डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तर...

By admin | Published: May 11, 2016 02:55 AM2016-05-11T02:55:15+5:302016-05-11T02:55:15+5:30

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेले आहेत. राज्याराज्यांमध्ये होत असलेल्या प्रायमरीज आता संपत आल्या आहेत.

Donald Trump becomes America's President ... | डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तर...

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तर...

Next

प्रा.दिलीप फडके, (ज्येष्ठ विश्लेषक)
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेले आहेत. राज्याराज्यांमध्ये होत असलेल्या प्रायमरीज आता संपत आल्या आहेत. आत्तापर्यंत झालेल्या प्रायमरींमध्ये आश्चर्यकारकपणाने रिपब्लिकन पक्षात इतर सगळे स्पर्धक मागे पडून डोनाल्ड ट्रम्प यांना रिपब्लिकनची उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झाल्यासारखे आहे. वादग्रस्त विधानांमुळे ट्रम्प यांच्यावर सातत्याने टीका होत आलेली आहे. सुरुवातीला त्यांच्या उमेदवारीकडे कुणी फारसे गांभीर्याने पाहिले नाही. मग त्यांच्या बेछुट आणि उठवळ वक्तव्यांवर टीका व्हायला लागली. पण एकापाठोपाठ एक प्रायमरी जिंकत ट्रम्प रिपब्लिकनचे मुख्य दावेदार बनायला लागले तशी त्यांची दखल गांभीर्याने घेतली जाऊ लागली आणि आता जेव्हा त्यांना पक्षाची उमेदवारी मिळणार असे दिसायला लागले तेव्हा जगात इतरत्रदेखील त्यांच्याबद्दल विचार व्हायला लागलेला आहे. अध्यक्षपदावर आले तर ट्रम्प कितपत यशस्वी ठरतील, त्यांची धोरणे काय असतील याबद्दलचा अंदाज घायला सुरु वात झालेली आहे.
अमेरिकेत तसेच जगातल्या इतर देशांच्या प्रसारमाध्यमांमध्ये हे आपल्याला पहायला मिळते आहे. चीनच्या पीपल्स डेलीने चीनसाठी ट्रम्प कसे ठरतील याचा अंदाज करणे अवघड आहे असा सूर आपल्या अग्रलेखात लावलेला आहे. सुरूवातीला ट्रम्प यांची विधाने कुणी फारशी गंभीरपणे घेतली नाहीत; पण आता त्यांच्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे हे सांगतानाच स्वत: ट्रम्प यांनीदेखील अधिक जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केल्याचे पीपल्स डेलीने म्हटले आहे. ट्रम्प यांच्यावर कोणत्याही विचारप्रणालीचे दडपण नाही. ते पूर्णत: स्वतंत्र आणि वेगळ्या पद्धतीने विचार करीत आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दलचा निश्चित अंदाज करता येत नाही हे सांगत पीपल्स डेलीने ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणाची दखल घेत त्यांच्यापेक्षा क्लिंटन निवडून आल्यास त्यांच्या धोरणांमध्ये अमेरिकेच्या आजवरच्या धोरणांचे सातत्य दिसण्याची जास्त शक्यता असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या जनतेच्या विचारसरणीत गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या बदलांची फारशी दखल आजवर घेतली गेली नव्हती. पण हा बदल ट्रम्प यांच्याद्वारे प्रभावीपणाने सर्वांच्या समोर आलेला आहे.
ज्यावेळी ट्रम्प यांनी उमेदवारी जाहीर केली त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना गांभीर्याने घेतले नाही. रिअल इस्टेटच्या क्षेत्रातला हा उद्योगपती यथावकाश या शर्यतीतून माघार घेईल असे सर्वांना त्यावेळी वाटत होते; पण ट्रम्प यांनी सर्वांनाच चकित केले आहे असे जपानच्या असाही शिम्बुन मधल्या लेखात सेईनोसुके इवासाकी, काझुयो इवासाकी आणि काझुयो नाकामुरा यांनी म्हटले आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले तर त्याचा जपानवर कोणता परिणाम होईल याचा अंदाज करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. जपानला अण्वस्र बनवण्याचा अधिकार आहे आणि जर जपान खर्चातला काही वाटा उचलायला तयार नसेल तर जपानमधून आपले सैनिक काढून घेण्याचा निर्णय आपण घेऊ, असे ट्रम्प यांनी सांगितले आहे याची नोंद त्यांनी घेतली आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यास त्यांचे मुख्य सल्लागार कोण राहतील तसेच त्यांच्या मंत्रिमंडळात कोणकोण असतील