निवडणूक नको...मग बांधा रेशीमगाठी
By admin | Published: April 29, 2015 11:22 PM2015-04-29T23:22:19+5:302015-04-29T23:22:19+5:30
कर्नाटक सीमेवरील बोरूळ गावाने निवडणुकीसंदर्भात एक नवा दृष्टिकोन ग्रामीण महाराष्ट्राला दिला.
कर्नाटक सीमेवरील बोरूळ गावाने निवडणुकीसंदर्भात एक नवा दृष्टिकोन ग्रामीण महाराष्ट्राला दिला.
भाजपाच्या प्रदेश महासंपर्क
अभियानाचे प्रमुख आमदार सुभाष देशमुख यांना भावलेला हा दृष्टिकोन
भाजपाच्या नव्या सदस्यांना
भावेल काय...!
निवडणुकांचे राजकारण दिवसेंदिवस अनाकलनीय बनत चालले आहे. मतदारांची मानसिकता आणि निवडणुकीतील विजय याचे पक्के सूत्र कसे मांडायचे, याचे उत्तर अनेक राजकारण्यांना मिळत नाही. विकासाची कामे, प्रतिमा आणि मतदारांची मनं नाही जमली तरी मतं वळवू शकणारी ‘मीडिया मॅनेजमेंट’ यांचा मेळ घालता-घालता उमेदवारांची दमछाक होते. ग्रामपंचायतीसारख्या गाव पातळीवरील निवडणुकीत तर ईर्षा, हेवेदावे आणि हाणामाऱ्या ठरलेल्याच ! शहरामधील कॉलनीजमध्येदेखील आमच्या कॉलनीला रंग द्या, अमुक करा, तमुक करा तरच मते देऊ’ असा सूर उमटतो. पैशांची उधळण आणि वेगवेगळ्या आमिषांची पखरण तर अपरिहार्यच ! या सर्वाला अपवाद ठरण्याचेही प्रयत्न चालले आहेत ही समाधानाची बाब आहे.
पक्षीय राजकारणाच्या पलीकडे झेप घेत तसा प्रयत्न सोलापूर जिल्ह्यात झाला. कर्नाटकाच्या सीमेवर दक्षिण सोलापूर तालुक्यात सातशे लोकवस्तीचे बोरूळ हे आडवळणाचे गाव. गाव शंभर टक्के कन्नडभाषिक आहे. अठरा पगड जाती असलेले हे गाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने प्रकाशात आले. ग्रामपंचायतीत विजयी होणारा गट आपल्याच तंबूत राहावा यासाठी सर्वच नेत्यांचा प्रयत्न असतो. त्यातून गावकरी मागतील ते देण्याची तयारी नेते ठेवतात. बोरूळच्या ग्रामस्थांनी मात्र वेगळाच अनुभव दिला.
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार सुभाष देशमुख, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अविनाश महागावकर व पदाधिकाऱ्यांसह या गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी, हा उद्देश घेऊन या गावात दाखल झाले. गावकरी सांगतील ती विकासकामे आपण करू, पण निवडणूक बिनविरोध व एकदिलाने व्हावी, अशी भावना आमदार देशमुख यांनी गावकऱ्यांपुढे मांडली. गावकऱ्यांनी त्यांची भावना स्वीकारली, पण मागणी मात्र वेगळीच पुढे केली ! ‘निवडणूक नको, तर मग गावात जमलेली लग्नं लावून द्या’, असा आग्रह धरला. ‘लोकमंगल’ समूहाच्या माध्यमातून सामुदायिक विवाहाची चळवळ उभी करून २१०० तरुणांचे सासरे बनलेल्या आ. देशमुखांच्या दृष्टीने तर हा आग्रह म्हणजे दुधात साखरच ! त्यांनी लगेचच गावकऱ्यांची मागणी मान्य केली आणि लगीनघाई सुरू झाली. निवडणूक बिनविरोध तर झालीच; पण ग्रामपंचायतीचे नेतृत्व महिलांच्या हाती देण्याचा निर्णय झाला. गावातील तीन मुलं आणि अकरा मुलींची लग्नं जमलेलीच होती. दि. २७ एप्रिल रोजी पंचक्रोशीतील अनेक गावांच्या साक्षीने बोरूळ गावात चौदा जोडप्यांचा विवाह आ. सुभाष देशमुख यांनी आपल्या ‘लोकमंगल’ परिवाराच्या माध्यमातून थाटात पार पाडला. गावजेवण ठेवण्यात आल्यामुळे त्या दिवशी गावात चूल पेटली नाही. बोरूळ गावाने निवडणुकी-संदर्भातील नवा दृष्टिकोन महाराष्ट्रापुढे ठेवला आहे. प्रचार आणि निवडणूक तंत्रात कमालीची आधुनिकता आल्याचे आपण अनुभवतो. सोशल मीडियापासून ते थेट गावपातळीवरील कार्यकर्त्यांना हाताळण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी ‘कॉर्पोरेट’ शैली आपलीशी करण्यावर भर दिला जात असताना सोलापूर जिल्ह्यात सामुदायिक विवाहाचा वेगळ्या दृष्टिकोनातून वापर होतो, ही कौतुकाची बाब. त्यात मंत्रिपदाने हुलकावणी दिलेले आ. सुभाष देशमुख प्रयोगशील, कल्पक आणि तरीही व्यावसायिकतेला सामाजिक बांधीलकीची जोड देणारे नेते म्हणून ओळखले जातात. भाजपाने देशात ‘मिस्ड कॉल’ सभासद नोंदणीचा इतिहास घडविल्यानंतर देशमुख यांच्यावर राज्यातील सदस्य नोंदणीचा लेखा-जोखा घेणाऱ्या प्रदेश महासंपर्क अभियानाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. बोरूळच्या ग्रामस्थांनी ‘निवडणूक नको, तर रेशीमगाठी बांधा!’ असे म्हटले. आता नवे पक्षसदस्य देशमुख यांना काय बरे म्हणतील?
- राजा माने