‘डोंट टेक सीरियसली’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2016 02:18 AM2016-06-05T02:18:07+5:302016-06-05T02:18:07+5:30
टिंगल टवाळी, चेष्टा, कुचेष्टा, गंमत, मस्ती, मजा अशा अनेक माध्यमातून आपल्या साऱ्यांचा संवाद सुरू होतो, पण या जराशा गमतीला कुणीतरी गांभीर्याने घेते आणि अभिव्यक्ती
- विनायक पात्रुडकर
टिंगल टवाळी, चेष्टा, कुचेष्टा, गंमत, मस्ती, मजा अशा अनेक माध्यमातून आपल्या साऱ्यांचा संवाद सुरू होतो, पण या जराशा गमतीला कुणीतरी गांभीर्याने घेते आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जगाचा प्रवास सुरू होतो. कोणत्या गोष्टीला किती गांभीर्याने घ्यायचे, हे एकदा नक्की ठरवले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा बंद होते.
आज विविध मराठी वाहिन्यांवर विनोद निर्मितीचे उत्तम कार्यक्रम सुरू असतात. ‘चला हवा येऊ द्या’ किंवा ‘कॉमेडी एक्स्प्रेस’सारख्या विनोदी मालिकांना रसिकांनी डोक्यावर घेतले आहे. त्यामुळे कोणत्या विनोदाला डोक्यावर घ्यायचे आणि कोणत्या विनोदाला पायाखाली चिरडायचे, याची जाण आपल्या कसलेल्या मनाला माहीत आहे. तन्मय भटच्या सुमार विनोदाला कोणता रस्ता दाखवायचा, हे प्रेक्षक ठरवतीलच.
अलीकडे एक ‘व्हॉटसअॅप’ संदेश फिरतो आहे की, लग्नाआधी मुला-मुलींच्या पत्रिका तपासून गुण पाहण्यापेक्षा दोघांचे मोबाइल तपासा, कोण किती संस्कारशील आहे, हे लगेच कळेल...
वाचल्यानंतर विचार करायला लावणारा संदेश नक्कीच आहे. हे वाचत असतानाच प्रत्येकाच्या मनात आपल्या मोबाइलमध्ये नेमके काय साठवले आहे, याचा भिरभिरता विचारही सुरू असेल. हा संदेश झाला, लग्नापूर्वीच्या गोष्टी ठरविण्यासाठी. लग्नानंतर तर काय, मोबाइलमध्ये शेकडो किस्से फिरत असतात. आता हाच किस्सा वाचा...
पत्नी म्हणते, अहो मला मर्सिडीज गाडी घेऊन द्या.
पैशाने त्रासलेला पती : अजिबात नाही.
पत्नी : ठीक आहे, तुमच्या मोबाइलचा पासवर्ड सांगा.
पती : मर्सिडिज कोणत्या रंगाची हवी आहे?
अशा चुटक्यांनी आपल्या गालावरही हास्याची लकेर उमटते. आपण मराठी माणसही अशीच चेष्टा-मस्करी करत जगणारी, हसवणारी, मनमुराद हसणारी. त्यामुळे अभिजात विनोदाची उत्तम साहित्य निर्मितीही याच मराठी मुलुखात निर्माण झाली. उच्च कोटीतल्या ‘पुल’चा विनोद असो वा अस्सल गावरान इनोदी शंकर पाटलांचा फटका असो. अनेक नामवंत विनोदी साहित्यिकांनी मराठी मनाची अतिशय उत्तम मशागत केलीय. त्यामुळे कोणत्या दर्जाच्या विनोदाला किती महत्त्व द्यायचे, याची उत्तम जाणीव आपल्याला नक्कीच आहे. हे सर्व लिहिण्याचे कारण नुकताच एआयबी यांच्या एका कार्यक्रमात भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्याविषयी अत्यंत हीन पातळीवरचा प्रसारित झालेला व्हिडीओ. सर्वच माध्यमांनी त्यावर टीकेची झोड उठविली. पोलिसांकडे तक्रारही दाखल झाली. काही संवेदनशील समूहाने मग अभिव्यक्तीच्या नावाने बोंब ठोकण्यास सुरुवात केली. कुणीतरी तन्मय भट नावाच्या अँकरची ही क्लिप दाखविली. ही क्लिप कशी वाईट आहे, हे सांगण्यासाठी विविध वाहिन्यांनी ती पुन्हा-पुन्हा दाखविली. अर्थात, त्यामुळे ही क्लिप काही लोकप्रिय झाली नाही, तरीही अभिरुचीहीन, विनोदाची निर्मिती कशी असते, त्याचे दर्शन मात्र झाले. अशा विनोदांचीही कमतरता आपल्याकडे नाही. पूर्वीपासून तमासगीरांचे विनोदही आपण योग्य जागा दाखवत रिचविलेले आहेत. काही पांढरपेशी, उच्चभ्रू लोक कमरेखालच्या विनोदांना अचरटपणाचा शिक्का मारत कचऱ्यात फेकून देतात, पण प्रत्येक विनोदाची पातळी ही शेवटी व्यक्तीसापेक्ष असते हेच खरे. कुणाला कोणत्या पातळीवरचा विनोद आवडेल, हे सांगता येत नाही. राजकीय कोट्यांचा विनोद समजण्यासाठी त्या काळचे संदर्भ माहीत असण्याची गरज असते, नाहीतर 'बाउन्सर' जाण्याची शक्यता असते. त्यामुळे विनोद निर्मितीकडे पाहताना स्थळ, काल याचेही महत्त्व असते.
