शेतक-यांच्या प्रक्षोभाकडे दुर्लक्ष नको!
By रवी ताले | Published: January 2, 2018 12:15 AM2018-01-02T00:15:41+5:302018-01-02T00:15:43+5:30
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, पूर्व विदर्भातील चंद्रपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कार्यक्रमास अनुपस्थित डॉक्टरांना नक्षलवादी होण्याचा सल्ला दिला अन् पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी संतप्त शेतक-यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांमध्ये जाळपोळ केली.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, पूर्व विदर्भातील चंद्रपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कार्यक्रमास अनुपस्थित डॉक्टरांना नक्षलवादी होण्याचा सल्ला दिला अन् पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी संतप्त शेतक-यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांमध्ये जाळपोळ केली.
अहीर यांचे वक्तव्य आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. अहीर त्यांच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेल्या डॉक्टरांवर चिडले होते. संतापाच्या भरात, तुम्ही नक्षलवादी व्हा, म्हणजे आम्ही तुम्हाला गोळ्या घालू, असे बोलून ते मोकळे झाले. डॉक्टर मंडळी अहीर यांचा सल्ला नक्कीच मनावर घेणार नाही; पण बुलडाणा जिल्ह्यातील दोन घटना बघता, आदिवासींनंतर शेतकरीही नक्षलवादाच्या मार्गावर निघतात की काय, अशी शंकेची पाल मनात चुकचुकल्याशिवाय राहत नाही.
ऐन रब्बी हंगामात कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता, कृषी पंपांचा वीज पुरवठा तोडण्याचा सपाटा महावितरण कंपनीने लावला आहे. त्यामुळे चिडलेल्या शेतक-यांनी चिखली तालुक्यात आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात, तर मलकापूर तालुक्यात मलकापूरचे नगराध्यक्ष हरीश रावळ यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यालयांमध्ये जाळपोळ केली.
सत्ताधारी या प्रकारांना राजकीय ‘स्टंट’ अथवा शेतकºयांचा स्थानिक प्रक्षोभ संबोधून, त्याकडे दुर्लक्ष करण्याचीच भूमिका घेतील; मात्र नक्षलवादाचा प्रारंभ शेतकºयांच्या प्रक्षोभातूनच झाला होता, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नक्षलवादी चळवळ आता प्रामुख्याने घनदाट जंगलांमधील आदिवासींपुरती मर्यादित झाली असली, तरी तिचा प्रारंभ अन्यायाच्या विरोधातील शेतकºयांच्या प्रक्षोभातूनच झाला होता.
आज पुन्हा एकदा महाराष्ट्र व गुजरातसारख्या तुलनात्मकरीत्या पुढारलेल्या राज्यांमधील शेतकरीही अन्यायाविरुद्ध पेटून उठताना दिसत आहेत आणि त्यातूनच मग कधी तरी बुलडाणा जिल्ह्यात घडल्या तशा जाळपोळीसारख्या घटना घडतात. सध्या तरी या घटना तुरळक स्वरूपाच्या आहेत; मात्र शेतकरी वर्गात ज्या गतीने असंतोष वाढत आहे, तो बघता अशा घटनांची वारंवार पुनरावृत्ती होण्याची आणि पुढे त्यातूनच एखादे हिंसक आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कृषी पंपांचा वीज पुरवठा तोडण्याच्या महावितरणच्या धोरणाच्या विरोधात असंतोष वाढू लागला आहे. शेतकरी संघटनांनी त्या विरोधात आवाज बुलंद करण्यास प्रारंभ केला आहे. अजित नेवले यांच्या नेतृत्वाखालील किसान सभेने तर ‘पॉवर स्टेशन’ ताब्यात घेण्याचा इशारा दिला आहे. हल्ली शेतकरी संघटनांमध्येही स्पर्धा वाढली आहे. मुद्यांच्या शोधात असलेल्या राजकीय पक्षांनाही शेतकरी वर्ग नेहमीच खुणावत असतो. या स्पर्धेतून उद्या एकमेकांवर मात करण्याच्या इर्षेपोटी आंदोलनांचे अधिकाधिक जहाल मार्ग शोधल्या जाण्याचा धोका नाकारता येत नाही. अशा वेळी आंदोलन नेतृत्वाच्या हातून केव्हा निसटेल आणि उग्र स्वरूप धारण करेल, हे सांगता येत नाही. सत्ताधाºयांनी या घटनाक्रमाची वेळीच योग्य ती दखल घेतली नाही, तर पश्चात्तापाची पाळी येऊ शकते.