याबद्दलचा अंदाज बांधण्यास जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सुरु वात केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले तरी त्यांना सध्याच्या घटनेच्या चौकटीत राहून काम करावे लागणार आहे याची दखल घेत राज्यकारभाराच्या पद्धतीत अनेक घटक एकमेकांवर नियंत्रण ठेवीत असतात त्यामुळे जरी ट्रम्प राष्ट्रपती झाले तरी ते फारसे काही उलटसुलट करू शकतील असे वाटत नाही, असे टोकियो विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातले प्रा. काझुहीरो मेशिमा यांनी सांगितल्याचेही या लेखात नमूद केले आहे. दुसऱ्या एका वार्तापत्रात ताकेत्सुगु साटो ह्या शिम्बुनच्या पत्रकाराने राजकीयदृष्ट्या चांगले वजन असणारे जपानचे एक मंत्री शिगुरु इशिबा यांच्या वॉशिंग्टन दौऱ्यामध्ये त्यांनी केलेल्या निवेदनाचे वृत्त दिले आहे. जपानला आपली अण्वस्रे तयार करायला हरकत नाही या ट्रम्प यांच्या मताचा समाचार घेत साटो यांनी ट्रम्प यांनी जपान आणि अमेरिका यांच्यातल्या करारांचा अधिक बारकाईने अभ्यास करून मगच आपली मते बनवावीत असा सल्लाही ते देत आहेत. अमेरिकेशी लष्करी संबंध असणाऱ्या अन्य देशांपेक्षा जपानचे करदाते कररूपाने अधिक पैसा अमेरिकन सैनिकांसाठी देत आहेत असेही त्यांनी सुनावलेले आहे.
ट्रम्प यांची मुस्लीम आणि मेक्सिकन यांच्याबद्दलची मते पाहता आणि जागतिकीकरणाच्या विरोधातली त्यांची वक्तव्ये पाहता ते निवडून आले तर बाहेरच्या कितीजणांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळू शकेल, असा प्रश्न गार्डियनमधल्या लेखात इम्मा ब्रोक्स यांनी विचारलेला आहे. ट्रम्प यांनी आर्थिक बेजबाबदारपणाचा एक नवा उच्चांक निर्माण केलेला आहे, असे वॉशिंग्टन पोस्टने आपल्या अग्रलेखात म्हटलेले आहे. सरकारचे कामकाज एखाद्या व्यापारी संस्थेप्रमाणे चालवले पाहिजे असे ट्रम्प यांच्या आजवरच्या वक्तव्यावरून ध्वनित होते आहे असे सांगून हे मत चुकीचे आणि अव्यवहार्य असल्याचे पोस्टने सांगितलेले आहे. आपण मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊ, जर अर्थव्यवस्था अडचणीत आली तर या कर्जांची परतफेड करताना डिस्काउण्ट मिळू शकते आणि त्याचा आपण फायदा उठवू शकतो अशी विधाने ट्रम्प यांनी केलेली आहेत. असे खरोखरच घडले तर ते ग्रीसमध्ये घडले तसेच काहीसे असेल आणि अमेरिकेच्या बाबतीत असे काही घडले तर जगातल्या इतर अनेक देशांमध्ये त्याचा जो परिणाम होईल त्याची कल्पनाही करता येणार नाही, असेही पोस्टने म्हटले आहे. त्यामुळेच ट्रम्प यांच्या प्रचारातले त्यांचे अर्थविषयक सल्लागार स्टीवन म्नुचीन यांनी ट्रम्प यांच्या मताच्या विरोधात खुलासा करीत अमेरिकन सरकारला आपली जबाबदारी पार पदवीच लागेल, असे स्पष्ट केले आहे. याकडेही पोस्टने लक्ष वेधले आहे.
ऌङ्म६ ऊङ्म ङ्म४ ऊीुं३ी ट१. ळ१४ेस्र? या अग्रलेखात न्यू यॉर्क टाइम्सने यावेळच्या निवडणुका हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होतील अशी शक्यता दिसत असल्याचे सांगत त्या आजपर्यंतच्या सर्वात विषारी प्रचाराने लढवलेल्या निवडणुका असतील हे सांगितले आहे. परदेशी संस्थांना अमेरिकेतले रोजगार हिरावून नेण्याची संधी आपण देणार नाही यासारखी अमेरिकेतल्या कामगार वर्गाला ट्रम्प यांची मते विशेष आकर्षक वाटत आहेत हे नमूद करून जागतिकीकरणापासून स्वत:ला तोडून टाकून आपल्यापुरतीच धोरणे ठरवावीत, असा विचार गेल्या अनेक वर्षांमध्ये कधी मांडलाच गेला नाही हेदेखील टाइम्सने म्हटले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या अंतर्गतच ट्रम्प यांना विरोध वाढतो आहे. त्यामुळे त्यांना पक्षाची उमेदवारी मिळाली तर पक्षाच्या विरोधात जाण्याची तयारी अनेक वरिष्ठ नेत्यांनी केलेली आहे. त्याचाच संदर्भ देत दाना समर्स यांनी काढलेले एक बोलके व्यंगचित्र वॉशिंग्टन टाइम्समध्ये प्रकाशित झालेले आहे. ट्रम्प यांच्या कामगिरीवर त्यातून प्रभावीपणाने भाष्य केलेले पहायला मिळते आहे.

Web Title: Donald Trump becomes America's President ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.