डॉक्टरांचे शब्दांगण
By Admin | Published: February 13, 2016 03:45 AM2016-02-13T03:45:31+5:302016-02-13T03:45:31+5:30
कला, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात वैद्यकीय व्यावसायिकांनी अमीट छाप उमटवली आहे. याच वैद्यकीय व्यावसायिकांचे साहित्य संमेलन घेण्याची संकल्पना इंडियन मेडिकल
- मिलिंद कुलकर्णी
कला, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात वैद्यकीय व्यावसायिकांनी अमीट छाप उमटवली आहे. याच वैद्यकीय व्यावसायिकांचे साहित्य संमेलन घेण्याची संकल्पना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या धुळे शाखेने मांडली आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दोन दिवसीय साहित्य संमेलन अतिशय उत्साहात पार पडले. डॉ.अलका मांडके संमेलनाच्या अध्यक्ष होत्या.
नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर, आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रवी वानखेडकर, राज्याध्यक्ष डॉ.अशोक तांबे, धुळ्याचे खासदार डॉ.सुभाष भामरे, डॉ.कल्याण गंगवाल, डॉ.हमीद दाभोलकर यांनी संमेलनात सक्रीय सहभाग घेतला.
डॉक्टर आणि साहित्य यांचा संबंध आणि वैद्यकीय व्यावसायिकांचेच स्वतंत्र संमेलन कशासाठी याविषयी संमेलनात ऊहापोह झाला. गवाणकर म्हणाले, वेदना, दु:ख, समस्या यांच्याशी डॉक्टरांचा सर्वाधिक संबंध येतो. या गोष्टी चांगल्या साहित्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असून डॉक्टरच चांगले लिहू शकतात. कसदार साहित्य निर्मितीची क्षमता डॉक्टरांमध्ये आहे. संमेलनाध्यक्ष डॉ.अलका मांडके यांच्या मते, अनुभवातून झालेले लेखन हे काल्पनिक लेखनापेक्षा वास्तवाशी नाते सांगणारे असते. डॉ.कल्याण गंगवाल यांनी संमेलनाची आवश्यकता प्रतिपादित करताना साहित्यिक डॉक्टरांना अभिव्यक्त होण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळाल्याचे मत मांडले.
दोन दिवसीय संमेलनाच्या कार्यक्रमाची रूपरेषादेखील डॉक्टर साहित्यिकांमधील कला-गुण व्यक्त होण्याच्या दृष्टीने आखण्यात आली होती. गीतकार, संगीतकार डॉक्टरांचा ‘कधी शब्द, कधी सूर’ कार्यक्रम, डॉक्टर कुटुंबियांचे अनुभवकथन ‘डॉक्टर आम्हीसुध्दा’, ‘येणे वाग्यज्ञे तोषावे: पुस्तकांमागचे डॉक्टर’, नाट्य-लेख माझे अनुभव हा परिसंवाद, लेखणीमागचा डॉक्टर, प्रकाशन आणि वितरण व्यवस्था-नवोदितांसाठी एक शिवधनुष्य, कविसंमेलन, नाटिका असे विविधांगी कार्यक्रम रंगले. ‘वैद्यकीय पत्रकारिता एक महत्त्वाचा दुवा’ या परिसंवादात पत्रकार आणि डॉक्टरांमधील संवादावर जोर देण्यात आला. ‘अंधारातून प्रकाशाकडे-अंधश्रध्दा निर्मूलनातील डॉक्टरांची भूमिका’ या परिसंवादात अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ.हमीद दाभोळकर यांनी आग्रही भूमिका मांडली.
संमेलनाला ‘शब्दांगण’ हे कल्पक नाव आणि ‘लिहिते व्हा, लिहिते रहा’ हे संदेशवाक्य होते. त्याला अनुसरुन इंडियन मेडिकल असोसिएशनने वैद्यकीय साहित्य परिषद स्थापन करण्याचा आणि त्या परिषदेमार्फत दरवर्षी साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय संमेलनाच्या समारोप सत्रात घेण्यात आला. या संमेलनात एकूण सात पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ग्रंथप्रदर्शनात डॉक्टरांच्या विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश होता. त्याची विक्रीदेखील चांगली झाली.
या दोन दिवसीय साहित्य संमेलनात कोठेही वाद झाला नाही. वादापेक्षा संवादावर भर देण्यात आला. अ.भा.मराठी साहित्य संमेलन नुकतेच पिंपरी-चिंचवड येथे झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष प्रा.श्रीपाल सबनीस हे अनेक वर्षे धुळ्याच्या विद्यावर्धिनी महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करीत होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनातील वाद ताजे असताना त्यांच्या कर्मभूमीत हे संमेलन सुसंवादावर भर देणारे ठरले. हे याचे वेगळेपण म्हणावे लागेल.
वैद्यकीय साहित्य संमेलन घेण्याची संकल्पना मांडणारी आयएमएची धुळे शाखादेखील वैशिष्टयपूर्ण आहे. संपूर्ण महिला कार्यकारिणी असलेल्या या शाखेने संमेलनातदेखील कृतज्ञता आणि बांधिलकी जपली. आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पीडित कुटुंबाला शेतकरी दिलासा कार्डचे वितरण आणि धुळ्यात वैद्यकीय घनकचरा निर्मूलन प्रकल्पाचे भूमीपूजन संमेलनात झाले. बहादरपूरच्या नीलिमा मिश्रा यांच्या बचत गटाची गोधडी देऊन पाहुण्यांचा सन्मान केला गेला.