डॉक्टर, यू टू?

By रवी टाले | Published: December 6, 2019 06:20 PM2019-12-06T18:20:06+5:302019-12-06T18:29:43+5:30

डॉक्टरी पेशा आजही सर्वाधिक आदरास पात्र ठरत असला तरी, दुर्दैवाने गत काही काळापासून समाज डॉक्टर मंडळीकडे संशयाच्या नजरेने बघू लागला आहे.

Doctor, you two? | डॉक्टर, यू टू?

डॉक्टर, यू टू?

Next
ठळक मुद्देडॉॅक्टरांनी औषध उत्पादक कंपन्यांकडून भेटवस्तू, रोख रक्कम, प्रवास सुविधा अथवा इतर प्रकारचे आदरातिथ्य स्वीकारण्यास बंदी.दहा ते वीस टक्के डॉक्टर वगळता उर्वरित सर्व जण ही आचारसंहिता धाब्यावर बसवतात, असा निष्कर्ष ‘साथी’ने काढला आहेकाही डॉक्टरांची मजाल तर औषध उत्पादक कंपन्यांकडे स्त्रीसुखाची मागणी करण्यापर्यंत गेली आहे.

वंचित विद्याथर््यांसाठी शिक्षणाचा स्तर उंचावण्याचा उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या वार्की फाऊंडेशनने गतवर्षी ससेक्स विद्यापीठाच्या सहकार्याने, सर्वाधिक आदरास पात्र असलेले व्यवसाय अथवा पेशा (नोबेल प्रोफेशन) शोधण्यासाठी एक सर्वेक्षण केले होते. एकूण ३५ देशांमधील प्रत्येकी एक हजार सर्वसामान्य लोकांना प्रश्न विचारून करण्यात आलेल्या त्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार, डॉक्टरी पेशा हा जगातील सर्वाधिक आदरास पात्र असलेला पेशा आहे. त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. आरोग्य चिकित्सा अगदी प्रारंभिक अवस्थेत असल्यापासूनच आजार बरे करणाऱ्या मंडळीला आदर मिळत आला आहे. आजही आदिवासी समुदायांमध्ये झाडपाल्याची औषधी देऊन अथवा मंत्रोपचार, जारण-मारण करून, गंडेदोरे बांधून उपचार करणाºया वैदूंना सर्वाधिक मानमरातब मिळत असतो. मनुष्यासाठी मानवी जीवन सर्वाधिक महत्त्वाचे आहे आणि त्यावर येणारी गंडांतरे दूर करणारी मंडळी सर्वाधिक आदरास पात्र ठरत असेल, तर ते स्वाभाविकच म्हटले पाहिजे.
डॉक्टरी पेशा आजही सर्वाधिक आदरास पात्र ठरत असला तरी, दुर्दैवाने गत काही काळापासून समाज डॉक्टर मंडळीकडे संशयाच्या नजरेने बघू लागला आहे. डॉक्टरांसाठी आता पैसा हेच सर्वस्व झाले असून, रुग्णसेवा दुय्यम झाली आहे, अशी समाजाची धारणा होत चालली आहे. आजही अनेक डॉक्टर निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा करताना दिसतात. महागडे वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर शहरांमध्ये व्यवसाय थाटून अमाप पैसा कमविण्याची संधी ठोकरून, ग्रामीण अथवा आदिवासीबहुल भागांमध्ये सेवा देणारे डॉक्टर आजही आहेत; मात्र त्यांची संख्या अत्यल्प आहे. अर्थात प्रत्येकच डॉक्टरने तसे करावे, अशी समाजाचीही अपेक्षा नाही; मात्र किमानपक्षी त्यांनी पैसा हेच सर्वस्व मानू नये, अशी समाजाची रास्त अपेक्षा असल्यास ती चुकीची म्हणता येणार नाही. दुर्दैवाने वैद्यकीय शिक्षणावर झालेला खर्च कमीत कमी वेळात भरून काढून, ऐशोआरामात जीवन कसे जगता येईल, याकडेच बहुतांश डॉक्टरांचा कल दिसून येतो. डॉक्टरी पेशातील मंडळी ही वस्तुस्थिती मान्य करणार नाही; पण त्याकडे अंगुलीनिर्देश करणारी उदाहरणे नित्य समोर येत असतात.
‘सपोर्ट फॉर अ‍ॅडव्होकसी अ‍ॅण्ड टेÑनिंग टू हेल्थ इनिशिएटिव्हज’ (साथी) ही आरोग्यविषयक अधिकारांच्या मुद्यांसंदर्भात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. ‘साथी’ने अलीकडे एक अभ्यास केला. डॉक्टरांनी रुग्णांना आपलीच औषधे लिहून द्यावी, यासाठी औषध उत्पादक कंपन्या कोणते मार्ग अवलंबतात आणि त्यासंदर्भातील नियामक संहितांच्या अंमलबजावणीची स्थिती काय आहे, याचा शोध घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला. त्यामधून अत्यंत धक्कादायक माहिती हाती आल्याचे ‘साथी’चे म्हणणे आहे. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या आचारसंहितेनुसार, डॉॅक्टरांनी औषध उत्पादक कंपन्यांकडून भेटवस्तू, रोख रक्कम, प्रवास सुविधा अथवा इतर प्रकारचे आदरातिथ्य स्वीकारण्यास बंदी असली तरी, दहा ते वीस टक्के डॉक्टर वगळता उर्वरित सर्व जण ही आचारसंहिता धाब्यावर बसवतात, असा निष्कर्ष ‘साथी’ने काढला आहे. एवढेच नव्हे, तर काही डॉक्टरांची मजाल तर औषध उत्पादक कंपन्यांकडे स्त्रीसुखाची मागणी करण्यापर्यंत गेली आहे, अशी धक्कादायक माहितीही या अभ्यासातून उघड झाली असल्याचे ‘साथी’चे म्हणणे आहे.
