डोनाल्ड ट्रम्प येता घरा...राजकीय दिवाळी - दसरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 01:46 AM2020-02-01T01:46:33+5:302020-02-01T05:26:52+5:30

ट्रम्प यांचा स्वभाव लक्षात घेता ही भेट लिहिलेल्या स्क्रिप्टनुसार आणि निर्विघ्नपणे पार पडावी अशी भारतीय परराष्ट्र विभागाची इच्छा असेल.

Donald Trump Coming Home ... Political Diwali - Dussehra! | डोनाल्ड ट्रम्प येता घरा...राजकीय दिवाळी - दसरा!

डोनाल्ड ट्रम्प येता घरा...राजकीय दिवाळी - दसरा!

Next

- अनय जोगळेकर (आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक)

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बहुप्रतीक्षित भारतभेट होणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी २४-२६ फेब्रुवारी दरम्यान ती असेल असा अंदाज आहे. ही भेट केवळ भारत आणि अमेरिका संबंधांच्या दृष्टीनेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीसाठीही महत्त्वाची असेल.

ट्रम्प यांनी आपल्या बेताल वक्तव्यांनी तसेच धरसोड वृत्तीने पारंपरिकदृष्ट्या अमेरिकेच्या अनेक मित्रराष्ट्रांशी संबंध बिघडवले. भारताने मात्र ट्रम्प यांच्या कलाकलाने घेऊन अलगदपणे आपले हितसंबंध पुढे सरकवले. ट्रम्प प्रशासनाने आशिया-पॅसिफिक भागास हिंद-प्रशांत क्षेत्र असे म्हणायला सुरुवात करून या भागावर असणाऱ्या भारताच्या प्रभावाला मान्यता दिली. ट्रम्प यांनी २०१९ सालच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून यावे यासाठी भारताने प्रयत्न केले होते. पण अमेरिकेतील अंतर्गत राजकारणात व्यस्त राहिल्यामुळे ट्रम्प येऊ शकले नाहीत.

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर ३०० चा आकडा पार केल्यानंतर आपल्या दुसºया टर्ममध्ये मोदी सरकारने संघ परिवाराला वैचारिकदृष्ट्या जवळच्या विषयांवर निर्णय घ्यायचा सपाटा लावला आहे. त्रिवार तलाक दंडनीय अपराध घोषित करणे, जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० च्या तरतुदी हटवणे, सर्वोच्च न्यायालयाकडून रामजन्मभूमीच्या मुद्द्यावर निर्णय येणे, ते या वर्षीच्या सुरुवातीला लागू झालेला नागरिकत्व संशोधन कायदा यामुळे देशातील राजकारण ढवळून निघाले. यावर आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या माध्यमांनी मोदी सरकारवर कडवट टीका केली आहे.



या वर्षी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मंदावून सुमारे साडेचार टक्क्यांजवळ आला आहे. त्या जोडीला डेटा स्थानिकीकरण, अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या अमेरिकन गुंतवणूक असलेल्या कंपन्यांची होऊ घातलेली चौकशी इ. गोष्टींचे सावट भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवरही आले आहे. अशा स्थितीत जगातील सर्वात जुन्या आणि महत्त्वाच्या लोकशाही देशाकडून मिळणारा पाठिंबा तसेच गुंतवणूक भारतासाठी महत्त्वाची आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचीही अशीच अवस्था आहे. 

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुका आता १० महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना अध्यक्षीय निवडणुकीतील विजयासाठी, संभाव्य प्रतिस्पर्धी जो बायडन यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी ट्रम्प यांनी युक्रेनच्या अध्यक्षांवर दबाव टाकल्याच्या आरोपावरून ट्रम्प यांच्या विरोधात पदच्युतीची सुनावणी चालू आहे. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असल्याने ट्रम्प यांच्या खुर्चीला धोका नसला तरी त्यांनीच हकालपट्टी केलेले माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन आपल्याकडील संवेदनशील माहिती माध्यमांना पुरवून ट्रम्प यांची बदनामी करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्यासाठीही वॉशिंग्टनबाहेर पडून प्रसिद्धीच्या झोतात येण्याची गरज आहे. त्यातून त्यांच्या भारतभेटीच्या कल्पनेला बळ मिळाले.

टेक्सासमध्ये ५० हजारहून अधिक अमेरिकास्थित भारतीयांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या हावडी मोदी या कार्यक्रमात ट्रम्प यांना विशेष अतिथी म्हणून बोलावण्यात आले. एवढ्या मोठ्या जनसमुदायापुढे स्वत:च्या प्रचाराची संधी मिळाल्याने हरखून गेलेल्या ट्रम्प यांनी भारत आणि पंतप्रधान मोदींचीही मुक्तकंठाने स्तुती केली. हावडी मोदीचा पुढचा भाग म्हणून हावडी ट्रम्प कार्यक्रम जगात सर्वाधिक म्हणजे १ लाख १० हजार क्षमतेच्या अहमदाबादेतील मोटेरा स्टेडियममध्ये आयोजित करण्याचा प्रयत्न आहे. स्वत: ट्रम्प आणि त्यांच्यासोबत येणाºया अमेरिकन उद्योजकांच्या शिष्टमंडळामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय विश्वासार्हतेत वाढ होऊ शकेल. तर एवढी मोठी राजकीय सभा अमेरिकन मतदारांचे डोळे दिपवल्याशिवाय राहणार नाही, असा ट्रम्प यांचा अंदाज असावा.


या दौºयात भारत आणि अमेरिकेत मर्यादित प्राधान्य व्यापार करार करण्यात येईल असा अंदाज आहे. यामुळे अमेरिकेला आपली कृषी उत्पादने, खनिज तेल आणि संरक्षण क्षेत्रात भारतीय बाजारपेठ उपलब्ध होईल, तर भारताच्या अर्थव्यवस्थेलाही अमेरिकन गुंतवणूक आणि बाजारपेठेतील प्रवेशामुळे चालना मिळेल. त्यापलीकडे जाऊन महत्त्वाच्या देशांशी प्रादेशिक मुक्त व्यापार करारांऐवजी द्विपक्षीय करार करण्याच्या भारताच्या भूमिकेला बळ प्राप्त होईल. या दौºयात संरक्षण क्षेत्रातील मोठ्या व्यवहार किंवा सहकार्य प्रकल्पाची घोषणा केली जाईल, असाही अंदाज आहे. ट्रम्प यांचा स्वभाव लक्षात घेता ही भेट लिहिलेल्या स्क्रिप्टनुसार आणि निर्विघ्नपणे पार पडावी अशी भारतीय परराष्ट्र विभागाची इच्छा असेल.

Web Title: Donald Trump Coming Home ... Political Diwali - Dussehra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.