मते घेतली होती. काँग़्रेसला १८.२९ टक्के मते मिळाली, तर १६.१२ टक्के म्हणजे काँग्रेसपेक्षा तुलनेने २ टक्के कमी मते घेऊनही राष्ट्रवादीने काँग्रेसच्या दुप्पट म्हणजे चार जागा जिंकल्या. आकडेवारीची ही सारी गणिते पृथ्वीराज चव्हाण यांनी आणि मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उतरलेल्या भाजपाने नक्कीच सोडवली असणार. त्यामुळे आघाडी किंवा महायुतीत सुरू असलेल्या स्वबळाची भाषा, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती हा सारा फार्स आहे. दोन काँग्रेस गेली १५ वर्षे नांदून कंटाळल्या आहेत. भाजपा-शिवसेनेचा संसार तर तब्बल २५ वर्षांचा आहे. रडत रडत संसार करायचा की काडीमोड घ्यायचा, हे त्या त्या राजकीय पक्षांना ठरवायचे आहे. ‘तुझं माझं जमेना, पण तुझ्यावाचून करमेना’ अशी मित्रपक्षांची स्थिती आहे. महायुतीत उद्धव ठाकरे आणि आघाडीत अजितदादा बाह्या कितीही वर करीत असतील तरी स्वबळाचे भान दोघांनाही छान असणार. लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशाने प्रथमच भाजपाला स्वत:मधील ताकदीचा साक्षात्कार झाला खरा. शिवसेनेचे लोढणे फेकून देण्याची भाजपाला या वेळी सुवर्णसंधी होती. अमित शहा काही भूकंप घडवून आणतील, अशा टेररमध्ये युतीवाले होते; पण तेही नरम निघाले. कदाचित निकालानंतर काही वेगळी समीकरणे पुढे येऊ शकतात. हल्ली राजकारणात काहीही होऊ शकते. राजकारणात मोठे तोडफोड निर्णय करायला जबरदस्त इच्छाशक्ती लागते. नरेंद्र मोदी सुरुवातीला ‘शतप्रतिशत भाजपा’च्या मूडमध्ये होते. पण महाराष्ट्रात बदलत्या हवेचे सिग्नल्स गेल्याने त्यांनी दोन पावले मागे जाणे पसंत केले, अशी माहिती आहे. आणि आता काही करतो म्हटले तर ती वेळ केव्हाच निघून गेली आहे. बोलायला ठीक आहे; पण २८८ जागांवर उमेदवार लढवायचे म्हणजे सोपी गोष्ट नाही. आघाडी असो किंवा महायुती. आता आघाडी तुटणार नाही आणि युतीही भंगणार नाही. साऱ्यांना एकत्र मिळून लढावे लागेल. रेकॉर्डवर मिळून लढत असले तरी मनाने कुणीही एकत्र नाहीत, हा प्रचंड विरोधाभास आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे ही निवडणूक सोपी जाईल, अशा स्वप्नरंजनात युतीने राहण्याचे कारण नाही. कारण विधानसभा निवडणुकीची गणिते वेगळी असतात. स्थानिक राजकारण इथे प्रबळ असते. लोकसभा निवडणुकीत २४० विधानसभा मतदारसंघात युती आघाडीवर होती. पण म्हणून आता युतीच्या तेवढ्या जागा पक्क्या, असं गणित कुणी मांडत असेल तर गडबड आहे. त्याचे कारण आहे. तीन महिन्यांपूर्वी दिसणारा मोदी फॅक्टर आज गायब आहे. युतीला अनुकूल अशी राजकीय हवा असली तरी युतीवाले तिचा फायदा उठवण्याच्या परिस्थितीत नाहीत. भाजपामध्ये सुरू असलेल्या भाकडभरतीने युतीचे मार्केट खराब केले आहे. सत्ता मिळवण्याची खात्री असलेल्या भाजपाला असल्या निरुपयोगी नेत्यांना प्रवेश देण्याची गरज का वाटावी? आपले उमेदवार का जाहीर करता येऊ नयेत? किमान पहिली यादी तर देता आली असती? लोकसभेत लोकांनी उमेदवार पाहिला नाही, मोदींकडे पाहिले. आज मोदींची पुण्याई संपली असे मानायचे का? नागपूर महापालिकेतील सत्तापक्ष नेता द्यायला भाजपाला डोके खाजवावे लागते, याचा अर्थ काय? लोकसभेतील हवा आज नाही, ही गोष्ट युतीवालेही कबूल करतात. पण म्हणून दोन्ही काँग्रेसमध्ये सारे आलबेल आहे, अशातला भाग नाही.
दोन्ही काँग्रेसने नारळ फोडून रणशिंग फुंकले, हे चांगले केले. लोकसभेत मोदींनी आक्रमक पद्धतीने मार्केटिंग केले होते. चार महिन्यांआधी मोदींनी प्रचार सुरू केला होता. आता निवडणूक दारात आली तरी मोदी आपल्या टीमला ऊठ म्हणत नाहीत, याचा अर्थ काय? काँग्रेस आघाडीलाही आक्रमक पद्धतीने रणांगणात उतरावे लागेल. गेली १५ वर्षे दोन्ही काँग्रेस सत्तेत आहेत. अँटी इन्कंबन्सी हा फॅक्टर मोठा राहील. या निवडणुकीत मोदी फारसे लक्ष घालण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीत. फार फार तर काही सभा करतील. पण काँग्रेसचे टारगेट मोदीच राहणार आहेत. मोदी मैदानात असोत वा नसोत, मोदी हाच हॉट विषय राहणार आहे. संपूर्ण निवडणूक मोदींभोवती फिरणार आहे. मोदींनी ‘अच्छे दिन’ आणले की नाही, याचा निकाल या विधानसभा निवडणुकीत लागणार आहे.