मनाचिये गुंथी - पहिले उरले नाही

By Admin | Published: March 29, 2017 12:59 AM2017-03-29T00:59:02+5:302017-03-29T00:59:02+5:30

‘कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही’ या गोविंदाग्रजांच्या कवितेच्या ओळीने माझ्या कैक रात्री जागविल्या आहेत़ ‘जगायचीपण

Do not worry first | मनाचिये गुंथी - पहिले उरले नाही

मनाचिये गुंथी - पहिले उरले नाही

googlenewsNext

‘कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही’ या गोविंदाग्रजांच्या कवितेच्या ओळीने माझ्या कैक रात्री जागविल्या आहेत़ ‘जगायचीपण सक्ती आहे/ मरायचीपण सक्ती आहे’ ‘हा आमचा सक्तीचा काळ, भक्ती हरवलेला़’ ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’, राम नगरकरांच्या भूपाळीने मराठी माणूस जागा होई़ त्यातील सडासंमार्जन, धेनुचे हंबरणे, गाईच्या धारा सगळेच हरवले़ दर बुधवारी रात्री १० वाजता रेडिओवर लागणारी ‘आपली आवड’ - मराठी गीतांची ही मालिका म्हणजे कुटुंबातील सर्वांसाठी पर्वणी़ आवड उरली नाही़ आपलेपणाला तर तडेच गेले़ प्रवासात पळणाऱ्या झाडांचे सुखद दर्शन कोणीच घेत नाही कारण मुलेसुद्धा मोबाइलशी खेळण्यातच दंग़ तालेवार मामाने गाव केव्हाच सोडले़ तो मुंबईला राहतो चाळीत़ मामी नोकरी करते़ तिला कोणी आले गेलेले चालत नाही़ ती सुगरण आहे का नाही माहीत नाही़ कारण ती इडली, समोसा, पॅटीस, वडापाव गाड्यावरूनच मागवते़
मी काही माझ्या आजी-आजोबांना पाहिले नाही़ आईची माया आणि वडिलांचा धाक मात्र अनुभवला आहे़ बाजारातून तयार पदार्थ विकत आणणे म्हणजे कमीपणाचे मानले जाई़ तो नऊवारी साडीचा काऴ नऊवारी साडी म्हणजे वात्सल्याची ऊब़ आजीच्या जीर्ण झालेल्या साड्यांची गोधडी म्हणजे नातवंडांसाठी अप्रूप़ भातवरण, भाजी, आमटी, चटणी, पोळी किंवा भाकरी एवढाच मेनू घरोघरी़ खवय्ये नावाचा प्राणी जन्मास आला नव्हता़ माणसे अन्नाविषयी तक्रार न करता तृप्तीची ढेकर देऊनच पानावरून उठत, आवडीनिवडीचे स्थान गौण होते़ पानात टाकण्याची मुभा कोणालाही नव्हती़ ‘खाऊन माज; पण पानात टाकून माजू नकोस’ हे घरोघरी ऐकायला मिळे़ संसार काटकसरीचा होता म्हणून संसारात सुख-शांती होती़ उधळपट्टीला थारा नव्हता़ सुख-दु:ख सारेच वाटून घेत़ माणसे शिकलेली नव्हती; पण फार समंजस होती़ मुली लाजायच्या, छोटी मुले दंगामस्ती करायची, वडील डोळे वटारायचे कधी कधी चड्डी ओली होईपर्यंत बडवायचे, आई चुका पदराआड घालायची़
दिवेलागणीला सारे घरी़ घराची म्हणून एक शिस्त होती़ दुसऱ्याचे घेणे म्हणजे गुन्हा होता़ पोलिसांचा धाक होता़ खाकी वेशातील पोलिसांना पाहून मुले घाबरत़ आता कोणीच कोणाला घाबरत नाही़ दृष्कृत्यापासून रोखत नाही़ मला काय त्याचे? एवढ्या बेपर्वाईने वागतात़ आदर्शाला मूठमाती आपण केव्हाच दिली आहे़ संस्काराची नाळ तोडूनच टाकली आहे़
‘नाही कोण कोणाचा
बापलेक मामा भाचा
मग अर्थ काय?
बेंबीचा विश्वचक्री’
ती बेंबी मात्र आदि मानवापासून अंतिम मानवापर्यंत राहणार आहे़ पहिले उरले नाही; पण बेंबी मात्र आहे पहिली आणि अंतिम़

- डॉ. गोविंद काळे

Web Title: Do not worry first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.