डॉल्बी आणि घातक राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:54 AM2017-09-04T00:54:20+5:302017-09-04T00:54:47+5:30
कोल्हापुरात गेल्या आठवडाभर डॉल्बीचा वाद चांगलाच तापला आहे. तशी कोल्हापूरच्या गणेशोत्सवाला पर्यावरणपूरक उत्सवाची तेजस्वी परंपरा आहे.
कोल्हापुरात गेल्या आठवडाभर डॉल्बीचा वाद चांगलाच तापला आहे. तशी कोल्हापूरच्या गणेशोत्सवाला पर्यावरणपूरक उत्सवाची तेजस्वी परंपरा आहे. उत्सवातील गुटख्याच्या जाहिरातींना व त्यायोगे होणा-या व्यसनांच्या प्रसाराला पहिल्यांदा कोल्हापूरनेच मूठमाती दिली. निर्माल्यदानाची मोहिमही याच जिल्ह्याने सुरू केली. जेव्हा ही मोहीम सुरू झाली तेव्हा सुरुवातीची काही वर्षे पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना काही जण खुळ्यात काढत होते. परंतु त्यांनी घेतला वसा टाकला नाही व ही मोहीम नैतिक ताकदीच्या बळावर चालू ठेवली. त्याचा परिणाम असा झाला की आता प्रतिवर्षी शेकडो टन निर्माल्य नदीच्या काठावर जमा होते व पंचगंगा नदीसह अनेक नद्या व नाल्यांची या प्रदूषणापासून मुक्तता झाली. या यशानंतर कोल्हापुरात मूर्तिदान करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. त्यालाही लोकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. म्हणजे लोकांना हा मांगल्याचा उत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होऊ नये याचे भान आले आहे. समाजातील हा बदल स्वागतार्ह आहे. या पार्श्वभूमीवर या उत्सवाला विधायक वळण द्यावे यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यंदा गणेशोत्सवातून डॉल्बी हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी काही निर्बंध घातले आहेत. त्याची अंमलबजावणी व्हावी व हा उत्सव डॉल्बीमुक्त व्हावा, असा आग्रह पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी धरला आहे. त्यांची भूमिका योग्यच आहे. त्यामुळे त्यांच्या डॉल्बीमुक्तीच्या मोहिमेस कोल्हापूरकरांनीच पाठबळ देण्याची गरज आहे. परंतु निव्वळ राजकीय फायद्याचा विचार करून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासारखे काही लोकप्रतिनिधीच त्यात खोडा घालत आहेत. तुम्ही हिंदूंच्या सणावेळीच असे निर्बंध का घालता, अशी विचारणा करून ते हा पर्यावरणाशी संबंधित विषय भलतीकडेच नेऊ पाहत आहेत. कोल्हापुरातील कायदा व सुव्यवस्था अगोदर सुधारावी मगच पोलिसांनी डॉल्बीस विरोध करावा, असाही प्रतिवाद त्यांच्याकडून करण्यात येत आहे. एका चांगल्या कामात पायात पाय घालण्याचे राजकारण शिवसेना करीत आहे. भाजप- शिवसेनेतील अंतर्गत कुरघोडीचे राजकारणही यास कारणीभूत आहे. राजकारणांवेळी जरूर राजकारण करावे, परंतु काही सामाजिक प्रश्नांत आपले लोकप्रतिनिधी व्यापक समाजहित डोळ्यासमोर ठेवून कधी भूमिका घेणार हाच खरा प्रश्न आहे. ती तशी घेतली जात नाही म्हणूनच अनेक सोपे प्रश्न अवघड बनत आहेत. त्यामुळे आता खरी जबाबदारी कोल्हापूरकर सामान्य माणसाचीच आहे. त्यांनीच पालकमंत्री पाटील यांच्या भूमिकेस बळ दिले तर कोल्हापूरच्या पुरोगामी परंपरेचा तो विजय ठरेल.