एकट्या बाईला लग्न(च) सुरक्षितता देते का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 07:56 AM2022-01-04T07:56:01+5:302022-01-04T07:58:43+5:30

विधवांचे पुनर्वसन, विधवांचा स्वीकार ही शब्दरचना स्त्रियांच्या दु:खावर आणि स्थितीवर मीठ चोळते. विवाह हे स्त्रीच्या सर्व समस्यांचे उत्तर नव्हे..

Does marriage alone provide security to a woman? | एकट्या बाईला लग्न(च) सुरक्षितता देते का?

एकट्या बाईला लग्न(च) सुरक्षितता देते का?

Next

- नीरजा पटवर्धन
कोरोना महामारीमध्ये पती गमावल्याने एकट्या झालेल्या स्त्रियांच्या निमित्ताने विधवा विवाहाची चळवळ पुन्हा उभारण्याची गरज व्यक्त करणारा हेरंब कुलकर्णी यांचा लेख (दिनांक ३१ डिसेंबर २१) वाचला. साधारण सव्वाशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात समाजातली विधवांची स्थिती बघून विधवांना सन्मानाचे आणि आनंदाचे जिणे जगता यावे यासाठी समाजसुधारकांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले. या चळवळीत  अग्रणी असलेले  महात्मा जोतिबा फुले, धोंडो केशव कर्वे आदींची नावे घेऊन विधवा विवाहाची चळवळ आजही करू बघणे यात मात्र बरेच घोटाळे जाणवतात. अर्थात, अशा प्रकारची मोहीम हाती घेणाऱ्या व्यक्तींच्या चांगल्या हेतूबद्दल यत्किंचितही शंका नाही. समाजाचे, स्त्रियांचे भले व्हावे यासाठीच हा प्रयास चालू आहे. बाकी कोणताही छुपा हेतू त्यात नाही याबद्दल खात्री आहे. भारतीय समाजाच्या जातीयवाद आणि पुरुषसत्ताक मानसिकता या दोन समस्या आहेत. विवाह व कुटुंब हा या व्यवस्थेचा पाया आहे. सव्वाशे वर्षांपूर्वीच्या समाजात स्त्रीला सन्मानाने उदरनिर्वाहाचे साधन केवळ विवाह हेच होते. त्यामुळे ती चळवळ गरजेची होतीच.

आजची काय स्थिती आहे?, ग्रामीण भागातली मानसिकता सव्वाशे वर्षांपूर्वीपेक्षा फारशी बदललेली नाही असे कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती म्हणते,  ते खरेच आहे. पण, विधवा विवाहाची  तात्पुरती मलमपट्टी करून किती काळ तीच मानसिकता जोजवणार  आपण?, स्त्रीला तिच्या उदरनिर्वाहासाठी विवाहाची गरज नाही याची जाणीव करून द्यायला हवी की नको?, विवाह हे स्त्रीसाठी उदरनिर्वाहाचे साधन नसून ती, स्त्री-पुरुषांची खाजगी, आनंदासाठीची  ऐच्छिक बाब आहे याबद्दल समाजाचे प्रबोधन व्हायला हवे की नको?,  पुरूषसत्ता संपायला हवी म्हणायचे आणि दुसरीकडे विधवांचे विवाह करून देण्याची मोहीम आखायची हे गोंधळाचे नाही का?. 
जित्याजागत्या स्त्रीची ओळख किंवा गणती केवळ विधवा या एका शब्दात करणे हेही स्त्रियांसाठी  अपमानास्पद आहे. नवरा मरण पावलेली अशी आणि एवढीच एका स्त्रीची ओळख कशी काय धरू शकतो आपण आजच्या काळात?,  विधवांना एकल म्हणण्याने फार फरक पडणार नाही, उलट ज्या स्त्रिया स्वेच्छेने लग्नाशिवाय राहिल्या आहेत त्यांनाही यात खेचले जाईल. 

विधवांचे पुनर्वसन, विधवांचा स्वीकार अशा प्रकारची शब्दरचना स्त्रियांच्या दु:खावर आणि स्थितीवर मीठ चोळणारी आहे हे अजूनही कसे  लक्षात येत नाही?,  नवऱ्याच्या मृत्यूनंतर स्त्रीने लग्न करणे हे ग्रामीण भागात आजही चुकीचे मानले जाते म्हणून जनजागृतीसाठी माध्यमांनी अशा विवाहांची बातमी करणे यात गैर काहीच नाही पण, त्या बातमीमधे स्त्रीचा सन्मान राखला जावा आणि पुरुषाला अवास्तव मोठेपणा मिळू नये ही अपेक्षा गैरवाजवी नाही.

