मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर पर्यटन स्थळे करा…!

By अतुल कुलकर्णी | Published: December 25, 2023 09:20 AM2023-12-25T09:20:52+5:302023-12-25T09:21:50+5:30

अनेकांची सुटी पर्यटन या महामार्गावरच पार पडले.

do tourist places on mumbai pune expressway | मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर पर्यटन स्थळे करा…!

मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर पर्यटन स्थळे करा…!

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी रोज पाच रेल्वे आहेत. पुण्याहून मुंबईला येण्यासाठी तेवढ्याच. या पाच रेल्वेमधून रोज ७,५०० प्रवाशांची ने-आण होते. १,००० लोकांनी मुंबई-पुणे-मुंबई डेली प्रवासाचे पास काढलेले आहेत. त्याशिवाय रोज मुंबईहून पुण्याला काही हजार वाहने जातात. एखाद्या दिवशी मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी रेल्वे बंद पडली तर हे सगळे लोक बस किंवा कारने पुण्याला जातील. त्यावेळी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे गर्दीमुळे पूर्णपणे कोलमडून जाईल. शनिवार, रविवार जोडून एखादी सुटी आली किंवा सलग चार दिवस सुट्या असल्या की मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बंद पडणार किंवा लोकांना किमान पाच ते सहा तास या रस्त्यावर अडकून पडावे लागते. हे रोजचे झाले आहे. तासन तास वाहतुकीचा खोळंबा होत असतानाही प्रशासनाला त्याचे काहीच वाटत नाही. महामार्ग पोलिस किंवा अन्य कोणतीही यंत्रणा ही कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. नाताळच्या सुटीतही हेच घडले. सुटी साजरी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या लोकांना आठ-आठ तास या रस्त्यावर अडकून पडावे लागले. अनेकांची सुटी पर्यटन या महामार्गावरच पार पडले.

सरकारने आता मुंबई-पुणे- मुंबई या महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा पर्यटन स्थळे विकसित करावीत. खाण्या-पिण्याची ठिकाणे उघडावीत, जेणेकरून लोकांना घराबाहेर पडल्याचा आणि पर्यटनाचा आनंद तरी मिळेल. या महामार्गावर वाहतुकीची कोंडी होणारा नेमका काळ कोणता? हे समजून त्यावर उपाययोजना करण्यासाठी कोट्यवधी रुपये देऊन सल्लागार नेमण्याची गरज नाही. छोट्या छोट्या उपायांतून गर्दी सुरळीत होऊ शकते. मात्र ते करण्याची मानसिकता यंत्रणेजवळ नाही. मुंबई-पुणे-मुंबई या महामार्गावर ठराविक कालावधीमध्ये वाढणाऱ्या गाड्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी हा महामार्ग चारवरून आठ पदरी करणे शक्य नाही. त्यासाठी लागणारा खर्च आणि वेळ दोन्ही गोष्टी कोणत्याही सरकारला परवडणाऱ्या नाहीत. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठीचा हा उपाय असू शकत नाही. साउथ कोरियामध्ये सोल ते बुसान या महामार्गावर अशीच वाहनांची गर्दी होत होती. त्या ठिकाणी तिथल्या प्रशासनाने ‘इन्फॉर्मेशन सिस्टीम’ व्यवस्थित केली. कोणत्या वेळेला या महामार्गावरून किती गाड्या जाऊ शकतात? याचे वेळापत्रक दिले. 

पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम विकसित केली. त्यामुळे त्या ठिकाणी कधीही तासन तास रस्त्यावर गाड्या अडकून पडल्या, असे चित्र पाहायला मिळाले नाही. आपण अशी कायमस्वरूपी यंत्रणा का उभी करत नाही, याचे उत्तर महामार्ग प्रशासनाला द्यावेच लागेल.

जगात कुठेही अवजड वाहन रस्त्याच्या मधोमध किंवा रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवताना चालक दिसत नाहीत. महाराष्ट्र एकमेव प्रदेश आहे, ज्या ठिकाणी अवजड वाहने उजव्या बाजूने बिनदिक्कत जातात. अवजड वाहनांनी रस्त्याच्या शेवटच्या लेनमधून आणि छोट्या वाहनांनी पहिल्या दोन लेनमधून प्रवास केला तर ही समस्या मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात येऊ शकते. 

