महामानवाच्या नावाला आपण बट्टा लावतोय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 03:53 AM2017-08-30T03:53:18+5:302017-08-30T03:53:50+5:30
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामांतरासाठी एवढा मोठा लढा का दिला? विद्यापीठातील अनागोंदी पाहता या महामानवाच्या नावाला आपण बट्टा लावतोय का? असे प्रश्नामागून प्रश्न पडतात. बाबासाहेबांचे कर्तृत्व समाजकारण, राजकारण, अर्थशास्त्र या क्षेत्रांमध्ये अफाट असले तरी शिक्षण आणि बाबासाहेब हे नातं अतूट आहे. किंबहुना याच क्षेत्रातील त्यांचे कर्तृत्व काकणभर सरस आहे. परंतु, विद्यापीठात शिक्षणाचे जे काही धिंडवडे निघत आहेत, ते पाहता नामांतराचा आग्रह धरणाºया तमाम पुरोगाम्यांना पश्चातापदग्ध होण्याची वेळ आली. ‘अंधेर नगरी चौपट राजा; टका सेर भाजी, टका सेर खाजा’ ही म्हण येथे तंतोतंत लागू पडते. निर्णयांच्या बाबतीत कुलगुरू डॉ. बी.आर. चोपडे यांच्या कोलांटउड्या पाहिल्या तर आॅलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश केला तर त्यांचे सुवर्णपदक कोणीही हिसकावू शकणार नाही. आपल्या या निर्णय फिरवाफिरवीमुळे विद्यार्थ्यांचे किती नुकसान होत याची त्यांना फिकीर नसावी. गेल्या पाच महिन्यांतील घटना आणि निर्णयांवर नजर फिरविली तर याची खात्री पटते. अभियांत्रिकी परीक्षेतील गोंधळ लक्षात घेऊन गेल्या वर्षी त्यांचे ‘होमसेंटर रद्द’ केले होते. पुढे परीक्षेचा काळा आला आणि लटपटी-खटपटी करून अभियांत्रिकी महाविद्यालये चालविणाºया मंडळींनी आकांडतांडव सुरू केले. त्यांच्या दबावापुढे सपशेल लोटांगण घेत कुलगुरूंनी होमसेंटर प्रदान केले.
दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या ‘कॅरी आॅन’चा. या परीक्षेला दोन विषयांसाठी ए.टी.के.टी. दिली जाते. पण, त्याही पुढे जाऊन संस्थाचालक आणि विद्यार्थ्यांच्या दबावापुढे झुकून दुसºया वर्षासाठी सरसकट ‘कॅरी आॅन’ दिला. नियमांची अशी विधिनिषेध शून्य मोडतोड ही एका नव्हे तर अनेक घटनांमधून दिसते. आपल्या निर्णयापुढे विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा आणि त्याची प्रतिमा यावर काय परिणाम होईल याचा विचारच होत नाही.
यावर्षी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘सीईटी’ घेण्याचा निर्णय झाला. परंतु, या पद्धतीला संस्थाचालक आणि प्राचार्यांनी कडाडून विरोध केल्यामुळे सुरू झालेला घोळ दोन महिने चालला. शेवटी आॅनलाईनऐवजी आॅफलाईन ‘सीईटी’चा निर्णय घेण्यात आला. त्यातही पुन्हा घोळ घातल्याने ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा, त्याऐवजी ज्या पदवी परीक्षेत उत्तीर्ण झाले तेच प्रश्न ‘सीईटी’मध्ये विचारण्यात आले. विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यसक्रमाच्या २३ हजार जागा आहेत; पण या गोंधळामुळे १९१०० विद्यार्थ्यांनीच ही परीक्षा दिली. निकालानंतर कागदपत्रे पडताळणीला १३ हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. अशा स्थितीत गुणवत्तेच्या दोन याद्या जाहीर करून आणखी गोंधळ वाढविला. जे विद्यार्थी मेरिटचे पण यादीत नाही अशी अवस्था. किती प्रवेश झाले याची आकडेवारी तयार केली तेव्हा प्रवेशच दिले गेले नाही हे समोर आले. अनेक विभाग ओस पडले. त्यावर कळस म्हणजे ‘स्पॉट अॅडमिशन’चे आदेश काढले. पण स्पॉट महाविद्यालयाऐवजी विद्यापीठ ठेवले. पार उमरगा, उस्मानाबादेपासून विद्यार्थी आले; पण फॉर्ममध्ये असंख्य चुका, गचाळ नियोजन यामुळे वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी दगडफेक केली. कु लगुरूंना घेराव घातला. शेवटी स्पॉट अॅडमिशन झाले नाही. दरवर्षी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन १५ जुलैपर्यंत तासिका सुरू होतात. त्याला यावर्षी सप्टेंबर उजाडणार. १८० दिवसांचे शैक्षणिक वर्ष कसे पूर्ण करणार? हा खेळ विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळला जातो याचे भान नाही. यात विद्यापीठाचे धिंडवडे निघत आहे. मराठवाड्यातील विद्वान, बुद्धिजीवींनाही याची खंत नाही ही खेदाची बाब आहे.
महंमद तुघलक नावाचा सम्राट हा इतिहासात अजरामर झाला तो वेगळ्या अर्थाने. त्याने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलविली आणि पुन्हा दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अपरिपक्व नेतृत्व ज्यावेळी अविचारी निर्णय घेते त्याच्या या कारभाराला ‘तुघलकी कारभार’ असे म्हटले जाते. बाबासाहेबांच्या या विद्यापीठातील गोंधळ यापेक्षा वेगळा नाही. तुघलक गेले पण त्यांचे वंशज वारसा चालवत आहेत भलेही किती पिढ्या बर्बाद हा होईनात.
- सुधीर महाजन