कौटुंबिक हिंसाचार; संवाद महत्त्वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 04:37 AM2020-08-21T04:37:42+5:302020-08-21T04:37:49+5:30
असे फोन, तक्रारी काही नव्या नव्हत्या; पण कोरोना कालावधीत मात्र तक्रारींची दाहकता काही वेगळीच वाटली.
- विजया रहाटकर
‘ताई, नवरा काही काम करीत नाही. सगळा राग माझ्यावर काढतो, घरातून पळून जावेसे वाटतंय’, ‘मॅडम, आमच्या शेजारच्या घरात रोज रडण्याचा आवाज येतो. माझी शेजारीण स्वभावाने गरीब आहे, नवरा मारहाण करतो तिला,’ ‘ताई, लॉकडाऊन केव्हा संपेल? नवरा घरात दिवसभर छळत बसतो..’ लॉकडाऊन सुरू झाल्यावर एप्रिलच्या प्रारंभी एखाद्दुसरा फोन येऊ लागला. नंतर ही संख्या व तीव्रता वाढू लागली. महापौर होते, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्ष होते, तेव्हा कितीतरी अडचणीतील महिला माझ्याकडे येत असत. त्यामुळे असे फोन, तक्रारी काही नव्या नव्हत्या; पण कोरोना कालावधीत मात्र तक्रारींची दाहकता काही वेगळीच वाटली.
लॉकडाऊनमुळे काही काळासाठी जग जणू एकाच जागी थांबले. दिवसाचे आठ-दहा तास कामानिमित्त घराबाहेर राहणारे सर्व स्तरांतील पुरुष व बऱ्याचशा महिला २४ तास एकाच छताखाली राहू लागल्या. खरे तर अधिक एकत्र राहण्याने त्यांच्यातील संवाद वाढेल, प्रेम वाढेल, आई-वडील मुलांना अधिक वेळ देऊ शकतील, घरातील मतभेद दूर होण्यास मदत होईल, असे वाटत होते. काही कुटुंबांमध्ये तसे झालेही; परंतु काही ठिकाणी उलटच घडले. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. मध्यंतरी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, लॉकडाऊनदरम्यान झालेला कौटुंबिक हिंसाचार गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक असून, अशा प्रकरणांमध्ये सुमारे ७५ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे दिसलंय.
कौटुंबिक हिंसाचारामध्ये शारीरिक, लैंगिक, आर्थिक, मानसिक, आदी प्रकारांनी स्त्रियांचे शोषण केले जाते. यामुळे महिलांना कायमचा शारीरिक वा मानसिक विकार जडू शकतो, त्या नैराश्येच्या गर्तेत जातात. अशा स्थितीत स्त्रीला माहेरची मदत मिळाली, तर ठीक अन्यथा तिचे आयुष्यच उद्ध्वस्त होते. हा हिंसाचार रोखण्यासाठी कायदे आहेत; मात्र त्यांचा आधार घेण्यासाठी पीडितेला पुढे यावे लागते. या संबंधात जागृती झाली असली, तरी जिवाच्या भीतीने, मुलांच्या भविष्याच्या चिंतेने त्या पुढे येत नाहीत.
पीडितेला भावनिक व कायद्याचे बळ देण्याचे काम महिला आयोग, महिलांसंबंधी काम करणाºया देशातील संघटना करीत आहेत. महिलांचे कुटुंबातील व समाजातील स्थान सन्मानजनक असावे, यासाठी केंद्र सरकारच्या विशेष योजना आहेत. राज्ये व जिल्हा स्तरांवरही मदतकक्ष आहेत; परंतु लॉकडाऊनच्या काळात पीडितांना काही गोष्टी सहज शक्य झाल्या नाहीत. नवºयाकडून छळ होत असेल, तर बहुतेक स्त्रिया घर सोडून माहेरी अथवा मैत्रिणीकडे राहावयास जायच्या. लॉकडाऊनमुळे ते शक्य नव्हते. जे सुरू आहे, त्याला तोंड देत त्यांना घरातच राहावे लागले. काही पीडितांना शेजाऱ्यांची मदत मिळाली, त्यामुळे त्या तक्रार नोंदवू शकल्या; पण एखादी महिला गप्प राहते, तेव्हा पुरुषाचे धारिष्ट्य वाढते. लॉकडाऊन दरम्यान घरातील हिंसाचाराचे प्रमाण वाढण्यास हेही एक कारण आहे.
