डॉक्टर की कसाई?
By admin | Published: September 20, 2016 05:38 AM2016-09-20T05:38:09+5:302016-09-20T06:25:32+5:30
मेडिकल, मेयोमध्ये अशा लुटारू निवासी डॉक्टरांची एक टोळी निर्माण झाली आहे.
मेडिकल, मेयोमध्ये अशा लुटारू निवासी डॉक्टरांची एक टोळी निर्माण झाली आहे. खरे तर निवासी डॉक्टर हे शासकीय रुग्णालयाचा कणा असतात. पण, तोच भ्रष्ट होत असेल तर ही संपूर्ण वैद्यकीय सेवा संसर्गित होणारच.
डॉक्टर आणि रुग्णाचे नाते एकेकाळी विश्वासाचे आणि श्रद्धेचे होते. काळाच्या ओघात हे सेवेचे क्षेत्र धंद्यात परिवर्तीत झाले आणि डॉक्टर- देव की दानव, असे द्वंद्व समाजमनात निर्माण झाले. समाजात काही सेवाभावी डॉक्टरही आहेत. परंतु या धंदेवाईक काळात त्यांनाही आपल्याच बांधवांच्या दुष्कृत्यांकडे हतबल होऊन पाहण्यापलीकडे काहीच करता येत नाही. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (मेडिकल) काही बदमाश निवासी डॉक्टरांमुळे गरीब रुग्णांची होत असलेली लूट हा नव्या चिंतेचा विषय आहे.
मेडिकलमधील निवासी डॉक्टरांचे प्रशिक्षण, त्यांची उपचारसेवा ही त्यांच्या नंतरच्या काळातील व्यावसायिक सेवेची पहिली पायरी मानली जाते. पण, हे निवासी डॉक्टर्स इथेच गरीब रुग्णांसोबत कसायासारखे वागत असतील तर पुढच्या काळात त्यांच्याकडून प्रामाणिक रुग्णसेवेची अपेक्षा कशी करता येईल? खरे तर निवासी डॉक्टर हे शासकीय रुग्णालयाचा कणा असतात. पण, तोच भ्रष्ट होत असेल तर संपूर्ण वैद्यकीय सेवा संसर्गित होणारच. खासगी पॅथालॉजी लॅब, रक्तपेढ्या, औषध कंपन्या, शस्त्रक्रियेचे साहित्य विकणाऱ्या कंपन्या यांच्या जाळ्यात हे निवासी डॉक्टर अडकले आहेत. मेडिकलमध्ये स्वतंत्र लॅब असतानाही रुग्णांना भीती दाखवून बाहेरच्या खासगी पॅथालॉजींमधून चाचण्यांची फेरतपासणी करायला भाग पाडले जाते. अलीकडच्या काळात उघडकीस आलेल्या ३-४ घटना त्याचा पुरावा आहेत. मेडिकलमधील एका वॉर्डात १३ वर्षांची मुलगी डेंग्यूचे उपचार घेत आहे. तिला लागणाऱ्या प्लेटलेटस् मेडिकलच्या रक्तपेढीत उपलब्ध नव्हत्या. (त्यांचा जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण केला जातो) निवासी डॉक्टरने विशिष्ट खासगी रक्तपेढीतून त्या बोलावल्या. मुलीच्या वडिलाना वेळेवर बायकोचे मंगळसूत्र गहाण ठेवून ३६०० रुपये आणावे लागले. मेडिकल परिसरात अशा असंख्य कहाण्या कानावर येतात. पण डॉक्टरांवर कुणाचाही वचक नाही. ज्यांचा वचक असावा ते विभागप्रमुख आणि वरिष्ठ डॉक्टर खासगी रुग्णालयांमध्ये पैसे कमविण्यात गुंग असल्याने उलट तेच या निवासी डॉक्टरांना वचकून असतात. या निवासी डॉक्टरांची एक सशक्त संघटना आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी एखाद्या डॉक्टरला मारहाण केल्यानंतर ती जागृत होते, संपाचे ब्रम्हास्त्र बाहेर काढते पण, अशा बाबतीत ती मूग गिळून बसते. ज्यांच्याकडे पैसे नाहीत असेच गरीब रुग्ण मेडिकलमध्ये येतात. पण, त्यांचे इथे शोषण होत असेल तर त्यांनी शेवटी तडफडत मरण पत्करावे का, असा प्रश्न या संपूर्ण प्रकरणामुळे ठसठशीतपणे समोर आला आहे. मेडिकलमध्ये सेवा देत असलेले निवासी डॉक्टर्स गुणवंत आणि बहुतांश गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. केवळ गुणवत्तेच्या आधारावर त्यांना इथे प्रवेश मिळतो. पण, हे प्रज्ञावान सेवेच्या प्रशिक्षण टप्प्यावरच असे नीतिभ्रष्ट होत असतील तर पुढे त्यांच्या हाती गरीब रुग्ण सुरक्षित कसा राहील? डॉक्टर हे परमेश्वराचे दुसरे रूप असते, ही कधीकाळी असलेली आपल्या समाजाची धारणा अशाच अनैतिक कृत्यांमुळे लयास गेली आहे. अत्याधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती विकसित झाल्या नसतानाच्या काळात उपचारा दरम्यान रुग्ण दगावल्यानंतरही नातेवाईक त्या डॉक्टरला कधीच दोष देत नव्हते. ‘प्राण वाचविण्यासाठी तुम्ही खूप परिश्रम घेतले’, हीच कृतज्ञतेची भावना त्यांच्या चेहऱ्यावर असायची. रुग्णालयाची तोडफोड, डॉक्टरला मारहाण करण्याची गरज त्यांना कधी वाटली नाही. आज जेव्हा अशा घटना घडताना दिसतात तेव्हा त्याचे मूळ या विनाशी कृत्यांमध्ये दडलेले असते. मेडिकलमधील प्रामाणिक निवासी डॉक्टरांनी आपल्याच भोवताली असलेल्या या वाट चुकलेल्या बांधवांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. आपण आपल्या मुलाला डॉक्टर बनवत आहोत की कसाई, मुलांवरील हेच संस्कार आहेत का, असे प्रश्नही या निवासी डॉक्टरांच्या माता-पित्यांनी या निमित्ताने स्वत:स विचारण्याची आवश्यकता आहे.
- गजानन जानभोर