परिस्थितीशी करू या दोन हात

By admin | Published: April 3, 2016 03:51 AM2016-04-03T03:51:05+5:302016-04-03T03:51:05+5:30

या जगातील कुठल्याच माणसाला आपल्या पेल्यातील पाणी एका थेंबानेही कमी झालेले चालणार नाही. ताटातला अन्नाचा एक कणसुद्धा कमी झालेला चालणार नाही. अचानक हादरविणाऱ्या

Do these two hands with the situation | परिस्थितीशी करू या दोन हात

परिस्थितीशी करू या दोन हात

Next

- डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर

या जगातील कुठल्याच माणसाला आपल्या पेल्यातील पाणी एका थेंबानेही कमी झालेले चालणार नाही. ताटातला अन्नाचा एक कणसुद्धा कमी झालेला चालणार नाही. अचानक हादरविणाऱ्या गोष्टी आपल्या कल्पनेतसुद्धा नसतात. या गोष्टी वास्तव जीवनात खरोखर घडतात, तेव्हा आपल्या अस्तित्वालाच हादरे बसायला लागतात. का बरे आपण आयुष्यात घडणाऱ्या या त्रासदायक प्रसंगांना नाकारतो. का आपण या विपरित परिस्थितीला विरोध करतो. या गोष्टी इतरांच्या आयुष्यात घडत नाहीत का? अनेक टोकाच्या प्रतिकूल गोष्टी या ऐहिक विश्वात सगळ््यांच्याच आयुष्यात कधी ना कधी घडतात.

मानवी मनाचा सुखी असण्याचा एककल्ली दृष्टिकोन मात्र, लोकांना सत्य परिस्थितीपासून मैलो दूर नेऊन सोडतो. त्यामुळेच तर विपरित परिस्थितीचा डोस पचनी पडत नाही. त्यामुळे दुसऱ्यांना तर आपण त्रास देतोच, पण स्वत:ला त्रास करून घेणे, स्वत:चा दु:स्वास करणे, स्वत:वर टीका करणे ओघाने आलेच. गंभीरपणे विचार केल्यास लक्षात येते की, आपलेच सर्व काही आलबेल असायलाच पाहिजे, हा संकुचित विचारच आपल्याला वस्तुस्थिती आहे तशी स्वीकारण्यापासून परावृत्त करतो. म्हणून माणूस निराशेचा बळी ठरतो व दु:खाचा धनी होतो.

अनेक अघटित, मनाला न पटणाऱ्या, हृदयाला हादरविणाऱ्या घटना आयुष्यात घडत असतात. आयुष्य या भयावह घटनांच्या भोवऱ्यात हरवून जाते. कधी आपल्या लहान भावंडाचा मृत्यू, आयुष्याचा जोडीदार आयुष्यातून कायमचा दुरावतो, कधी जीवलग मैत्रीण एखाद्या दुर्धर आजारात बळी जाते, कधी अचानक आर्थिक फटका बसतो. हातातली नोकरी जाते वा जिवाभावाची विश्वासाची माणसेच फसवितात. हे सगळे अनुभव भयानक असतात. या प्रत्येक अनुभवाने आपण घायाळ होतो, खचून जातो. जणू हा प्रत्येक अनुभव आपल्याला संपवून टाकतो की काय, असेच वाटते. आपल्या या अशा घटनांवर, त्या आपल्या आयुष्यात घडल्या आहेत, असा अजिबात विश्वास बसत नाही. असं कसं होऊ शकते? हे असं उफराट आपल्या आयुष्यात तरी व्हायला नको, या भूमिकेवर आपण हटून बसतो.
दु:खदायक गोष्टी आयुष्यात घडूच नये, या हव्यासापायी या गोष्टी जेव्हा कधी आपल्या आयुष्यात घडतात, तेव्हा आपण संतापतो, उदास होतो व तणावग्रस्त होतो. या घटना आयुष्यात घडून अनेक वर्षे झालेली असतात, पण आपण या विपरित घटना घडतात, तेव्हा वेदनेच्या त्या भयाण चक्र व्यूहात अलगद शिरतो, पण तो चक्रव्यूह भेदून बाहेर यायचा मार्ग आपल्याला माहीत नसतो. किंबहुना, तो सुटकेचा अनमोल मार्ग शोधायचा प्रयत्नही आपण करत नाही. आयुष्यात जे-जे गमावले व आपल्याला जे-जे मिळाले नाही, त्याची जबाबदारी आपण स्वत: घेत नाही, म्हणजेच आपण वस्तुस्थितीचा सहज स्वीकार करत नाही. अवतीभवतीची परिस्थिती आणि आयुष्य आपल्या विचारांनुसार, आपल्या मतानुसार व सोयीनुसार चालावे, यासाठी आपण जिवापाड प्रयत्न करतो.
मानवी आयुष्यात घडणारे सामान्य प्रतिकूल प्रसंग वा अनाकलनीय गोष्टी जेव्हा नकारात्मक असतात, आपल्याकडे जे काही आहे, ते हिरावून घेणाऱ्या असतात, तेव्हा आपली प्रतिक्रियाही पराभूत करणारी असते. जे घडले ते मन मानत नाही. सुंदर विधायक व जमेच्या घटनासुद्धा कधी-कधी अचानकच घडतात. तेव्हा आपण आनंदाच्या भरात एक दणदणीत पार्र्टी देतो, पण हा आनंदाचा भर काही खूप का टिकत नाही. आपण पुन्हा कळत नकळत विपरित परिस्थितीच्या पिंजऱ्यात अलगद शिरतो आणि त्यात दीर्घकाल अडकूनही जातो. असे का? काय विरोधाभास आहे हा माणसाच्या संकुचित दृष्टिकोनाचा. आपल्या आयुष्यात कुठलीही गोष्ट आनंदी असावी, ही वस्तुस्थिती नाही आणि तशी परिस्थिती सातत्याने असेल, ही खात्री नाही.
एकदा का परिस्थिती ‘जशी आहे तशी’ स्वीकारली की, आपल्या मनावरचा भार आपण स्वत:च कमी करतो. सत्य परिस्थितीला नाकारणं खरं तर आपल्याला सुंभ बनविते. आपण तिथेच अडकतो, त्या विपरित प्रसंगातून बाहेर यायचेही आपल्याला सूचत नाही, पण एखाद्या गोष्टीत आपण फसले आहोत, आकस्मिक संकटात सापडले आहोत ही जाणीव झाली, तरच सुटकेचे पुढचे पाऊल आपण घेऊ शकतो. एखादी न पटणारी गोष्ट जर आपल्याला बदलता येणे शक्य नसेल, तर ती तशी घडायला नको होती, या अविचारी संभ्रमात भरकटण्यापेक्षा ती आता तशी घडली आहे, हे सत्य स्वीकारल्यास आपण समस्येतून मार्ग काढू शकतो. आपल्या विधायक ऊर्जेला नष्ट करणाऱ्या राग, संताप आणि निराशा या भावनांतून बाहेर पडत, आपले आयुष्य आपल्याला सुखी कसे करता येईल, याचा शोध घेऊ शकतो. ज्या क्षणी आयुष्यातले सत्य मग ते कटू का असेना, ते आपण स्वीकारले की, आपण परिस्थितीशी दोन हात करावयास मोकळे झालेले असतो.

Web Title: Do these two hands with the situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.