पूर्वी आपल्याकडे ‘टवाळा आवडे विनोद’ अशी म्हण होती, पण कालौघात ‘विनोद आवडे सर्वांना’ अशी म्हण रूढ झाली. केलेला विनोद कुणावर आणि कोणत्या दर्जाच्या कोणत्या परिस्थितीत हे महत्त्वाचे असते. आपल्याकडे प्र. के अत्रेंपासून द. मा. मिरासदारांपर्यंत विनोदी साहित्याची, व्याख्यानांची, वात्रटिकांची मोठी परंपरा आहे. घटना, पात्र आणि प्रसंगाकडे कोणत्या नजरेने पाहायचे आणि उत्तम विनोद निर्मितीचा आनंद कसा घ्यायचा, याचे बाळकडू मराठी माणसाकडे असल्यामुळेच ही परंपरा महाराष्ट्रात टिकून आहे. व्यंगचित्रे असो वा वात्रटिका मराठी रसिकजनांनी या विनोदांना आयुष्यात वरचे स्थान दिले आहे, हेही तितकेच खरे आहे. आपल्याकडे दादा कोंडकेंनीही विनोदाची पातळी सोडूनही सर्वांना हसविले. तरीही त्यांच्या चित्रपटांचा विक्रमच झाला. त्यामुळे विनोद कशाशी खातात, याची जाण आणि भान नसलेल्या 'एआयबी' शोच्या क्लिपना किती प्राधान्य द्यायचे, हे वेगळे सांगण्याची गरज राहिलेली नाही. आज सचिन तेंडुलकर असो वा लता मंगेशकर, यांना डोळ्यापुढे आदर्श ठेवून आयुष्याचे भवितव्य घडविणारी शेकडो तरुण मंडळी आहेत. त्यांच्या भावनांना कदाचित अशा क्लिपमुळे धक्का बसू शकतो, पण या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचा संघर्ष आणि कर्तृत्व इतके उंच आहे की, तद्दन भट सारख्या दर्जाहीन विनोदाने त्यांची उंची जराही कमी होणार नाही. उलट तन्मय भटच्या अभिरुचीचा प्रश्न मात्र निर्माण झाला आहे. अर्थात, एआयबीचा उद्देशच नकारात्मक प्रसिद्धी मिळविणे हा असल्याने, सचिन, लतासारख्या माणसांचा उपयोग करून त्यांचा हेतू तो साध्य करतोय. प्रश्न आहे, तो आपण आपल्या प्रवाहात त्याला किती महत्त्व द्यायचे ते. यापूर्वीही अनेकदा सुमार विनोदी दर्जाची लाट येऊन गेली आहे, पण ती तेवढ्यापुरतीच. कारण आजही मराठी साहित्यात ‘पुलं’चा विनोदच उच्च कोटीतला ठरला आहे. साहित्य असो, चित्रपट असो किंवा नाटक असो, त्यातल्या विनोदांनी कलाकारांनी आपले आयुष्य समृद्ध केले आहे. चार्ली चॅप्लीनपासून लॉरेन हार्डीच्या विनोदालाही महाराष्ट्राच्या भूमीने सन्मानाचे स्थान दिले आहे. शि. द. फडणीसांपासून बाळासाहेब ठाकरेंच्या मर्मभेदी रेषांनी हसवत-हसवत मराठी माणसांना अंतर्मुख करायला लावले आहे. शब्द, रेषा, चित्र आणि आवाजाच्या माध्यमातून महाष्ट्रातील विनोद फुलला, रुजला, बहरला त्याचा वटवृक्षही झाला. त्या वटवृक्षाला कधी काटेरी फळांनी बाळसं धरण्याचा प्रयत्न केला, पण मराठी माणसांनी या काटेरी फळांना लांब भिरकावून दिले. कारण विनोदाचा दर्जा आणि अभिरुचीबाबत महाराष्ट्र देशात अव्वल आहे, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे ‘एआयबी’ सारख्यांच्या विनोदाला लांब फेकून द्यायलाच हवे. दुसऱ्या एका माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून एआयबी आर्थिक संकटात सापडल्याची अफवा होती. त्यातून बाहेर येण्यासाठी काहीतरी वादग्रस्त, झणझणीत मसाला त्यांना हवा होता. सचिन, लतादीदींवर शिंतोडे उडवून पुन्हा एआयबी चर्चेत आला. यात तथ्य कितपत आहे, याची कल्पना नाही, पण स्वत:चा कथित टीआरपी टिकविण्यासाठी तन्मय भटने हे उद्योग केले असतील, तर त्याच्या अभिरुचीहीनतेला ‘तुस्सी ग्रेट हो’ असेच म्हणावे लागेल. या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा करणेही अयोग्यच. कारण ज्या 'लाइटली' तन्मयने हे विनोद सादर केले आहे, त्यांना ‘सीरियसली’ घेण्याची गरज नाही, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे तन्मय आणि ‘एआयबी’ला ‘डोंट टेक सीरियसली’.
(लेखक ‘लोकमत’ मुंबई आवृत्तीत कार्यकारी संपादक आहेत.)