‘साथी’च्या या अभ्यासामुळे दिल्ली मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांच्या अंगाचा तीळपापड झाला आहे. हा वैद्यकीय व्यवसायाची प्रतिष्ठा धुळीस मिळविण्याचा प्रयास असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोणत्याही संघटनेच्या सदस्यांवर अशा प्रकारचे आरोप झाल्यास त्यांना वाईट वाटणे स्वाभाविकच म्हणावे लागेल; मात्र त्या विशिष्ट संघटनेचे सगळेच सदस्य निष्पाप, निर्दोष आहेत, असा सरसकट दावा करणेही योग्य म्हणता येणार नाही. औषध उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींकडे डॉक्टरांनी स्त्रीसुखाची मागणी केल्याचा आरोप नवा असला तरी, या कंपन्या डॉक्टरांना महागड्या भेटवस्तू देतात, विदेश दौऱ्यांवर पाठवतात, हे तर उघड गुपित आहे. अनेक डॉक्टरच खासगीत अशा बाबींची कबुली देतात. अनेक डॉक्टरांना हे प्रकार पटत नाहीत आणि ते त्यामध्ये सहभागीही होत नाहीत; मात्र याचा अर्थ सगळेच डॉक्टर धुतल्या तांदुळाचे आहेत, असाही अजिबात नाही.
राजकारणी म्हटला तो भ्रष्ट असणारच, पोलिस म्हटला की तो चिरीमिरी खाणारच असे अनेक समज निर्माण झाले आहेत. त्यामध्ये अजिबातच तथ्य नाही असे नव्हे; मात्र याचा अर्थ प्रत्येकच राजकारणी भ्रष्ट असतो, किंवा प्रत्येकच पोलिस चिरीमिरी खातो, असाही नाही! आजही राजकारणात अनेक निष्कलंक व्यक्ती आहेत आणि पोलिस खात्यातही पापभिरू वारकरी आहेत! कोणत्याही पेशातील शंभर टक्के लोक वाईट अथवा शंभर टक्के लोक चांगले असूच शकत नाहीत. काही भ्रष्ट असतात, तर काही प्रामाणिकही असतात. काही स्वार्थी असतात, तर काही निस्वार्थ भावनेने कर्तव्य पार पाडणारेही असतात. त्यामुळे काही डॉक्टरांनी त्यांच्या पेशाला काळीमा फासल्याचे ‘साथी’च्या अभ्यासात निष्पन्न झाले म्हणून सगळ्या डॉक्टरांनी वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही आणि सगळ्या व्यवसायबंधूंना स्वच्छ चारित्र्याचे प्रमाणपत्र बहाल करण्याचेही काही कारण नाही.
सर्वसामान्य माणूस पूर्वी देवानंतर डॉक्टरला पूजत असे! देव जन्माला घालतो, तर दुर्धर आजारातून बरे करून डॉक्टर पुनर्जन्म देतो, अशी त्याची श्रद्धा होती. कालौघात ती श्रद्धा लयाला जाऊ लागली आहे आणि त्यासाठी डॉक्टरांचे वर्तनच जबाबदार आहे, हे डॉक्टर मंडळीने समजून घेण्याची गरज आहे. समाजमाध्यमांच्या प्रसारामुळे हल्ली कोणतीही गोष्ट चटकन पसरते. एका डॉक्टरला थापड मारल्याच्या निषेधार्थ हातात मेणबत्त्या घेऊन रस्त्यांवर उतरलेली डॉक्टर मंडळी, हैदराबाद येथील गुरांच्या डॉक्टरवरील बलात्कार व नृशंस हत्येनंतर का गप्प राहिली, हा प्रश्न समाजमाध्यमांवरून पसरतो, तेव्हा तो सर्वसामान्य माणसाला भावतो आणि त्याच्या डॉक्टरांवरील श्रद्धोला ठेच पोहचते. काही स्वार्थी डॉक्टर रुग्णांच्या नातेवाइकांची कशी आर्थिक पिळवणूक करतात, हे चव्हाट्यावर आणणाºया अनेक चित्रफिती, ध्वनिफिती समाजमाध्यमांवर फिरत असतात. डॉक्टरांची वाईट प्रतिमा त्यामधूनही निर्माण होत असते. केवळ ‘साथी’च्या अभ्यासातून काही निष्कर्ष समोर आल्यानेच ते होते, असे समजण्याचे काही कारण नाही. ‘साथी’च्या विरोधात न्यायालयात धाव घेऊन, ‘साथी’च्या अहवालावर आधारित बातम्या प्रसिद्ध करणाºया वर्तमानपत्रांच्या विरोधात प्रेस कौन्सिलकडे जाऊन, दिल्ली मेडिकल असोसिएशन त्यांना एखाद्या वेळी गप्प करूही शकेल; पण समाजमाध्यमांना कसे रोखणार? त्यासाठी आपण ज्या पेशात काम करतो, त्या पेशाला सर्वाधिक आदरास पात्र पेशा समजले जात असल्याची खुणगाठ बांधून, डॉक्टर मंडळीनेच स्वत:चे वर्तन उच्च कोटीचे ठेवणे आवश्यक आहे.

- रवी टाले    
ravi.tale@lokmat.com 


 

Web Title: Doctor, you two?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.