तसला गाढवपणा नको रे बाप्पा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:24 AM2017-11-25T00:24:21+5:302017-11-25T00:24:44+5:30
गाढवांची इमर्जन्सी बैठक सुरू होती. राज्यातील ‘थिंक टँक’ ( यांचाही थिंक टँक असतो बरं का!) बैठकीला उपस्थित होता. काही तरुणतुर्कही आवर्जून आले होते.
-दिलीप तिखिले
गाढवांची इमर्जन्सी बैठक सुरू होती. राज्यातील ‘थिंक टँक’ ( यांचाही थिंक टँक असतो बरं का!) बैठकीला उपस्थित होता. काही तरुणतुर्कही आवर्जून आले होते. अजेंड्यावर एकच विषय होता. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गाढवांबद्दल केलेले वक्तव्य. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गाढव जरी गेले तरी ते माणूस म्हणून बाहेर येते’ या खडसेंच्या विधानाची समस्त गाढव जातीने गंभीर दखल घेतली होती. उपस्थितांपैकी काहींच्या मते हे विधान गाढवांना हीन लेखण्याच्या प्रकारातले होते, तर काहींना खडसेंनी गाढवांना माणसाच्या समकक्ष दर्जात आणून ठेवल्याचे वाटत होते.
अध्यक्ष महोदय उठून उभे राहिले
अध्यक्ष : मित्रों....! (मित्रों... ऐकताच उपस्थितांत खसखस पिकली. एकजण हळूच पुटपुटला... हाही संघात जाऊन आला वाटते.) या खसखसीकडे दुर्लक्ष करून अध्यक्ष म्हणाले, मित्रांंनो ही काही ‘चाय पे चर्चा’ नाही. किंवा ‘मन की बात’ही नाही. एका गंभीर विषयावर मंथन करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. खडसेंचे विधान गंभीरतेने घेण्याची गरज आहे. आपल्याला संघात पाठवायचे, तेथे माणूस झाल्यावर भाजपात प्रवेश द्यायचा. अशारीतीने देशात भाजपाचे संख्याबळ वाढवायचे ही खेळी त्यामागे असू शकते. ..पण खडसेंना भाजपा वाढविण्याचे कारणच काय? ते तर बीजेपीच्या ब्लॅकलिस्टवर आहेत म्हणे... एका तरुण तुर्काची पृच्छा.
अध्यक्ष : ते माणसांचे राजकारण आहे. तुला नाही कळायचे. केवळ गिरीश महाजनांनाच पक्ष वाढविता येतो असे नाही, मी पण वाढवू शकतो असे खडसेंना दाखवून द्यायचे असेल... समजलास!
तरुण तुर्क : माझी आणखी एक शंका आहे... संघात गेलेला गाढव माणूस बनून भाजपात जातो, पण... डायरेक्ट भाजपाच्या गोटात गेलेला माणूस गाढव का ठरतो?
अध्यक्ष : तू कुणाबद्दल बोलतोय?
तरुण तुर्क : मला कुणाचे नाव घ्यायचे नाही, पण... ‘स्वाभिमान’ ठेवणाºयाने भाजपात जाऊ नये असे माझे मत आहे. बिचाºयाची काय गत झाली, हे आपण बघतोच आहोत.
अध्यक्ष : आपण मात्र तसला गाढवपणा करायचा नाही. ठरलं तर मग...ना संघात जायचे, ना माणूस बनायचे, माणसात आधीच गाढव कमी का आहेत...!