कुत्र्यांचे ‘अच्छे दिन’
By Admin | Published: January 24, 2017 01:06 AM2017-01-24T01:06:22+5:302017-01-24T01:06:22+5:30
आपल्या मालकाप्रति वफादारीत कुठलीही कसूर न सोडणारा कुत्रा हा तसा फारच दुर्दैवी प्राणी. कुत्र्यासारखे जीणे, कुत्र्यासारखे मरणे
आपल्या मालकाप्रति वफादारीत कुठलीही कसूर न सोडणारा कुत्रा हा तसा फारच दुर्दैवी प्राणी. कुत्र्यासारखे जीणे, कुत्र्यासारखे मरणे हे शब्दप्रयोग बहुदा कुत्र्याच्या या दुर्दैवीपणातूनच वापरले जात असावेत. एरवी बड्याबड्यांच्या कुशीत आनंदाने बागडणारा हा कुत्रा त्रासदायक ठरला की त्याला संपविण्याचे विविध अघोरी उपायही शोधले जातात. कधी त्याला पोत्यात बंद करून आपटून मारले जाते तर कधी हातात गरगर फिरवरून उंच गच्चावरून खाली भिरकावले जाते. दुसरीकडे कुत्र्यांवर जीवापाड प्रेम करणारा एक वर्ग या समाजात आहे. कुत्रे पाळणे हा त्यांचा शौक. पण त्यांचा हा वाढता शौकही आता कुत्र्यांच्या जीवावर बेतलाय. प्रचंड नफा मिळवून देणाऱ्या ‘डॉग ब्रिडिंग’च्या धंद्यात अमानवीय पद्धतीने कुत्र्यांचे प्रजोत्पादन केले जात आहे. यापुढे मात्र कुत्र्यांवर कुठल्याही प्रकारचा अत्याचार करताना सारासार विचार करावा लागेल. कारण कुत्र्यांच्या अधिकारांचे रक्षण करणारे दोन चांगले निर्णय झाले आहेत. त्यातील पहिला आणि महत्त्वाचा भाग म्हणजे मोकाट कुत्र्यांनाही जगण्याचा अधिकार आहे; त्यांचा सरसकट खात्मा करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. देशभरातच मोकाट कुत्री ही मानवी चिंतेचा विषय झाली आहेत, यात दुमत नाही. पण म्हणून त्यांना मारूनच टाकायचे हे सुद्धा योग्य ठरणार नाही. मागील काही काळात मोकाट कुत्र्यांवरील चीड व्यक्त करणाऱ्या ज्या घटना उघडकीस आल्या त्या या मुक्या प्राण्यांवरील अत्याचाराचा कळसच होत्या. केरळमधील कोट्टायममध्ये दहा भटक्या कुत्र्यांना ठार मारून त्यांच्या मृतदेहांची मिरवणूक काढण्यात आली होती. बरेचदा त्यांना विषप्रयोगाद्वारे मारले जाते. भटक्या कुत्र्यांना विजेचा शॉक देऊन ठार मारण्याची उपाययोजना काही वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेत अमलात आणण्याचा प्रयत्न झाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या निवाड्यानंतर कुत्र्यांना दिलासा मिळणार आहे. तसे बघता कुत्र्यांना मारून टाकण्याऐवजी निर्बीजीकरणाचा मार्ग अवलंबला जाऊ शकतो. कुत्र्यांसाठी दुसरी आनंदवार्ता म्हणजे डॉग ब्रिडिंगचा व्यवसाय कायद्याच्या चौकटीत आणण्याचा निर्णय पर्यावरण मंत्रालयाने घेतला आहे. तूर्तास या व्यवसायासाठी कुठलाही कायदा अथवा दिशानिर्देश नाहीत. त्यामुळे डॉग ब्रिडिंग करणारे अत्यंत अमानवीय परिस्थितीत कुत्र्यांचे प्रजोत्पादन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. कुत्राकुत्रींना लहानशा खोलीत बंदिस्त ठेवले जाते. जास्तीतजास्त प्रजोत्पादनासाठी त्यांच्या शरीरावर सतत इंजेक्शनचा भडीमार केला जातो. एकंदरीत कुत्र्यांना आपले उत्पन्नाचे साधन बनविणाऱ्यांकडून त्यांना नरकयातना दिल्या जात आहेत. निसर्गाने त्यांनाही जीवन दिले आहे, या जगावर त्यांचाही अधिकार आहे, याचा या स्वार्थी लोकांना जणू विसरच पडला आहे. या संदर्भातील कायद्याने या अमानवीय प्रवृत्तीवर नियंत्रण येईल, अशी अपेक्षा आहे.