मान्सूनच्या आविष्काराची नासाडी नको!
By वसंत भोसले | Published: June 12, 2018 12:44 AM2018-06-12T00:44:49+5:302018-06-12T00:44:49+5:30
मान्सूनचा पाऊस हा निसर्गाचा आविष्कार. त्याला प्रतिसाद द्यायला हवा. त्याची साठवणूक केली, पण जपणूक करण्यास आपण शिकलो नाही. तो दरवर्षी मान्सूनच्या आगमनाच्या प्रतीक्षेत जूनचा महिना सुरू होतो. ७ जूनला मृग नक्षत्राचा प्रारंभ होतो. पेरण्यांची धांदल सुरू करण्यासाठी नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या जोराबरोबर येणा-या ढगांकडे डोळे लागलेले असतात. तो प्रथम लक्षद्वीप समूहाच्या बेटावर येतो. दिवस उगवेल तेव्हाच आपण निसर्गाची आराधना केली असे होईल. '
दरवर्षी मान्सूनच्या आगमनाच्या प्रतीक्षेत जूनचा महिना सुरू होतो. ७ जूनला मृग नक्षत्राचा प्रारंभ होतो. पेरण्यांची धांदल सुरू करण्यासाठी नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या जोराबरोबर येणा-या ढगांकडे डोळे लागलेले असतात. तो प्रथम लक्षद्वीप समूहाच्या बेटावर येतो. केरळमध्ये प्रवेश करतो. एका सप्ताहात तो धावत धावत कोकण किनारपट्टीवरून पश्चिम घाटाला गवसणी घालतो. संपूर्ण कोकणाला ओलेचिंब करीत घाटमाथ्यावर बरसायला सुरुवात करतो आणि त्याच्या आविष्काराबरोबर कडक उन्हाने तावून निघालेल्या जमिनीचा नूरच बदलून जातो.
घाटमाथ्यावर एव्हाना पेरण्यांची तयारी झालेली असते. नद्यांच्या पात्रातील कोल्हापुरी टाईप बंधा-यांच्या फळ्या काढून मान्सूनच्या पावसाच्या सरींनी धो धो वाहणा-या पाण्याला वाट करून दिलेली असते. धरणांचे दरवाजे बंद करून साठा करण्याची तयारी होते. या साठ्याची दररोज सुरू होते मोजदाद. गेल्या चोवीस तासात पडलेल्या पावसाची रोज सकाळी ८ वाजता आकडेवारी जाहीर होते.
हा मान्सून पुढे विंध्य पर्वतापर्यंत धावत जातो. त्याला अडून खानदेश आणि विदर्भाची काळीभोर जमीन ओली करून सोडतो. पूर्व विदर्भातील जंगलात तर तो धो धो कोसळतो. दादाजी खोब्रागडे यांच्या संशोधनाने निर्माण झालेले वाण पेरले जाते. त्याला धान म्हणतात. अशी ही उत्तम शेती पिकविणारा मान्सूनचा पाऊसच दैवत आहे.
चालूवर्षी तो वेळेवर आला आहे. नद्या-नाल्यांना तांबडे पाणी वाहू लागले आहे. हा मान्सून दूरवर अद्याप पोहोचायचा आहे. तो अगदी भारताच्या अतिपूर्वेकडील ईशान्य प्रांतापर्यंत जाणार आहे. महाराष्टÑाचा क्रमांक केरळ, कर्नाटक आणि गोव्यानंतर लागतो. त्यामुळे खरीप हंगामाचा हमखास पेरा होतो. गेल्या काही वर्षात तो वेळेवर आला नाही. पुरेसा बरसला नाही. परतीचा पाऊसही वेळेवर पडला नाही. त्याचा फटका पिकांना बसला.
असा हा मान्सून मराठी माणसाच्या जीवनाचा भाग झाला आहे. कृष्णा, गोदावरी आणि नर्मदा नद्यांच्या खोºयातील सर्व नद्या तो वाहत्या करतो आहे. त्यावर बांधलेल्या धरणांची कवाडे भरतो आहे. ते पाणी आपण वर्षभर वापरतो आहोत. मान्सून निसर्गदत्त आहे. त्याचे पाणी म्हणजे नैसर्गिक आविष्कारच आहे. तो भरभरून देतो. कृष्णा खोºयात तर जवळपास चार हजार टीएमसी पाणी वापरण्यायोग्य देतो. जमिनीत मुरणारे, विहिरीत साचणारे याची गणती किती तरी अधिक पटीची असणार आहे. त्या पाण्याचा वापर करताना मात्र आपण गैर वागतो आहे. निसर्गाने दिलेली ही देणगी नाश होणार नाही, खराब होणार नाही याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतो आहोत. गंगा आणि यमुना नद्यांच्या खोºयाप्रमाणेच कृष्णा नदीच्या खोºयातील सर्वच नद्यांचे साठविलेले पाणी खराब करीत आहोत. ते वापरून परत नद्यांमध्ये सोडून मूळ प्रवाहच नष्ट करीत आहोत. येत्या काही दिवसांत इतिहासप्रसिद्ध शाहूकालीन राधानगरीचे धरण तुडुंब भरेल. कोयना धरण भर भर भरत जाईल. पंचगंगेवरील पाचही धरणे महिन्याभरात भरून वाहू लागतील. या पाण्यावर ऊसशेती फुलणार आहे. माणसाची आणि पशु-पक्ष्यांची तहान भागणार आहे. उद्योगांना पाणी मिळणार आहे. त्याची नासाडी व्हायला नको! निसर्गाच्या या आविष्काराला प्रतिसाद द्यायला हवा. त्याची साठवणूक केली, पण जपणूक करण्यास अद्याप आपण शिकलो नाही. तो दिवस उगवेल तेव्हाच आपण निसर्गाची आराधना केली असे होईल. मान्सूनच्या आगमनाचे स्वागत करताना हा निर्धार करू या!
(bhosalevasant@gmail.com)