जीएसटीमध्ये कुणाचीही दिशाभूल करू नका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 03:10 AM2019-08-05T03:10:22+5:302019-08-05T03:11:31+5:30
कर लावताना किंवा गोळा करताना करदात्याने सावधानता बाळगावी.
- उमेश शर्मा, सीए
अर्जुन : (काल्पनिक पात्र) कृष्णा, जीएसटीमध्ये चुकीचे दर लावणे म्हणजे काय?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुन, चुकीचा दर लावणे याचा अर्थ असा की, करदात्याकडून वस्तू व असलेल्या दरापेक्षा कमी किंवा जास्त कर रक्कम गोळा करणे.
उदा. एखादा फळविक्रेता केळी विकत असेल. जीएसटीमध्ये करमुक्त आहे, परंतु त्या विक्रेत्याने चुकीने १२ टक्के दर लावला, तर त्याला त्या कृतीवर दंड भरावा लागेल, तसेच शीर्षकामध्ये सांगितल्याप्रमाणेच जीएसटीमध्ये कुणाचीही दिशाभूल करू नका, म्हणजेच करदात्याने कोणतीही चूक करू नये व कायद्याचे पालन करावे.
अर्जुन : कृष्णा, एका अभिनेत्याने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे आणि तो खूप चर्चित झाला व वादविवादासाठी पात्र ठरला, तर त्यात नेमके काय आहे?
कृष्ण : अर्जुन, अभिनेत्याने नुकतेच मागील आठवड्यात टाकलेल्या व्हिडीओमध्ये त्यास केळ्यांच्या जोडीसाठी ४४२.५0 रुपये द्यावे लागले, हे दर्शविले आहे. व्हिडीओमध्ये दाखविलेल्या बिलाप्रमाणे करापूर्वीची रक्कम ही ३३५ रुपये दोन केळींसाठी आणि त्यावर १८ टक्के जीएसटी असे दर्शविते.
तसेच त्यावर चंदीगड केंद्रशासित प्रदेशच्या विभागातर्फे कारणे दाखवा नोटीस अंतर्गत योग्य कारण न मिळाल्यामुळे २५ हजार रुपये दंड लावण्यात आला. वरील उदाहरणावरून प्रश्न असा निर्माण होतो की, केळीच्या करमुक्त वस्तूवर हॉटेल कशा प्रकारे १८ टक्के कर लावू शकते? परंतु हॉटेल हे सेवा पुरविणारी संस्था आहे आणि हॉटेलच्या सोयीनुसार ५ टक्के किंवा १८ टक्के हा कर लावू शकते, तसेच ५ स्टार हॉटेलसाठी २८ टक्के दरसुद्धा आहे. तर कर लावण्यापूर्वी लागू असलेला जीएसटी कर निश्चित करणे गरजेचे आहे.
अर्जुन : कृष्ण, चुकीचा दर लावल्यासंबंधी कोणता दंड आहे?
कृष्ण : अर्जुन सीजीएसटी कायद्यामध्ये कलम १२२ अंतर्गत चुकीच्या दरासंबंधी असलेले दंड नमूद केले आहे. कलम १२२ नुसार जर एखाद्या नोंदणीकृत व्यक्तीने जी वस्तू किंवा सेवा किंवा दोन्हींचा ही पुरवठा करत असेल व त्याने कर कमी अथवा भरला नसेल किंवा चुकून परत केला असेल, तर त्यास दंड म्हणून-
अ) १0 हजार रुपये किंवा,
ब) त्या व्यक्तीकडून देय असलेल्या कराच्या १0 टक्के यांपैकी जी रक्कम जास्त असेल, ती गोळा करण्यात येईल.
अर्जुन : कृष्ण, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुन, करदात्याने लागू असलेलेच दर जीएसटीअंतर्गत लावावे. जर समजा करदात्याने चुकीने जास्त कर गोळा केला असेल, तर त्याला तो सरकारला परत करावा लागेल. कर लावताना किंवा गोळा करताना करदात्याने सावधानता बाळगावी. तात्पर्य, ‘जीएसटी में किसको नहीं बनाना’ म्हणजेच ‘उल्लू बनाना’ हे चुकीचे दर लावण्याच्या संदर्भात म्हटले जाते.