मूल असलेल्या विधवेशी लग्न केले म्हणजे फार मोठे कार्य केले का?, जिच्याशी लग्न केले ती एक व्यवस्थित जितीजागती स्त्री नव्हे?, मूल असणे, विधवा असणे ह्या तिच्या स्त्री असण्यात उणीव निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत का?,   इथे मुद्दा योनिशूचितेचा आला. म्हणजे पुरुषसत्तेचाही आलाच की. त्या पुरुषाचे असे कौतुक वाचून उबग येत नाही का?, सहजीवनाच्या सुरूवातीलाच या पुरुषाला इतके कौतुक करून त्याला उपकारकर्त्याच्या मखरात असे बसवल्यावर पुढे त्या स्त्रीचे आयुष्य सन्मानाचे आणि सुखाचे होईलच ही, खात्री बाळगणे हे कमालीचे भाबडे आहे.

स्त्रिया एकट्या असल्यामुळे विखारी नजरा आणि शोषणाला बळी पडण्याची शक्यता जास्त असते; तो धोका विवाहाने नाहीसा वा कमी होतो; असेही एक स्पष्टीकरण वाचले. पुरुषसत्ता अधोरेखित करणारे याहून चपखल दुसरे उदाहरण नाही. पुरुषाच्या आधाराची, साथीची स्त्रीला सामाजिक गरज असते हा मुद्दा अगदी ठासून सांगितला जातो यातून. मग, तो पुरुष कसा आहे काही फरक पडत नाही. बाई परत कुणाच्या तरी खुंट्याला बांधली गेली जाणे महत्त्वाचे, कारण पुरुष बाईच्या संमतीला जुमानत नसले तरी आपापसात दुसऱ्या पुरुषाच्या टेरिटरीचा मान राखतात; असा याचा अर्थ... हे काय आहे? 

 बायका कुटुंबातही विखारी नजरा आणि लैंगिक शोषणापासून सुरक्षित नसतात, नाहीत.  विवाह ही सुरक्षिततेची हमी होऊ शकत नाही.
याचा अर्थ स्त्रीने एकटेच राहावे असा नक्कीच नाही. नव्याने उभ्या राहात  असलेल्या कोरोना विधवा-विवाह चळवळीबाबत असे मुद्दे उपस्थित करणारे (माझ्यासारखे) लोक हे स्त्रियांनी एकटीनेच राहावे असे म्हणत विधवा विवाहांना विरोध करत आहेत ; असा आक्षेपही वाचला. तसे अजिबातच नाही.

स्त्रीने (अविवाहित, विवाहित, विधवा, घटस्फोटित, लेकुरवाळी, बिनालेकरांची यापैकी काहीही) स्वत:च्या पायावर उभे राहावे. स्वत:च्या आयुष्याचे निर्णय पूर्णपणे स्वत:च्या हातात ठेवता येतील असे आत्मनिर्भर बनावे आणि मग, स्वत:च्या इच्छेने, स्वत:च्या आनंदासाठी, सहजीवनाच्या सुखासाठी वाटले तर, विवाह करावा अथवा न करावा. ती तिची खाजगी बाब आहे. यासाठी स्त्रीला बळ मिळावे म्हणून काम  नक्कीच व्हावे. कुणा स्त्रीला नवऱ्याच्या मृत्यूनंतर परत लग्न करण्याची इच्छा असल्यास त्यासाठी मदत करणे, समाजाने त्रास दिला तरी तिला पाठिंबा देणे, सन्मानाचे आणि आनंदाचे जगण्यासाठी तिला गरज असेल ती मदत करणे वगैरे गोष्टींना कुणाचाच विरोध असायचे कारण नाही.

विवाह हे स्त्रीच्या सर्व समस्यांचे उत्तर आणि विधवेशी विवाह करणे हे पवित्र कार्य अशा प्रकारचे चित्र उभे करणे, अशा प्रकारची मांडणी करणे याला मात्र नक्कीच विरोध आहे. तो असेलच. शंभर वर्षांनंतर तेच मुद्दे मांडावे लागतात याची खंत आम्हालाही आहे. शंभर वर्षांनीही स्त्रीचा उद्धार हा पुरुषांनी पुरूष सत्तेच्या चौकटीत राहूनच करावासा वाटतो. स्त्रिया त्यातल्या मानसिकतेला आक्षेप घेतात तेव्हा त्यांना एका फटक्यात विरोधी, टोकाच्या, पुस्तकी स्त्रीवादी अशी लेबले लावून डिस्कार्ड केले जाते. स्त्रियांचे म्हणणे कधी ऐकणार आपण? 
 - needhapa@gmail.com

Web Title: Does marriage alone provide security to a woman?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.