देशी-विदेशी पाहुणे येणार, आपली हॉटेल्स ‘तयार’ आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 08:09 AM2023-10-09T08:09:46+5:302023-10-09T08:11:14+5:30

आतिथ्य उद्योगवाढीच्या शक्यता खूप आहेत. पाहुण्यांची प्रेमाने सेवा करणे ही आपली संस्कृतीही आहे; पण त्यासाठी तंत्रज्ञान, सर्जनशीलतेचा कल्पक वापरही गरजेचा आहे.

Domestic and foreign guests will come, are your hotels ready | देशी-विदेशी पाहुणे येणार, आपली हॉटेल्स ‘तयार’ आहेत?

देशी-विदेशी पाहुणे येणार, आपली हॉटेल्स ‘तयार’ आहेत?

googlenewsNext

- डॉ. एस. एस. मंठा, माजी अध्यक्ष, भारतीय तंत्रशिक्षण परिषद

भारतीय संस्कृती पाहुण्यांचा मान, सन्मान, आदरातिथ्य करण्याला खूपच प्रोत्साहन देते. येथे अतिथी देव मानला जातो. पाहुण्याची प्रेमादराने सेवा करणे हे आपण श्रेष्ठ कर्म मानले. मात्र हे कर्म वाढीस लावायचे तर आतिथ्य उद्योग कित्येक पटींनी वाढला पाहिजे. हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. २०४७ पर्यंत हा उद्योग देशाच्या नक्त उत्पन्नात १५०४ अब्ज डॉलर्सची भर घालील, असा अंदाज त्यात व्यक्त करण्यात आला आहे. गतवर्षी हा आकडा ६५ हजार अब्ज इतका होता, हे स्वागतार्हच होय. हे साध्य करण्यासाठी पुरेसे तंत्रज्ञान नसणे मात्र उचित नाही.

कोणतीही वाढ नैसर्गिक नसते. हॉटेल उद्योगालाही प्रोत्साहनाची गरज आहेच. ग्राहकाला आकृष्ट करून टिकवून ठेवण्यासाठी नावीन्य आणि सर्जनशीलतेची गरज असते. त्याचप्रमाणे योजना आखून त्या राबवाव्या लागतात. या सगळ्यांत तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका असते. मग ते प्रवासाचा अनोखा ऑनलाइन अनुभव देणे असेल किंवा तत्संबंधित सेवा. पर्यावरणस्नेही प्रवासाचे पर्याय, सोयीसुविधा पुरविणे किंवा प्रवासात उपयोगी पडतील अशा कल्पक गोष्टींचा वापर करणेही यात येईल. तंत्रज्ञान हे सगळ्यांत महत्त्वाची भूमिका बजावते. आतिथ्य उद्योगाची वाढ होत असताना संभाव्य पर्यटकांना खेचून घेतील असे अभिनव, सर्जनशील कल्पक असे मार्ग शोधण्याची गरज नक्कीच आहे.

आपल्या भोवतालचे जग बदलत आहे. या बदलाचे सारथ्य तंत्रज्ञान करते; परंतु आतिथ्य उद्योगात तंत्रज्ञान काय वेगळेपणा आणते हे समजून घेतले पाहिजे. अभ्यागतांना माहितीपूर्ण निर्णय घेता यावे, अशी परिस्थिती आपण तयार करायला नको का? उदाहरणार्थ, हॉटेल्सच्या खोल्या कशा आहेत? कोणकोणत्या सुविधा त्यात असतील? आसपास काय आहे? रिसॉर्ट कसा आहे? याची कल्पना आरक्षण करण्यापूर्वी यावी, यासाठी पाहुण्यांना इंटरनेटच्या मदतीने छोटी सफर आधीच घडवून आणता येणार नाही का? आभासी वास्तवाच्या मदतीने स्थानिक आकर्षणे पर्यटकांसमोर ठेवणे, खाण्यापिण्याच्या पदार्थांची उपलब्धता त्यांना सांगितली गेली तर मिळणारी सेवा नक्कीच मूल्यवर्धित होईल. पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा वापरणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर तयार होणारे अन्न आणि उत्पादने देऊ करून पर्यावरणप्रेमी प्रवाशांना आकर्षित करून घेता येईल. माणसांना जिंकण्याचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो असे म्हणतात. अधिक चांगली पाकसिद्धी करून प्रवाशांना जिंकता येणार नाही का? 

आज अनेक पंचतारांकित हॉटेल्स त्यांच्या खोल्यांमध्ये स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. मोबाइल ॲपचा वापर करून त्यात आणखी अभिनव भर घालता येईल. अशा ॲपच्या माध्यमातून पाहुण्यांच्या व्यक्तिगत आवडीनिवडीचा विचार करून सेवा देता येईल. रोमॅंटिक असे व्हॅलेंटाइन डे पॅकेज किंवा शीतकालीन सफारीचा अनुभव सुट्ट्यांच्या हंगामात दिल्यास लोक स्वागतच करतील. अतिवेगवान इंटरनेट कनेक्टिव्हिटी तसेच स्टेट ऑफ द आर्ट तंत्रज्ञानाने मंडित अशा सेवासुविधा दिल्या तर लोक खुश होतील. ऑनलाइन समूह तयार करणे ही एक भन्नाट कल्पना ठरेल. आतिथ्य उद्योगात नवनव्या गोष्टी येत आहेत. त्यातील विपणन योजना जबाबदारीने आखल्या गेल्या पाहिजेत. हॉटेलच्या वैशिष्ट्यांशी सुसंगत अशा कल्पना राबवून ग्राहकांना उत्तम सेवा दिली पाहिजे. सतत फीडबॅक घेत होत असलेले बदल सहजपणे आत्मसात करणे यातून बराच फरक पडू शकतो.

Web Title: Domestic and foreign guests will come, are your hotels ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.