नको नको हे कुत्र्याचं जिणं
By गजानन दिवाण | Published: January 15, 2018 02:16 AM2018-01-15T02:16:51+5:302018-01-15T02:17:05+5:30
माणसांचे तोंडावर एक आणि मागे दुसरेच असते. माणसे माणसांनाही सोडत नाहीत. तुम्ही चौकाचौकांत ज्याला दररोजच्या जेवणावळी समजता ते माणसांनी खाऊन खाऊन उरलेले किंवा खराब झालेले अन्न असते.
माणसांचे तोंडावर एक आणि मागे दुसरेच असते. माणसे माणसांनाही सोडत नाहीत. तुम्ही चौकाचौकांत ज्याला दररोजच्या जेवणावळी समजता ते माणसांनी खाऊन खाऊन उरलेले किंवा खराब झालेले अन्न असते. आता सर्वांनी एकच करायचे. हाडाच्या तुकड्यामागे आपण धावतोच. असे काही जण माणसांमध्येही असतात.
खरंच आम्हा कुत्र्याइतका शहाणा आणि इमानदार प्राणी कुठेच सापडणार नाही, असे गुणगान माणसे सतत का बरे गात असावेत? घराची आणि शेताची राखण करतो. प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून धन्याचे प्राण वाचवतो... किती किती हे कौतुक?
औरंगाबादेतील चौकाचौकांत रोज न मागता पोटभर खायला मिळते. अगदी ठरल्या वेळेला म्हणजे रात्री १० ते ११ वाजेदरम्यान आणि भल्या सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर. यासाठी कुणावरही भुंकण्याची वा अंगावर जाण्याची गरज नाही. कुठल्या चौकात घरगुती भाजी-पोळी, कुठल्या चौकात हॉटेलातील भाजी-पोळी, कुठेकुठे तर अगदी मांसाहारसुद्धा. काही काही चौकांत अगदी रोज नवीन डिश. असा रोजचा पाहुणचार स्वत: माणसांना सुद्धा अपवादानेच मिळत असावा कदाचित. आमचे पोट भरल्यानंतरच महापालिकेची कुठली तरी घंटागाडी यायची आणि उरलेले अन्न घेऊन जायची. कधी कधी तर तीही यायची नाही. म्हणजे आमचे पोट भरले नाही, हे त्यांना आधीच समजत असावे कदाचित. औरंगाबादेत चार वर्षांपासून गुण्यागोविंदाने भर रस्त्यावर असा संसार सुरू होता. या काळात कधीच कुणी टोकले नाही; पण अचानक गेल्या आठवड्यात वृत्तपत्रांतून एक जाहिरात आली. आमची नसबंदी केली जाणार आहे म्हणे. याला काय अर्थ? भरपूर खायचे-प्यायचे, पण वंश वाढवायचा नाही. माणसांचे असे हे वागणे म्हणजे खाऊ-पिऊ घालून जिवंतपणीच मारण्याचा प्रकार नव्हे का? होते चूक प्रत्येकाकडून. तशी गेल्या आठवड्यात आमच्याही भाईबंदाकडून झाली. तब्बल १८ चिमुकल्यांना चावा घेतला. आम्हालाही वाईट वाटले त्याचे. म्हणून काय प्रत्येक कुत्रा वाईट म्हणायचा? कुत्र्यांनी चावा घेतलेल्या जखमी मुलांना पाहून माणसांनी माणुसकीच सोडून दिली त्यांची. आम्ही फक्त चावा घेतला. ही माणसे तर एकमेकांचे खून पाडतात. रक्तातल्या नात्यालाही ते सोडत नाहीत. म्हणून काय त्यांचीही सरसकट नसबंदी करायची?
या एकाच घटनेने माणुसकीचे पितळ उघडे पाडले. माणसाच्या प्रत्येक वागण्याचा अर्थ आज आम्हाला कळू लागला आहे. एकीकडे इमानदार म्हणून आम्हा कुत्र्यांची पाठ थोपटायची आणि त्याचवेळी कुत्र्याची मौत मारतो, असेही म्हणायचे. घराची रखवालदारी करण्याची वेळ आली, की गुणगान गायचे आणि दुसरीकडे माणसांमध्ये बोलताना द्वेषाने कुत्र्यासारखे पिसेन, असेही म्हणायचे. घराबाहेर मी भुंकू लागलो, की इमानदार म्हणून गुण गायचे. स्वत: माणसांमध्येच कुणी मोठ्याने बोलू लागला की मात्र कुत्र्यासारखे भुंकू नको, असेही म्हणायचे...
एक ज्येष्ठ कुत्रा म्हणाला, ‘माणसांचे तोंडावर एक आणि मागे दुसरेच असते. आपण तर फार दूर. माणसे माणसांनाही सोडत नाहीत. तुम्ही चौकाचौकांत ज्याला दररोजच्या जेवणावळी समजता ते माणसांनी खाऊन खाऊन उरलेले किंवा खराब झालेले अन्न असते. माणसांच्या सुरक्षेसाठी असतो तो सुरक्षारक्षकही माणूसच. तो कधी उलटेल याचा नेम नाही. म्हणून रखवालीसाठी आम्हा कुत्र्यांचे कौतुक. आता सर्वांनी एकच करायचे. हाडाच्या तुकड्यामागे आपण धावतोच. असे काही जण माणसांमध्येही असतात. त्यांनाच हेरायचे. काही तुकडे टाकून नसबंदी करणाºया नव्या कंपनीलाही औरंगाबादेतून पिटाळून लावायचे. अगदी चार वर्षांपूर्वी केले तसे.’
- गजानन दिवाण