मात्र, दोन-चार ट्रक रस्त्याच्या मधोमध किंवा उजव्या बाजूने चालतात आणि या महामार्गावर वाहतुकीचा विचका करून टाकतात. हे सातत्याने घडत असले तरी महामार्ग पोलिस, आरटीओ यांना काहीही वाटत नाही. लाँग वीकेंड या प्रकारात या दोन्हीपैकी एकही यंत्रणा रस्त्यावर उतरत नाही. अशा नाठाळ वाहन चालकांवर कारवाई होत नाही. त्यामुळे त्याचा फटका अन्य शेकडो वाहनचालकांना बसतो. काही छोटे वाहन चालक दोन लेनमधून रस्ता काढत आपले वाहन पुढे दामटण्याचा प्रयत्न करत वाहतूककोंडी करतात. त्यांच्यावरही कधी कठोर कारवाई झाल्याचे प्रशासनाने दाखवून दिलेले नाही. त्यामुळेच मुंबई- पुणे- मुंबई हा महामार्ग पूर्णपणे रामभरोसे सुरू आहे.

माध्यमांमधून ओरड झाली की, पोलिस महामार्गावर उतरतात. रस्त्यावरच गाड्या अडवून कारवाई सुरू करतात. त्यासाठी ते अवजड वाहने रस्त्यावर मध्येच उभी करतात. बऱ्याचदा काही अवजड वाहने एकदा थांबवली तर ती पुन्हा चढ असलेल्या रस्त्यावर पुढे नेण्यात वेळ लागतो. परिणामी अशी वाहने रस्त्यातच बंद पडतात आणि मागच्या संपूर्ण वाहतुकीचा खेळखंडोबा करतात. खंबाटकी घाट अशाच उद्योगामुळे अनेकदा पूर्णपणे ब्लॉक झाल्याची उदाहरणे आहेत. 

अवजड वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूनेच गेली पाहिजेत, यासाठी केवळ दोन दिवस कारवाई करून हेतू साध्य होणार नाही. अशा वाहनांना रस्त्याच्या कडेला दोन-दोन दिवस उभे केले पाहिजे. सातत्याने त्यांच्यावर वर्ष-सहा महिने कारवाई केली तरच अशा वाहनचालकांना पहिल्या दोन लेनमध्ये जाण्याची इच्छा होणार नाही. पोलिसांना चिरीमिरी दिली की, आपल्याला सोडून दिले जाते. यावर या वाहन चालकांचा गाढा विश्वास असल्यामुळे कोणालाही पोलिस कारवाईचे कसलेही भय वाटत नाही. 

आपल्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगल्या दर्जाचे असावे यावर कोणाचा विश्वास नाही. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या पाच रेल्वे सोडल्या, तर दुसरी कोणतीही व्यवस्था आपण केलेली नाही. शिवनेरीसारखी बस ठराविक अंतराने जात असली तरी त्यांची आजची अवस्था पाहता कोणालाही या बसने जावे, असे वाटत नाही. वंदे भारत ट्रेन संध्याकाळी चार वाजता सीएसटीवरून निघते आणि सात वाजता पुण्यात पोहोचते. तीन तासांत एक ट्रेन मुंबईहून पुण्याला जात असेल तर अशा ट्रेनची संख्या वाढवावी आणि मुंबईहून पुण्याला जाणाऱ्यांची सोय करावी, असे रेल्वे प्रशासनालाही वाटत नाही. मंत्रालयापासून पुण्यात जायला अनेकांना अनेकदा पाच ते सहा तास लागत आहेत. 

मंत्रालयातून ठाण्याला किंवा दादरहून ठाण्यात जाण्यासाठी दोन-दोन तास लागतात. कल्याण-डोंबिवलीला जायचे असेल तर तुमचा जीव जातो. मुंबईतल्या मुंबईत ईस्टवरून वेस्टकडे जाण्यासाठी किमान दोन तास वेस्ट करावे लागतात. या संपूर्ण महामार्गांवर वाहतूक कोंडी झाली तर उतरून लघुशंका करण्यासाठीचीही सोय नाही. डायबेटिस असणाऱ्या अनेक रुग्णांना या वाहतूककोंडीने भयंकर आजाराला सामोरे जावे लागते. मात्र, त्याचाही दूरगामी विचार यंत्रणेजवळ नाही.
 

Web Title: do tourist places on mumbai pune expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.