दुसरे म्हणजे, पुरुषांच्या नोकरी व कामाबाबतची अनिश्चितता वाढली. कित्येकांची वेतनकपात झाली. अनेकांच्या नोकºया गेल्या. एकीकडे साथरोगाची भीती व दुसरीकडे जगण्यासाठी लागणाºया साधनांची भ्रांत, भविष्याचा तर विचारच नकोसा झाला. यामुळे मनावरील ताण व अस्थिरता सर्व स्तरांमधील लोक अनुभवत आहेत. हा ताण घरातील महिलेला छळण्यात मोकळा होऊ लागला. त्यातून अनेक पुरुषांना स्त्री मालकीची वाटत असते, तिच्यावर कोणत्याही प्रकारे अधिकार गाजविणे हा विवाहबंधनाने मिळालेला जणू हक्कच आहे, असे मानले जाते. पतीकडून पत्नीवर होणारा बलात्कार या मुद्द्यावरही गांभीर्याने विचार व्हावा. कोणत्याही स्थितीत स्त्रीची मर्जी हीच प्रधान राहिली पाहिजे. महिलांसाठी सरकार व स्वयंसेवी संस्थांकडून उपलब्ध केलेल्या हेल्पलाईनकडे रोज येणाºया शेकडो दूरध्वनींमुळे या काळजीत भर पडली.
लॉकडाऊनदरम्यान जगभरात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या. पाश्चात्य कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली आहे. मात्र, आपल्या कुटुंबव्यवस्थेचा पाया भक्कम आहे. या व्यवस्थेवरच आपला समाज उभा आहे. तरीही लॉकडाऊनसारखी अनपेक्षित, तात्पुरती अवस्था आल्यावर तो डळमळीत होतो आहे, असे का वाटावे? याचे कारण मला दिसते, ते म्हणजे आपल्यातील संवाद कमी होत चाललाय. आपले व्यक्त होणे, एकमेकांना समजून घेता घेता समज वाढविणे हरवत चालले आहे. कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांशी संवाद नाते अधिक दृढ करण्यास गरजेचा असतो. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालावरून स्त्रियांविरोधातील गुन्ह्यांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे असे दिसते. त्यातही ज्या राज्यांत ही प्रकरणे सर्वाधिक नोंदविली जातात, त्या बिहार, हरियाणामध्ये पुरुषप्रधान व्यवस्थेची पाळेमुळे घट्ट आहेत, असे लक्षात येते. येथे अधिक काम करावे लागणार आहे. त्यासाठी शालेय स्तरापासूनच मुलांना स्त्रियांचा आदर राखायला शिकविण्यापासून ते स्त्री आणि पुरुषाच्या समान भूमिकेची शिकवण देण्यावर भर द्यायला हवा.
दुसरी एक गोष्ट म्हणजे लॉकडाऊनच्या काळात काही प्रमाणात पुरुषांचीही मानसिक घुसमट होत होती. ‘सतत फोनवर बोलत बसतात,’ अशी महिलांची वाक्ये पुरुषांच्या घुसमटीचेही बोलके उदाहरण असते. एकीकडे कुटुंबाची जबाबदारी, अनिश्चित व अस्थिर सामाजिक वातावरण आणि दुसरीकडे छोटे घर, बाहेर पडणे कठीण, लॉकडाऊन शिथिल झाला, तरी कोरोनाची कायमची भीती या सगळ्यांत पुरुषही भरडले जात आहेत. महिलांकडे पाहण्याची पुरुषी मानसिकता बदलायची आहे. मात्र, ती पुरुषाला समाजावून घेऊन, त्याच्याशी संवाद साधून. त्यासाठी उभयतांनी एकमेकांशी संवाद साधायला हवा, एकमेकांना ‘स्पेस’ द्यायला हवी.
(माजी अध्यक्ष, महाराष्ट्र महिला आयोग)